Saturday 26 November 2011

रोखा त्‍या एडसला !

एच.आय.व्‍ही. या विषाणुंची बाधा झाल्‍यावर होणारा आजार म्‍हणजे एडस. याचा झपाट्याने फैलाव होत आहे.मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण झाली तर हा फैलाव रोखता येईल. जागतिक आरोग्‍य संघटनेने यासाठी 1 डिसेंबरला जागतिक एडस दिवस जाहीर केलेला आहे.
- प्रशांत दैठणकर
गेल्‍या दोन दशकात संपूर्ण जगाला ज्‍याचा वेढा पडला आहे. आणि त्‍यात वाढच होत आहे तो आजार म्‍हणजे एडस् होय. एच.आय.व्‍ही. या विषाणुंच्‍या प्रादूर्भावामुळे हा आजार होतो. अक्‍वायर्ड इम्‍यून डिफिशिअन्‍सी सिंड्रोम असं याचं नाव आहे. हा विषाणू शरीरात दाखल झाल्‍यानंतर शरीराची असणारी सुरक्षा प्रणाली कमकुवत करण्‍याचं काम करतो.
आपल्‍या रक्‍तात लाल आणि पांढ-या पेशी असतात यापैकी पांढ-या पेशी हे आपल्‍या शरीराचं संरक्षणदल असतं. कोणताही आजार जिवाणू किंवा विषाणू यामुळेच होत असतो. जिवाणू किंवा विषाणू शरीरात दाखल झाल्‍यावर पांढ-या पेशी सक्रीय होतात व या परजीवीवर हल्‍ला करुन त्‍यांना संपवित असतात.
एचआयव्‍ही विषाणू शरीरात दाखल झाल्‍यानंतर तो ही सुरक्षा प्रणाली पूर्णपणे कमकुवत कमकुवत करतो. परिणामी क्षयरोगासारख्‍या पूर्ण पणे बरे होणा-या आजाराने देखील रुग्‍णाचा मृत्‍यू होवू शकतो. या एचआयव्‍ही विषाणूचे मुळ आफ्रिकेत आहे असे मानले जाते. या विषाणूंचा जगभरात प्रसार झाला असून ते लोण आता भारताच्‍या ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले दिसते.

एच.आय.व्‍ही. चा प्रसार मुख्‍यत्‍वे करुन तीन प्रकारे होते. यापैकी एक म्‍हणजे रक्‍त संक्रमण होय. एच.आ.व्‍ही. बाधित व्‍यक्‍तीचे रक्‍त सामान्‍य व्‍यक्‍तीला दिल्‍यास एच.आय.व्‍ही.चा प्रसार होतो. दुस-या प्रकारात एचआयव्‍ही बाधित मातेकडून नव्‍याने जन्‍मणा-या मुलांना याची बाधा होवू शकते.
जगात झपाट्याने हा विषाणू पसरण्‍याचे कारण अर्थातच अनैतिक संबध हेच आहे. अनैतिक आणि असुरक्षित लैंगिक संबंधांमधून याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आणि तो वाढतच आहे. कधी धाडस म्‍हणून तर कधी गरज म्‍हणून अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणा-या व्‍यक्‍तींना याची लागण होते आणि पुढे एच.आय.व्‍ही.ची बाधा झालेला रुग्‍ण एडसच्‍या आजाराने वेढला जातो.
जागतिक आरोग्‍य संघटना आपल्‍या स्‍तरावर याबाबत मोठया प्रमाणात प्रयत्‍न करीत आहे. सामाजिक जागृती करण्‍यात येत आहे. त्‍यासोबत ज्‍यांना एच.आय.व्‍ही.ची बाधा झाली अशा रुग्‍णांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचेही काम सुरु आहे. आपणापैकी प्रत्‍येकाने याबाबत माहिती घेऊन जागरुक नागरिकाप्रमाणे जगल्‍यास आपण एडसला सहजरित्‍या थांबवू शकतो.
- प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment