Tuesday 3 January 2012

`स्‍कूल बस ` ची सुरक्षा महत्‍वाची ....!

`स्‍कूल बस ` ची सुरक्षा महत्‍वाची ....!
रस्‍ते सुरक्षा पंधवड्याला सुरुवात झाली आणि हरणातल्‍या भीषण अपघाताची बातमी समोर आली. या निमित्‍ताने शालेय मुलांची वाहतूक करणा-या बस आणि सुरक्षेचे नियम याबाबत वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी दिलेली ही माहिती.
लेखक – विजय चव्‍हाण
शब्‍दांकन - प्रशांत दैठणकर

हरयाणातील अंबाला जवळ शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या अपघाताची जी दुर्दैवी घटना घडली त्‍या 12 शाळकरी मुलांचा जीव गेला. क्ष्‍णभर हळळळ व्‍यक्‍त करुन पुन्‍हा जगरहाटीला सुरुवात करण्‍याची आपली सवय असते. आपण या घटनेचे गांभीर्य जाणून आपल्‍या आसपास याबाबत जागरुकता ठेवावी ही शिकवण सा-या पालकांसाठी आहे.
शाळांसाठी मुलांना सोडताना बरेच पालक घराच्‍या कोप-यावर आली बस आणि दिलं मुलांना बसवून त्‍यात या पलिकडे फारसा विचार करताना दिसत नाहीत. केवळ स्‍वस्‍त सेवा आहे. यापेाटी खच्‍चून भरलेल्‍या स्‍कूलबसमध्‍ये मुलांना पाठवणारे अनेक पालक आहेत. बसेससाठी सुरक्षेचे नियम असे आहेत.
शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्‍क, बस थांबे निश्चित करणे या बाबींकडे लक्ष देण्‍यासाठी प्रत्‍येक शाळेची एक परिवहन समिती असेल आणि ही समिती, वाहनाची कागदपत्रे जसेः नोंदणी प्रमाणपत्र, योग्‍यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालविण्‍याचे लायसन, अग्निशामक, प्रथमोपचार पेटी इत्‍यादींची पडताळणी करील.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण हे शालेय व्‍यवस्‍थापन, वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका किंवा नगरपरिषदेशी विचारविनिमय करुन, शाळेच्‍या वेळा आणि मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन, केवळ स्‍कूल बसकरिता यथोचित ठिकाणी वाहनतळ आणि वाहन थांबे विनिर्दिष्‍ट करील.
शाळेच्‍या मालकीच्‍या आणि मुलांची ने-आण करण्‍यासाठी वापरण्‍यात येणा-या वाहनांच्‍या संबंधात परवाना देणे आणि त्‍याचे नूतनीकरण करणे याकरिता प्रत्‍येक अर्ज या नियमान्‍वये अनुसूचीमध्‍ये विहित केलेल्‍या नमुना पी.एससी,सी.ओ.एस. नुसार असेल.
शाळेव्‍यतिरिक्‍त इतरांच्‍या मालकीच्‍या असलेल्‍या आणि शाळेचे कंत्राटी वाहन म्‍हणून वापरण्‍यात येणा-या वाहनांच्‍या संबंधात परवाना देणे आणि त्‍यांचे नूतनीकरण करणे याकरिता प्रत्‍येक अर्ज या नियमांन्‍वये अनुसूचीमध्‍ये विहित केलेलया नमुना पी.सीओ.एस.नुसार असेल.
परवान्‍यामध्‍ये समावेश केलेली वाहने आणि शाळेतील मुलांचे वाहन करण्‍याकरिता केवळ वापर करण्‍यात येणारी वाहने यांना पिवळा रंग देण्‍यात येईल आणि वाहनाच्‍या पुढच्‍या आणि मागच्‍या बाजूला स्‍कूल बस असे लिहिलेले शब्‍द दिसले पाहिजे. तसेच शाळेची ओळख पटण्‍याकरिता वाहनाच्‍या खिडकीखाली सर्व बाजूंना 150 मिलीमीटर रुंदीचा विटकरी पट्टा रंगविलेला असेल ज्‍यावर शाळेचे नाव लिहिलेले असेल.
शालेय कंत्राटाशिवाय अन्‍य कोणतेही कंत्राट असलेल्‍या वाहनांना पिवळा रंग आवश्‍यक असणार नाही. परंतु वाहनाच्‍या खिडकीखाली सर्व बाजूंना 400 मिलीमीटर पिवळ्या पट्टीने रंगविलेले असले पाहिजे. स्‍कूल बस म्‍हणून वापरण्‍यात येणारे वाहन सुरुवातीच्‍या नोंदणीच्‍या दिनांकापासून 15 वर्षाहून अधिक जुनी असता कामा नये.
