Saturday 7 January 2012

मन: शांती आणि अपघात... !



     यांत्रिक चुकांपेक्षा मानवी चुकांनी अधिक अपघात होतात. या चुकांचे कारण मानवी मनाच्या वृत्तीत आणि काही सवयींमध्ये आहे. या मनावर ताबा मिळवता आला आणि शांतचित्त, प्रसन्न विचारांनी एकाग्रतेने व सावधपणे वाहन चालविले तर अपघात टळू शकतात. सुरक्षा सप्ताहानिमित्त हा खास लेख.
                                                -प्रशांत दैठणकर   
      रस्त्यावर होणा-या अपघातात यांत्रिकी चूका कमी आणि मानवी चूका अधिक असल्याचे दिसून येते. या चुका कधी मृत्यूचे कारण ठरतात तर कधी आयुष्यभराच्या अपंगत्वाच्या. या चुकांपैकी काही नेमकेपणाने सांगायच्या झाल्या तर यात पहिला क्रमांक मद्यपानाचा आहे. त्या सोबत वेगाचं असणारं वेड देखील अनेकदा अपघाताचं कारण ठरतं. माणसांकडून यात भर पडली आणि गेल्या काही वर्षात यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले ते मोबाईल फोनचा वापर करण्यामुळे.
       फाजिल आत्मविश्वास हे देखील अपघाताचे एक कारण ठरते. त्यासोबतच स्पर्धा करण्याची वृत्ती देखील अपघातास कारणीभूत असते. या दोन्ही बाबींप्रमाणे वेगाचं वेड हा देखील मानवी मनाचाच एक पैलू आहे. मनात वेगवेगळे विचार घोळत असतील तर त्या स्थितीत एकाग्रता न राहिल्यानेही अपघात होत असतो.
     आपल्याला सा-या जगाची घाई आहे अशा थाटात वाहन चालवण्याची सवय बहुतेक जणांना असते. अशी ही घाई आणि फाजिल आत्मविश्वास यामुळे गाडी ओव्हरटेक करताना गतीचा अंदाज चुकल्याने अनेक अपघात होतात. अनेकदा आपल्याला जे वाहन ओव्हर टेक करायचे आहे. त्याची लांबी आणि गती यामध्ये गल्लत करुन घेतल्याने अपघात होतात.
     उभ्या ट्रकवर पाठीमागून वाहन आदळण्याचे प्रमाण अपघातात खूप अधिक आहे. अशा प्रकारचे अपघात हे झोप येत असतानाही हट्टीपणा करुन गाडी चालवायची यामुळे होतो. जर ते वाहन उभे आहे तर आपण एकाग्रतेने लक्षपूर्वक गाडी चालवली तर असे अपघात कमी होतील. या अपघातांचे आणखी एक कारण म्हणजे प्रचंड गतीने वाहन चालवण्याची असणारी सवय. या गतीमुळे अचानक एखाद्या वळणावर समोर उभ्या वाहनावर आपले वाहन आदळून अपघात होवू शकतो याचं भान आपण ठेवायलाच हवं.
     अपघाताचं आणखी एक कारण म्हणजे अप्रशिक्षित व्यक्तीने वाहन चालवणे. गाडी पुसण्यासाठी असणारा क्लीनर आपल्याकडे ड्रायव्हर होताना दिसतो अशा पध्दतीने वाहनचालक होण्याचे योग्य प्रशिक्षण नसेल तर अनेकदा वाहन अनियंत्रित होण्याचे कारण कळत नसल्याने अशा व्यक्ती अपघात करतात.
     वाहन चालविणे ही एक कला आहे. वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घ्यावं आणि सशस्त्र आणि प्रसन्न मनाने स्टिअरिंग हाती घेवून मनावर ताबा ठेवला तर निमे अपघात टळतील.
                                                     -प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment