Monday 8 August 2011

एड्सचं चित्र धक्कादायक .... !


विशेष लेख           जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा            दि.8 आगस्ट 2011
    
     देशात एड्स झालेल्यांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हे जितकं धक्कादायक तितकच धोकादायक आहे. याला अटकाव करण्यासाठी नैतिकता आणि सुरक्षित लैंगिक संबध हे दोन प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
                                      - प्रशांत दैठणकर
  एच.आय.व्ही. आणि एड्स ही गेल्या दशकातील सर्वात मोठी आरोग्य समस्या बनली आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे देशात सर्व राज्यांच्या आकडेवारीत महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. ही बाब जितकी धक्कादायक आहे तितकीच धोकादायक देखील आहे.
नुकत्याच जारी आकडेवारीनुसार संपूर्ण देशात एड्सग्रस्तांची संख्या 4 लाखांच्या आसपास आहे. त्यात महाराष्ट्रातील 1 लाखांहून अधिक एड्सग्रस्तांचा समावेश आहे. राज्यात एड्स नियंत्रण सोसायटीच्या माध्यमातून याचा प्रसार रोखण्यासाठी प्रबोधनात्मक उपक्रमांसह विविध उपक्रम सतत राबविले जातात.
एड्स होण्याचं मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे एच.आय.व्ही. व्हायरस होय. या व्हायरसचा प्रसार तीन प्रकारांनी होत असतो.यात अनैतिक आणि सुरक्षित शारिरीक संबंध हे प्रमुख कारण आहे.
                                                                                
रक्तातून एकाचे विषाणू दुसरीकडे जाऊ शकतात परंतु देशात सर्वत्र रक्त संक्रमणापूर्वी एच.आय.व्ही.ची तपासणी सक्तीची करण्यात आलेली असल्याने या मार्गातून एच.आय.व्ही.ची बाधा शक्य राहिलेले नाही.
मातेला गर्भ धारणेच्या काळात एच.आय.व्ही. विषाणूची बाधा झालेली असेल तर तिच्या बाळालाही बाधा होत असते. मुळात मातेला होणारी अशी बाधा ही महत्वाची समस्या आहे.
आपला देश नैतिकता आणि कुटुंब व्यवस्था पाळणारा देश आहे. असे असताना देखील एच.आय.व्ही आणि एड्स बाधितांची संख्या वाएत आहे, ही खरोखरच चिंतेची बाब आहे. असुरक्षित लैंगिक संबंध ही अनैतिक संबंधांची दुसरी बाजू असते. यात विवाहबाह्य संबंध टाळला तरी एच.आय.व्ही.चा धोकाच उरत नाही हे स्पष्ट आहे.
आपल्याकडे लैंगिक शिक्षण दिले जात नाही मात्र आता एच.आय.व्ही.ची बाधा होणा-यांचे प्रमाण बघून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.
स्त्री-पुरुष संबंधातील मुक्तपणा गेल्या 2 दशकात खूप वाढला आहे. मात्र याचा गैरफायदा पुरुषच मोठ्या प्रमाणावर घेतात हे एड्सच्या आकडेवारीवरुन जाणवते. देशातील एकूण पुरुष रुग्णांची संख्या 2 लाख 28 हजारांहून अधिक आहे तर 1 लाख 71 हजार महिलांना याची बाधा झाली आहे.
आरोग्य ही मोठी संपदा आहे आणि येणारी पिढी निकोप रहावी असं वाटत असेल तर प्रत्येकाने या बाबीकडे लक्ष द्यावं आणि यापासून चार हात लांब रहावं हे उत्तम.
                           - प्रशांत दैठणकर
                000000

No comments:

Post a Comment