वाहनासोबत, ने-आण करणा-या शाळेतील मुलांची संपूर्ण यादी असेल ज्‍यामध्‍ये प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांचे नाव, वर्ग निवासाचा पत्‍ता, संपर्क दूरध्‍वनी किंवा भ्रमणध्‍वनी क्रमांक, रक्‍तगट आणि त्‍याचया किंवा तिच्‍या नावासमोर त्‍याला किंवा तिला चढण्‍याकरिता व उतरण्‍याकरिता थांबण्‍याचे ठिकाण त्‍याच्‍या किंवा तिच्‍या घराजवळील या गोष्‍टी नमूद केलेल्‍या असतील. यादीमध्‍ये मूळ ठिकाण, समाप्‍तीचे ठिकाण आणि वापरण्‍यात येणारा तपशीलवार मार्ग दाखवणारा शैक्षणिक संस्‍थेच्‍या मुख्‍य व्‍यक्‍तीकडून यथोचितरीत्‍या साक्षांकित केलेला मार्गदेखील नमूद केलेला असेल.
प्रत्‍येक स्‍कूल बसमध्‍ये चालकाव्‍यतिरिक्‍त, महाराष्‍ट्र मोटार वाहन नियम 1989 च्‍या नियम 249 मध्‍ये विहित केल्‍याप्रमाणे एक सहवर्ती असेल. तसेच मुलींची ने-आण करीत असलेलया स्‍कूल बसच्‍या बाबतीत, बसमध्‍ये स्‍त्री सहवर्ती उपस्थित असली पाहिजे जी स्‍कूल बसमध्‍ये प्रवास करणा-या मुलींच्‍या गरजांकउे लक्ष देईल आणि सकूल बसमधून चढताना किंवा उतरताना त्‍यांच्‍या सुरक्षेची खात्री घेईल आणि संपूर्ण प्रवासाच्‍या वेळी सर्वसामान्‍यपणे काळजीदेखील घेईल.
निकडीच्‍या प्रसंगी चालक आणि सहवर्ती शाळेच्‍या प्राधिका-यांना प्रसंगाची माहिती देतील आणि शाळेतील मुलांच्‍या सुरक्षेसाठी आवश्‍यक व्‍यवस्‍था करतील.
शिशुवर्गातील मुलांच्‍या बाबतीत जर अधिकृत व्‍यक्‍ती (शाळा आणि पालक यांनी परस्‍पर सहमतीने मान्‍यता दिलेली व्‍यक्‍ती) बस स्‍टॉपवर मुलाला घ्‍यायला आली नाही तर, त्‍या मुलाला पुन्‍हा शाळेत पाठविण्‍यात येईल आणि त्‍याच्‍या पालकांना बोलावून ते मूल त्‍यांना घेऊन जाण्‍यास सांगण्‍यात येईल.
चढण्‍याची खालची पायरी जमिनीपासून 220 मिलीमीटरपेक्षा अधिक उंचीची नसावी आणि सर्व पाय-या पाय न घसरणा-या असल्‍या पाहिजेत.
स्‍कूल बसमध्‍ये बहिर्वक्र भिंगाचा आरसा असला पाहिजे ज्‍यामुळे चालक मोटार वाहनाचा बाहेर पडण्‍याचा दरवाजा व प्रवेश दरवाजा आणि मागील भाग स्‍पष्‍ट बघू शकेल आणि चालकाला बसच्‍या आतील भागातील सर्व दृश्‍य स्‍पष्‍ट दिसू शकेल यासाठी मोठा पॅराबोलिक आरसा देखील असेल.
स्‍कूल बसमध्‍ये पुढील दरवाजाच्‍या पाय-यांसांबत हाताने धरता येणा-या कठड्याची तरतूद असली पाहिजे जिचा वापर दरवाजातून आत येणे आणि बाहेर पडणे यासाठी करण्‍यात येईल. हाताने धरता येणा-या कठड्याची उंची, धातू, रचना शासनाने जारी केलेल्‍या सर्वसाधारण निर्देशांप्रमाणे असेल.
सकूल बसमध्‍ये उभा दांडा (स्‍टॅन्चियन) असेल, प्रत्‍येक दांडा यथोचित अंतरावर असेल आणि तो छतामध्‍ये आणि तळपृष्‍ठाला घट्ट गुंतलेला असेल आणि वाहनाची जमीन न घसरणा-या धातूने बनवलेली असेल, ते धातू शासनाने जारी केलेल्‍या सर्वसाधारण निर्देशांप्रमाणे असेल.
स्‍कूल बसमध्‍ये कोणताही प्रेशर हॉर्न जोडलेला नसला पाहिजे किंवा कर्कश आवाज करणारे जे ब्रेक यंत्रणेमधून हवेच्‍या दाबाने नियंत्रित होत असेल असे अन्‍य कोणतेही साधन बसवलेले नसले पाहिजे.
