Tuesday 3 January 2012

चौथ्‍या स्‍तंभाचे स्‍थान अबाधितच ....!



      6 जानेवारी, मराठी वृत्‍तपत्रसृष्‍टीचे जनक बाळशास्‍त्री जांभेकर यांच्‍या दर्पण या मराठी वृत्‍तपत्राने एक सशक्‍त अशा चौथ्‍या स्‍तंभाचा आधार लोकशाहील दिला. दर्पण दिनानिमित्‍त हा लेख.
                                         - प्रशांत दैठणकर                                                         
  
     जग तंत्राच्‍या आणि तंत्रज्ञानाच्‍या प्रगतीमुळे जवळ आलं आहे. आज हातातल्‍या मोबाईलमध्‍ये दूरदर्शन व इतर वाहिन्‍यांचे कार्यक्रम बघणं शक्‍य झालं आहे. सेाबत इंटरनेटने माहितीची दालनं खुली केली आहेत. या परिस्थितीतही वृत्‍तपत्रसृष्‍टीचे महत्‍व अबाधित आहे. वृत्‍तपत्रांनी जपलेली सामाजिक बांधिलकी आणि विश्‍वसनीयता यामुळे हे शक्‍य झालं आहे.
      वृत्‍तपत्रांना मधल्‍या काळात विविध प्रकारच्‍या आव्‍हानांचा मुकाबला करावा लाला असला तरी आपल्‍या सामाजिक बांधिलकीच्‍या भूमिकेतून वृत्‍तपत्रसृष्‍टीने भारतासारख्‍या सर्वात मोठ्या सक्रीय लोकशाहीमध्‍ये स्‍वतः होवून लोकशाहीचा चौथा स्‍तंभ असं स्‍थान प्राप्‍त केलं आहे.
      समाजाचे कान आणि डोळ असणा-या वृत्‍तपत्रांनी मोठ्या प्रमाणावर सामाजिक जागृती केलेली आहे. विविध चळवळींच्‍या माध्‍यमातून विकासाचे प्रश्‍न मार्गी लावण्‍यात वृत्‍तपत्रांचे महत्‍व  अनन्‍यसाधारण आहे.
      मराठी वृत्‍तपत्रांमध्‍ये सामाजिक जाणीवा मोठ्या प्रमाणावर जपल्‍या जातात. बदलत्‍या काळात बदलत्‍या सामाजिक समस्‍यांची जाण ठेवली जाते. गेल्‍या  काही काळापासून पर्यावरण विषयक जाणीव जागृतीचे काम वृत्‍तपत्रांनी मोठ्या प्रमाणावर चालविलेले आपणास दिसेल. केवळ पर्यावरणास धोका आहे इतकं सांगून न थांबता पुढचं पाऊल म्‍हणून पर्यावरण चळवळीत काम करणारी वृत्‍तपत्रे आपणास दिसतील.
      पर्यावरणास असणारे धोके समाजासमोर मांडण्‍यासेाबतच एडस् आणि एच.आय.व्‍ही. सारख्‍या संवेदनशील विषयावर वृत्‍तपत्रांची भूमिका महत्‍वाची राहिलेली आहे. आपण समाजाचा महत्‍वाचा घटक आहोत. या नात्‍याने समाजातील सर्व घटकांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात राहण्‍याचा अधिकार आहे आणि त्‍यांना मुख्‍य प्रवाहात आण्‍ण्‍यासाठी प्रयत्‍न करणं व त्‍याबाबत प्रबोधन करणं यात वृत्‍तपत्रांचे योगदान खूप मोठे आहे.
      समाजात घडणा-या घटनांचं प्रतिबिंब वृत्‍तपत्रामध्‍ये यावं तसं वृत्‍तपत्रांनी समाजाला दिशा द्यावी असा दुहेरी प्रवास सध्‍या वृत्‍तपत्रासृष्‍टी करीत आहे. यंत्रणांमधील त्रुटी निदर्शनास आणून देत योग्‍य दिशेने विकास प्रक्रिया नेण्‍यात मराठी वृत्‍तपत्राचे योगदान खूप मोठे आहे. टिव्‍ही, इंटरनेट आदी माध्‍यमे आली असली तरी वृत्‍तपत्राचे महत्‍व यामुळेच अबाधित राहिले आहे.

No comments:

Post a Comment