Tuesday 3 January 2012

महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारीला तर जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

बृहन्मुंबईसह दहा महानगरपालिका, तसेच २७ जिल्हा परिषदा आणि ३०९ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मंगळवारी मुंबईत जाहीर केला. त्यानुसार महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान होईल तर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान होईल. या सर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर मुख्य सचिव चाँद गोयल यावेळी उपस्थित होते.

श्रीमती सत्यनारायण म्हणाल्या, आम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०१२ तर दहावीची परीक्षा १ मार्च २०१२ पासून सुरू होत आहे. परीक्षांचा कालावधी लक्षात घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि निवडणुका वेळेवर घेण्याची संविधानिक जबाबदारीही व्यवस्थित पार पडेल.

महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम

महानगरपालिका निवडणुकीसाठी २४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१२ या कालावधित नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सार्वजनिक सुट्टी व रविवारी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. १ फेब्रुवारी २०१२ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. तसेच त्याच दिवशी वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ३ फेब्रुवारी २०१२ असेल. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी मतदान केंद्रांची व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होईल. १६ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता किंवा सर्व केंद्रांवरील मतदान समाप्तीनंतर मतमोजणी होईल. अथवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेता १७ फेब्रुवारी २०१२ रोजी मतमोजणी होईल.

जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे देण्यास १८ जानेवारी २०१२ पासून सुरवात होईल व २३ जानेवारी २०१२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैध उमेदवारांची यादी २४ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशनपत्रे स्वीकारणे किंवा नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०१२ असेल. या अपिलावर जिल्हा न्यायाधीशांनी निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख ३० जानेवारी २०१२ राहील. तसेच ही अपिले निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी त्याच दिवशी प्रसिद्ध होईल. जेथे अपील नसेल तेथील नामनिर्देशनपत्रे ३० जानेवारी २०१२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. तसेच जेथे अपील असेल तेथील नामनिर्देशनपत्रे १ फेब्रुवारी २०१२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. जेथे अपील नसेल तेथील उमेदवारांची यादी ३० जानेवारी २०१२ रोजी दुपारी ३.३० नंतर प्रसिद्ध केली जाईल. तसेच त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप होईल आणि जेथे अपील असेल तेथे १ फेब्रुवारी २०१२ रोजी दुपारी ३.३० नंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.

१ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ७ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधित मतदान घेण्यात येईल. ८ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस सुरवात होईल.

निवडणूक होणाऱ्या महानगरपालिका

बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर

निवडणूक होणा-या जिल्हा परिषदा

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणा-या पंचायत समित्या.

एकूण जागांचा तपशील

महानगरपालिका : एकूण जागा- १,२४४, महिला- ६२४
जिल्हा परिषदा : एकूण जागा- १,६४१, महिला- ८२८
पंचायत समित्या : एकूण जागा- ३,२५२ महिला- १,६२६

नव्या मतदारांना संधी

निवडणूक होत असलेल्या या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात संपत आहेत. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाने संयुक्तपणे १ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०११ मध्ये `मतदार व्हा` मोहीम राबविली होती. त्यात राज्यभरात एकूण २३ लाख अर्ज प्राप्त झाले असून त्यांची राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत छाननी करण्यात आली आहे. त्यानुसार ५ जानेवारी २०१२ रोजी नवीन मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीमध्ये नव्याने समावेश झालेल्या मतदारांनाही या निवडणुकांमध्ये मतदानाची संधी मिळावी या दृष्टीने महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम आखण्यात आला आहे.

उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ (रुपयांत)
• `अ`वर्ग महानगरपालिका (मुंबई)- १,३५,००० वरून ५,००,०००
• `ब`वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर)- १,००,०० वरून ४,००,०००
• `क`वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक व नवी मुंबई)- १,००,००० वरून ४,००,०००
• `ड`वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व)- १,००,००० वरून ३,००,०००
• जिल्हा परिषदा- ६०,००० वरून ३,००,०००
• पंचायत समित्या- ४०,००० वरून २,००,०००

मतदारांच्या सोयीसाठी
• राज्य निवडणूक आयोगाचे www.mahasec.com हे नवे अद्ययावत संकेतस्थळ
• मतदान केंद्र मध्यवर्ती ठिकाणी असेल
• रांगा टाळण्यासाठी मतदान केंद्रावरील कमाल मतदार संख्येत घट
• बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या १,०००
• उर्वरित महानगरपालिका, जि.प./पं.सं.साठी मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या ८००
• अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था
• अंध, अपंग, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्राधान्य
• राजकीय पक्षांच्या महत्वाच्या पुढाऱ्यांच्या प्रवास खर्चास उमेदवाराच्या खर्चातून सूट
• बाटलीतील शाईऐवजी आता मार्करपेनने मतदारांच्या बोटावर निशाणी
• मतदारांच्या ओळखीसाठी आता `आधार कार्ड`लाही मान्यता
• प्राण्यांचा क्रूरपणे वापर करण्यास प्रतिबंध

No comments:

Post a Comment