Wednesday 24 August 2011

अन्नदात्रीच ॲनिमिक... ?


विशेष लेख          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि. 24 ऑगस्ट 2011
---------------------------------------------------------------------------
 अन्नदात्रीच निमिक... ? 
     कुटुंबातील सर्वजण जेवल्यावर आपण जेवावं या मनाचा पगडा स्त्रियांच्या मनावर मोठया प्रमाणावर आहे. काळ झपाटयाने बदललाय मात्र त्यात बदल नाही झाला. यामुळे महिलांमध्ये आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झालीय.काळाच्या सोबत महिलांनी आहारही बदलण्याची वेळ आता आली आहे.                                            - प्रशांत दैठणकर
समाजात ज्या वाईट रुढी परंपरा आहेत त्यात अनुनयाची परंपरा महिला वर्ग पुढे चालवतोय आणि त्यातून त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे हे अतिशय गंभीर असं प्रकरण आहे. कुटुंबात सगळयांची जेवणं झाल्यानंतर घरच्या त्या अन्नदात्रीनं जेवायचं अशी एक विचित्र परंपरा आपण पाळतोय त्यामुळे मोठया प्रमाणात कमजोरी अर्थात निमियाची वाढ होताना दिसत आहे.
घरात कर्ता पुरुष जेवल्यानंतर त्या घरातल्या गृहिणीने जेवण करावं ही परंपरा आहे. या रुढीला जुन्या काळातल्या पध्दती प्रमाणे आजही बघितलं जाते असं नव्हे तर तो प्रत्येक स्त्री च्या मनावर कायम स्वरुपी बिंबलं आहे. पूर्वीच्या काळातील जीवनशैली आणि आजची जीवनशैली यात खूप मोठा फरक आहे. त्यावेळी जवळपास सगळा भारत हा ग्रामीण भागातच वसलेला होता आणि सायंकाळी आठ वाजेपूर्वी जेवणं व्हायची.
आज कालानुरुप परिस्थिती बदलली आहे. मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. सोबतच स्त्री देखील नोकरीसाठी घराबाहेर पडली आहे. त्यामुळे शहरी भागात सकाळी विविध कामासाठी सुटं झालेलं कुटुंब एकत्र यायलाच रात्रीचे नऊ वाजत असतात. त्यानंतर जेवणं होतात असा साधारण शहरी राहणीचा बाज आहे. या सर्व धावपळीत स्त्रियांना देखील पुरुषांइतकीच धावपळ करावी लागते. किंबहुना त्याहीपेक्षा अधिक धावपळ करावी लागत असते.                             
 शरीराला सातत्याने ऊर्जा लागते आणि जितकी धावपळ तितकी अधिक ऊर्जा असं गणित आहे. मात्र जुन्या समजुतीतून महिला ऊर्जेचा स्त्रोत असणा-या सकस आहारापासून वंचित राहतात आणि त्यामुळे समाजात निमियाची समस्या  मोठ्या प्रमाणावर दिसते. लोह आणि इतर जीवनावश्यक घटक हे नियमितपणे आपल्या आहारात नसतील तर निमिया होतो. गर्भवती स्त्रियांना याबाबत अधिक काळजी घ्यावी लागते. ती काळजी घेतली गेली नाही तर ती माता आणि तिच्या पोटी जन्माला येणारं बालक या दोघांनाही प्राणाचं संकट असतं.
नोकरदार महिलांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण बहुतांश वेळा त्यांना बैठ्या स्वरुपाचे काम असते. यामुळे शारिरीक मेहनती अभावी येणारा लठ्ठपणा आणि त्यासोबतच ॲनिमिया  असे  दुहेरी  संकट  त्यांच्या समोर येते. लठ्ठपणा आहे याचा अर्थ धडधाकट असणं असा होत नसतो.
वयानुसार सकाळी नाश्ता घेणे ज्यात दुध किंवा अंडी असणं महत्वाचं असतं. वयाची चाळीशी ओलांडल्यावर शरीरात कॅल्शिअमचा साठा होत नाही. त्यामुळे कॅल्शिअम दररोज जेवणातूनच मिळवावे लागते. त्यासाठी नाश्ता हा कॅल्शिअमने संपन्न असणं गरजेचं आहे. अन्यथा सांधेदुखी आणि गुडखेदुखी अशा समस्या सुरु होतात.
शहरी भागात दुचाकीचा वापर करणा-या महिलांनाही मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. वाहतुकीचा ताण झेलण्यासाठी आणि पाठीचे दुखणे टाळण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम यांची गरज मोठ्या प्रमाणावर असते.   
महिलांची आणखी एक सवय म्हणजे शिळं उरलेलं अन्न खाण्याची. या शिळ्या अन्नाने पोट भरत असले तरी त्यात आवश्यक तितका सकसपणा नसतो. परिणामी निमिक होण्याची शक्यता दाट असते. खेरीज शिळ्या अन्नाने विषबाधा होण्याचाही धोका मोठ्या प्रमाणात असतो. बदलत्या जीवन शैली प्रमाणे महिलांनी आपल्याही आहाराच्या पध्दतीत बदल करणं त्यामुळेच आवश्यक ठरतं.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           
                                 - प्रशांत दैठणकर
                          ०००००

No comments:

Post a Comment