Monday 22 August 2011

हुंडा ; विरोधात जनशक्ती येईल ?


विशेष लेख                जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा         दि. 22 आगस्ट 2011
------------------------------------------------------------------------------------
      
     भ्रष्टाचार हा विषय घेऊन चालू असलेल्या आंदोलनात मोठी जनशक्ती एकवटली आहे. मात्र आजही समाजात हुंड्याशिवाय विवाह होत नाहीत. हुंड्यामुळे होणारे छळ थांबलेले नाहीत. यामुळेच स्त्रिभ्रुण हत्या होतात त्याचा परिणाम दर हजारी मुलींची संख्या घटण्यावर झालय. या सामाजिक भ्रष्टाचाराच्या विरोधात कायदा आहे हे विशेष. हा भ्रष्टाचार रोखणं याच जनशक्तीच्या हाती आहे.    
                                                  - प्रशांत दैठणकर
 आपण सातत्यपूर्ण चर्चा करीत असलो आणि गांभीर्य दाखवत असलो तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र तीच आहे. भ्रष्टाचार या विषयावर काही प्रमाणात भारतात ऐक्य निर्माण झाले असल्याचे चित्र जनलोकपाल आंदोलनातून दिसले. मात्र हीच शक्ती समाजाच्या अंतर्गत रुढी आणि परंपरांच्या नावे सुरु असलेल्या सामाजिक भ्रष्टाचाराबाबत वापरली जाण्याची गरज आहे.
कायदा करुन सर्व प्रश्न सुटत नाहीत हे स्पष्ट नव्हे तर वारंवार सिध्द झालय मग तो गर्भजल लिंग तपासणीला अटकाव असो की हुंडाबंदीचा कायदा आज समाजाचं वास्तव खूप वेगळं आहे. प्रत्येक कुटुंबात मुलगाच हवा असा अट्टहास असल्याचं कारण हुंडा हेच आहे.
या ना त्या प्रकारे मुलीच्या असहाय्य बापाला नडून मोठा हुंडा पदरात पाडून घ्यायची परंपरा समाजात आजही कायम आहे. हे समाजाचं वास्तव आणि दुर्दैव आहे असच म्हणता येईल. पदरी पडलेलं कमी वाटतं म्हणून मग परत सूनेला माहेरुन नाना पध्दतीने पैसे व इतर वस्तू मागणा-या सासूंचे प्रमाण कमी नाही. आणि मागणीची पूर्तता झाली नाही म्हणून सुनेला जाळून टाकणे किंवा अन्य मार्गाने मारुन टाकणे, तिचा सातत्याने छळ करणे हा सामाजिक भ्रष्टाचार नव्हे का ? असं असेल तर त्याकडे लक्ष कोणी द्यायचं.
कायदा केला तर त्यात पळवाट शोधण्यात सारे वाकबगार आहेत. हुंडा देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा असताना आजही   95 टक्के विवाह हुंड्याशिवाय होत नाहीत. यांना भितीने लोक स्त्रीभ्रुण हत्या करतात हे स्पष्टच आहे.
भ्रष्टाचार हा हुंडा या रुपाने आज समाजात खूप मोठ्या प्रमाणात आहे. या एका भ्रष्टाचाराने समाजाची मनोवृत्ती आणि ठेवण (रचना) पूर्णपणे बदलून टाकली आहे. समाजात एकांगी विचारसरणी वाढीला लागल्याने दर हजारी मुलींचे प्रमाण धोकादायकरित्या खाली आले आहे.
आज महिला आणि मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. आपल्या देशाचं प्रमुख असलेलं राष्ट्रपती हे पद असो की मोठ्या कार्पोरेट कंपन्यांचं संचालकपद सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करित आहेत. याची नोंद प्रत्येकानं घ्यावी.
आम्हाला करायला काही नाही या भावनेने जखडलेल्या युवाशक्तीने दिल्लीत एकत्रित होणाचं कर्तब दाखवलय हीच शक्ती सामाजिक भ्रष्टाचाराच्या विरोधात उभी राहील का हा खरा सवाल आहे.
                               - प्रशांत दैठणकर
                   000000

No comments:

Post a Comment