स्‍कूल बसमध्‍ये वरील बाजू काचेची असलेली प्रथमोपचार पेटी आणि आ.एस.आय.मार्ग असेलेली प्रत्‍येकी 5 किलो क्षमतेची ए बी सी प्रकारची दोन अग्निशामके ठेवणे आवश्‍यक असेल त्‍यापेकी एक चालकाच्‍या केबीनमध्‍ये असेल आणि दुसरे मागे बसच्‍या आणीबाणीच्‍या दरवाजाच्‍या जवळ असेल. परंतु बारापर्यंत आसन क्षमता म्‍हणून नोंदणी असलेल्‍या हलक्‍या चार चाकी मोटार वाहनामध्‍ये आय.एस.आय.मार्क असलेली 5 किलो क्षमतेचे एबीसी प्रकारचे एक अग्निशामक पुरेसे असेल.
बसमध्‍ये आसनाखाली बँग ठेवण्‍याच्‍या रॅकची तरतूद असली पाहिजे आणि परिवहन आयुक्‍तांमार्फत त्‍यांच्‍या आदेशाने वेळोवेळी विनिर्दिष्‍ट केलेलया अशा इतर गोष्‍टींची तरतूद असली पाहिजे. अशा वाहनाच्‍या चालकाकडे 5 वर्षे वाहन चालविण्‍याचा अनुभव असला पाहिजे आणि तो परिवहन अनुज्ञप्‍तीधारक असला पाहिजे आणि स्‍कूल बस चालविण्‍याच्‍या सेवेत असताना वैध बिल्‍ला धारण करीत असला पाहिजे. स्‍कूल बसमध्‍ये धोक्‍याचे इशारे देणारी प्रकाशयोजना (लाईट) असल्‍या पाहिजेत ज्‍यामुळे जेव्‍हा मुले चढताना किंवा उतरताना असे वाहन थांबेल तेव्‍हा त्‍या चालू होतील.
शैक्षणिक संस्‍थेची बस आणि मध्‍यम किंवा जड प्रवासी मोआर वाहने शाळेतील विद्यार्थ्‍यांची ने-आण करण्‍याच्‍या प्रयोजनासाठी वापरण्‍यात येत असतील त्‍या बाबतीत, खिडकीला 3 आडवे स्‍टीलचे दांडे बसच्‍या बाहेरील बाजूने जोडलेले असले पाहिजेत त्‍या कोणत्‍याही दोन दांड्यांमधील अंतर हे पाच सेंटीमीटरपेक्षा अधिक असणार नाही अशारीतीने ते जोडलेले असले पाहिजे. वाहनाला वेगनियंत्राक जोडलेले असले पाहिजे त्‍यामुहे महानगरपालिकेच्‍या हद्दीमध्‍ये वाहनाचा वेग 40 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक असणार नाही आणि महानगरपालिकाव्‍यतिरिक्‍त हद्दीमध्‍ये तो 50 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक असणार नाही.
वाहन शालेय प्रयोजनासाठी वापरण्‍यात येत आहे ही वस्‍तुस्थिती दर्शविण्‍याकरिता वाहनाच्‍या पुढच्‍या व मागच्‍या बाजूस घट्टपणे चिकटवलेला 350 मिलीमीटर x 350 मिलीमीटर आकाराचा फलक असला पाहिजे. त्‍या फलकावर काळ्या रंगाच्‍या 250 मिलीमीटरपेक्षा कमी नसेल इतक्‍या उंचीच्‍या शाळेत जाणा-या दोन मुलांची (एक मुलगी व एक मुलगा) चित्रे रंगविलेली असली पाहिजेत. चित्रांच्‍या खाली काळ्या रंगांमध्‍ये स्‍कूल बस असे लिहिलेले असले पाहिजे आणि त्‍या अक्षरांची उंची किमान 100 मिलीमीटर इतकी असली पाहिजे आणि जाडी (रुंदी) किमान 11 मिलीमीटर इतकी असली पाहिजे.
आसनक्षमता बारापर्यंत असलेलया चार चाकी हलके मोटार वाहन याव्‍यतिरिक्‍त असलेलया प्रत्‍येक स्‍कूल बसवर शाळेची ओहख दर्शविणारा एक फलक दिसेल असा असावा ज्‍यावर मार्ग क्रमांक लिहिलेला असावा आणि तो फलक 30 इंच आकाराचा आणि 8 इंच उंचीचा असावा जो पुढे वरच्‍या बाजूस आणि मागे वरच्‍या बाजूस दिसेल असा असावा आणि प्रवेशव्‍दार /बोहर पडण्‍याच्‍या दरवाजावरील फलकाची लांबी 18 इंचाच्‍या आकाराची आणि उंची 8 इंचाची असावी.
