Thursday 5 January 2012

अपघात आणि नागरिक


    रस्‍त्‍यावर वाहनांच्‍या धडकण्‍यामुळे पादचा-यांनाही मोठा धोका असतो. रस्‍त्‍यावर चालायचे कसे आणि काय काळजी घ्‍यायची याची माहिती असल्‍यास असे अपघात आपण सहजरित्‍या टाळू शकतो.
                                   - प्रशांत दैठणकर                                                        
अपघात ही देखील एक आपत्‍ती आहे. या आपत्‍तीचे व्‍यवस्‍थापन आपण विविध प्रकारे करु शकतो. त्‍यात अपघात झाल्‍यावर करण्‍याच्‍या सर्व उपाय योजनांपेक्षा अधिक जोर आपण अपघाताच्‍या प्रतिबंधावरच द्यायला हवा.
     रस्‍ता ओलांडताना वाहनाने धडक देणे त्‍याचप्रमाणे वाहन पादचा-यांच्‍या अंगावर येवून आदळणे या प्रकारातून रस्‍त्‍यांवर चालणा-या नागरिकांना देखील अपघाताला सामोरं जावं लागतं. या दोन्‍ही प्रकारच्‍या अपघातात प्राण गमावणा-यांचे त्‍याचप्रमाणे  अपंग होणा-यांचे प्रमाण मोठे आहे.
     रस्‍त्‍यावर होणा-या या अपघातांप्रमाणेच भारतात रेल्‍वे रुळ ओलांडताना रेल्‍वेखाली मरण पावणा-यांची संख्‍या देखील खूप मोठी आहे. रेल्‍वे स्‍थानकांवर या फलाटावरुन त्‍या फलाटावर जाण्‍यासाठी दादरे उपलब्‍ध करुन देण्‍यता आलेले आहेत मात्र वेळ वाचवण्‍यासाठी रुळ ओलांडण्‍याची असणारी मानसिकता अशा अपघातांचे कारण ठरत असते.
     रस्‍त्‍यांवरुन चालताना रस्‍त्‍याच्‍या कडेने चालणे महत्‍वाचे असते. आपण महामार्गावरुन पायी जात असाल तर शक्‍यतो डांबरी रस्‍त्‍यावर येवू नका. चालण्‍याची दिशा देखील वाहनांच्‍या दिशेच्‍या विरुध्‍द असावी जेणेकरुन आपणास समोरुन येणारे वाहन दिसत राहते. वाहने ज्‍या दिशेने जातात त्‍या दिशेने चालल्‍यास मागून कोणते वाहन येत आहे आणि त्‍याची गती नेमकी किती आहे हे आपणास समजू शकत नसते.
     शहरी भागात मॉर्निंग वॉक तसेच जॉगिंग करणारे अनेक आहेत. काही जण सकाळच्‍या वेळी धावण्‍याचा सराव देखील होतो. या सर्वांसाठी महामार्गाचा तसेच शहरातील मुख्‍यरस्‍त्‍यांचा वापर टाळलेला बरा. बहूतेक अपघात हे याच वेळात होतात याची जाणीव आपणास असली पाहिजे.
     हिवाळ्याच्‍या दिवसात सकाळच्‍या वेळी अनेकदा दाट धुके असते. असा प्रकार उत्‍तर  भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. या प्रकारच्‍या धुक्‍यामुळे समोर काय आहे हे दिसत नाही व त्‍यामुळेच वाहनांचे अपघात होतात. धुक्‍यात रस्‍ता दिसावा यासाठी विशिष्‍ट अशा `फॅग लाईटचा `वापर वाहन धारकांनी केल्‍यास अपघाताची शक्‍यता कमी होईल. अशा अंधुक प्रकाशात वाहनाची गती देखील कमी ठेवायला हवी.
     रस्‍ते  ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर आपण करायला हवा तो लोक करीत नाहीत. ते देखील अपघाताचे कारण ठरते. हे टाळल्‍यास आपण अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी करु शकू.  
                                            - प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment