Tuesday 23 August 2011

जल फेरभरण करा !


विशेष लेख        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा            दि.23 ऑगस्ट 2011
------------------------------------------------------------------------------

     
     पडणारा पाऊस आणि भूजलाचा उपसा याचं प्रमाण व्यस्त झालं आहे. यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. यासाठी शेतात विहिरीलगत फेरभरणाची व्यवस्था प्रत्येक शेतक-याने केल्यास त्याला हमखास फायदा होवू शकतो. याबाबतचा हा खास लेख.
                                     - प्रशांत दैठणकर
 निसर्ग ज्यावेळी भरभरुन देतो त्यावेळी ते नुसतं घ्यायचं नसतं तर ते साठवायचं देखील असतं. आपण तसं काही करतो का ? मात्र निसर्ग शतकानुशतके आपली परंपरा जपून आहे. आपणच चूक करित आहोत. पावसाळ्यात पाणी जमिनीत मुरतं आणि भूगर्भात साठतं. मात्र आमचा उपसा त्याहीपेक्षा प्रचंड वेगानं वाढल्यानं पाणी टंचाई आम्ही सहन करतो. याला निसर्गाचा कोप म्हणणारे अनेक जण आहेत. निटपणाने विचार केला तर आपणच चुकतोय हे लक्षात येईल.
आपला देश हा मौसमी हवामानाचा देश आहे. इतरत्र पाऊस नेमका कोणत्या काळात पडेल हे सांगता येत नाही. पण आपल्याकडे चार महिन्यांचा पावसाळा आहे. या मौसमी पावसावर आपली शेती अवलंबून आहे. मात्र जे मौसमी वारे भारतात पाऊस आणतात त्याच्या गती आणि प्रगतीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत.
पाऊस येणार याची खात्री, मात्र नेमका कधी येणार आणि कुठे व किती पडणार याचं भाकीत वर्तवता येत नाही त्यामुळे देशातल्या एका भागात अवर्षण तर दुस-या भागात अतिवृष्टी अशी स्थिती आपणास नेमाने दिसत असते. या परिस्थितीत 85 टक्के लोकांचे शेतीवर अवलंबून राहणे म्हणजे अशक्य असते.                                  
शेतीला पाणी लागते आणि पाणी नाही तर शेतीच नाही अशा स्थितीत लहरी पावसावर शेती करणं म्हणजे मोठा जुगार म्हणावा लागेल. पावसाळा पर्यायी व्यवस्था म्हणजे सिंचन होय. या सिंचनासाठी शेतक-यांची पहिली पसंती विहिरींना आहे. मधल्या काळात तांत्रिक प्रगती मोठ्या प्रमाणावर झाली आणि विहिरींची संख्या झपाट्याने वाढत गेली.
काही वर्षापूर्वी शेताला पाणी द्यायचं म्हणजे मोट लावली जायची. या मोटेमुळे पाण्याचा उपसा मर्यादीत होईल. मात्र शेतात विद्युत पंप बसल्यावर दणक्यात उपसा सुरु झाला. प्रसंगी मर्यादेपेक्षा अधिक उपसा व्हायला लागला. वाढलेली विहिरींची संख्या आणि त्या पटीत वाढलेला पाण्याचा उपसा जोडीला दरवर्षी पडणारा ठराविक पाऊस यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी अधिकच खोल जाताना दिसत आहे.
प्रत्येक शेतक-याने आपल्या विहिरीलगत छोटा तलाव करुन त्यातील पाणी विहिरीत जमा होईल अशी व्यवस्था केली पाहिजे. हे फार खर्चाचे काम नाही. शेताचा उतार लक्षात घेऊन पडणारा जादा पाऊस आपल्याला यामुळे विहिरीत पोहचविता येईल. ज्यामुळे पिकांना जादा पावसाचा धोका राहत नाही. भूजल पातळीतही यामुळे वाढ होते.
पडणारा पाऊस भूजलापर्यंत नेण्याचं स्वत:चं असं चक्र निसर्गात आहे. मात्र वाढलेला उपसा आणि प्रमाणात होणारा पाझर याचं प्रमाण व्यस्त झालं आहे. हे प्रमाण योग्य करण्यासाठी आपण शेतात विहिरीत पाणी फेरभरण करायलाच हवं.
                                             - प्रशांत दैठणकर
                     000000

No comments:

Post a Comment