शाळेतील मुलांची ने-आण करण्‍याकरिता वापरण्‍यात येणारे बारापर्यंत आसन क्षमता असलेले प्रत्‍येक चार चाकी हलके मोटार वाहन यावर शाळेची ओहख दर्शविण्‍यासाइी आणि वाहनाचा मार्ग क्रमांक ओळखता येण्‍यासाठी एक फलक असेल जो पुढील बाजूच्‍या वरच्‍या भागावर आणि मागच्‍या बाजूच्‍या वरच्‍या भागावर दिसेल. या फलकाची लांबी 18 इंचाच्‍या आकाराची आणि उंची 8 इंचाची असेल.
महाराष्‍ट्र मोटार वाहन नियम 1989 याच्‍या नियम 20 च्‍या तरतुदींचे परवानाधारकाकडून तसेच चालकाकडून काटेकोरपणे पालन करण्‍यात येईल. स्‍कूल बस म्‍हणून वापरण्‍यात येणा-या वाहनाची संपूर्ण स्‍टील बॉडीसह बंद स्‍वरुपाची बॉडी असेल. कोणत्‍याही कॅनव्‍हास हूड असलेलया वाहनास स्‍कूल बस म्‍हणून मान्‍यता देण्‍यात येणार नाही. वाहनामध्‍ये मुलांसाठी लॉक यंत्राणा जोडलेली असावी.
या प्रवर्गाखाली नोंदणी करण्‍यात आलेली वाहने ही मोटार वाहन अधिनियम 1988 व त्‍याखाली करण्‍यात आलेले नियम यांच्‍या तरतुदीनुसार योग्‍यतेच्‍या चाचणीच्‍या अधीन असतील. जेथे जेथे उपलब्‍ध असेल तेथे शाळेचे प्राधिकारी, शाळेतील मुलांना वाहनांमधून सुरक्षितपणे उतरण्‍यासाठी शाळेच्‍या परिवास्‍तूमध्‍ये जागेची तरतूद करतील. महाराष्‍ट्र मोटार वाहन नियम 1989 याच्‍या नियम 106 च्‍या तरतुदींनुसार स्‍कूल बसमध्‍ये परवानगी देण्‍यात आलेल्‍या मुलांची संख्‍या निर्धारित करण्‍यात येईल.
स्‍कूल बस म्‍हणून वापरण्‍यात येणा-या बसमध्‍ये राज्‍य परिवहन प्राधिकरणाने वेहोवेळी विनिर्दिष्‍ट केलेले संकटकालीन बाहेर पडण्‍याचा दरवाजा किंवा बाहेर पउण्‍याची खिडकी जोडण्‍यात येईल. सर्व स्‍कूल बस, केंद्र सरकार वेळोवेळी विनिर्दिष्‍ट करेल त्‍याप्रमाणे बस बॉडी संकल्‍प चित्र आणि मान्‍यता एआयएस 063 आणि एआयएस 052 याकरिता व्‍यवसाय संहिता याव्‍दारे विहित केलेलया आवश्‍यकातांचे आणि विनिर्देशांचे अनुपालन करतील.
परिवहन आयुक्‍त, स्‍कूल बस म्‍हणून वापरण्‍यात येतील अशा सर्व वाहनांच्‍या प्रतिमानांना मान्‍यता देईल. तसे करताना, परिवहन आयुक्‍त, मुलांच्‍या सुरक्षा लक्षात घेऊन उत्‍पादकाने पुरविलेल्‍या सुरक्षाविषयक तरतुदींची खातरजमा करील. राज्‍य शासनास लेखी कारणे दिल्‍यानंतर एका किंवा त्‍यापैकी कोणत्‍याही शर्तीमधून स्‍कूल बस म्‍हणून नोंदणी झालेल्‍या वाहनांना सूट देता येईल.
शालेय बस संदर्भात जे नियम आहेत त्‍याचे पालन होते की नाही यासाठी शासनाने समिती बनविलेली आहे. राज्‍यात शाळेच्‍या मुलांची वाहतूक करणा-या एकूण 5688 बसेस आहेत. त्‍यापैकी सुरक्षा नियमांची पूर्तता करणा-या बसेसची संख्‍या 1780 आहे. नियमावली लागू झाल्‍यानंतर नोंदणी झालेल्‍या बसेसची संख्‍या 1215 इतकी आहे.
वर्धा जिल्‍ह्यात एकूण 36 बसेस शालेय मुलांची वाहतूक करतात पैकी 9 बसेसनी नियमांची पूर्तता केली आहे. परिवहन विभागातर्फे याबाबत सातत्‍याने पाठपूरावा होत आहे तथापि शाळेतील समित्‍या आणि सर्व पालकांनी याबाबत आग्रही भूमिका ठेवण्‍याची गरज आहे.
विजय चव्‍हाण
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,वर्धा

No comments:

Post a Comment