Friday 25 November 2011

औद्योगिक क्षेत्रामध्‍ये वृक्ष लागवड करण्‍याचे आवाहन


     वर्धा,दि.25- वृक्ष तोडीमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलांचा -हास झाला असून, शासनाने पुढील वित्‍तीय वर्षासाठी जिल्‍ह्यातील सर्व विभागांना वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारीत केले आहे. यामध्‍ये औद्योगिक क्षेत्राचा समावेश केलेला असून, उद्योजकांनी निर्धारीत केलेल्‍या लक्षांकानुसार औद्योगिक क्षेत्रामध्‍ये वृक्ष लागवड करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
     आज येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात जिल्‍हा उद्योग मित्र समितीची आढावा बैठक संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या.
     या बैठकीमध्‍ये जिल्‍हा उद्योग केंद्राचे व्‍यवस्‍थापक अे.पी.धर्माधिकारी,औद्योगिक विकास महामंडळाचे नागपूरचे प्रादेशिक अधिकारी,एम.एस.ई.बी.चे अधिक्षक अभियंता बोरीकर, एस.टी.विभागाचे विभाग नियंत्रक पंचभाई, लघू  उद्योग भारतीचे भुषण वैद्य, एम.आय.डी.सी.चे अध्‍यक्ष प्रविण हिवरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
     एम.आय.डी.सी.मधील जी लेआऊट भुखंड धारकाशी संवाद साधून उद्योग सुरु करण्‍यास इच्‍छूक  असल्‍याची खात्री करुन त्‍याची सभा बोलाविण्‍याचे निर्देश देवून जिल्‍हाधिकारी भोज म्‍हणाल्‍या की, औद्योगिक क्षेत्रामध्‍ये अतिरिक्‍त पायाभूत सुविधेसाठी शासनाकडे प्रस्‍ताव सादर करण्‍यात यावा. वर्धा व देवळी एम.आय.डी.सी.क्षेत्रातील दृतगतीने विकास साधण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या उपाययोजना कराव्‍या असेही त्‍यांनी निर्देश दिले.
                                  00000

No comments:

Post a Comment