Monday 14 November 2011


विशेष लेख क्र.                     वर्धा, दि.14 नोव्हेंबर 2011
------------------------------------------------------------
   
आनंदाचं झाड...

       सासू आणि सून यांच्यातला संघर्ष छोटया पडद्यावर आपण नेहमी बघतो. घरात येणारी सून संसारात नवी आहे ती चुकांमधून शिकेल, आपण ज्येष्ठ आणि अनुभवी आहोत या भूमिकेतून सासुने घरातल्या सुनेला वागवले तर कुटुंब टिकू शकते.

- प्रशांत दैठणकर


       टिव्हीवर कोणतही चॅनेल लावल्यास आपणास चित्र दिसतं ते सासू आणि सून यांच्या रंगणा-या भांडणाचं दोन पिढ्यांमधील हा संघर्ष छोट्या पडद्यावर दिसतो याला कारण अर्थातच घराघरात असा संघर्ष रंगत असतो. या संघर्षाला काही कारणं असली तरी यांचे मुळ कारण प्रभूत्ववाद हेच असतं. दोन पिढ्यात चालणा-या भांडणाला मिटविण्यासाठी दोन्ही पक्षांनी समजूतदारपणा दाखवावा असं वाटत राहतं.
     नऊ महिने पोटात वाढवून जन्माला घातलेला पोटचा गोळा आई लाडानं वाढवते. आयुष्यात आनंदाच्या अनुभूतीचा सडा शिंपणारं ते आनंदाचं झाड झपाट्याने वाढतं. एके दिवशी त्याला त्याच्या आयुष्याची जोडीदार सापडते आणि या आनंदाच्या झाडाची मालकी हिरावली गेलीय असं त्या मातेच्या लक्षात येतं. तिथं येणा-या सूनेची आसुया वाटल्यानं हा संघर्ष निर्माण होतो.
    आसुयेतून होणारा हा संघर्ष केवळ त्या व्यक्तीच्या प्रेमापोटी असतो इथवर ठिक आहे मात्र आज घराघरात जो संघर्ष दिसतो तो संघर्ष नसून छळ आहे. हा छळ पैशांच्या लोभापायी होताना दिसेल. माहेरुन त्या मुलीने किती संपत्ती आणली आहे याच्या मोजमापावर तिला वागणूक देत तिचा छळ करणा-या आणि प्रसंगी जाळून मारणा-या कुटुंबियांना शिक्षा ही व्हायलाच हवी.
     साधारणपणे माझा मुलगा, मी लहानाचा मोठा केलाय त्याला असं म्हणणारी सासू आणि माझा पती माझा जन्मभराचा साथी, ज्याच्यासाठी मी माहेरचं घर सोडून आले असं म्हणणारी सून यांच्यातला संघर्ष फारसा गंभीर नसतो. तिथं प्रभुत्ववादातून मुलगा आणि पती या दोन भिन्न दिशांमधून बघणा-या महिलांमधील तो संघर्ष असतो. स्त्रीसुलभ स्वभानानुसार एकमेकींना टोमणे मारण्यापर्यंत त्याचा प्रवास असतो.
     घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच या समजूतदार पणातून या टोमण्यांकडे दुर्लक्ष केलं गेले पाहिजे म्हणजे नात्यांमध्ये कटुता निर्माण होत नाही. व्यक्ती पेक्षा कुटुंब श्रेष्ठ ही संकल्पना मान्य केली तर असा संघर्ष घर टिकवतो. मात्र यात टोकाची भूमिका घेतली गेली तर घर दुभंगायला वेळ लागत नाही.
     मुलानेही आपली पत्नीप्रती असणारी भूमिका तपासून घ्यायला हवी. सहचारिणी या धर्माचं पालन करणा-या त्या स्त्रीकडे तितक्याच आदराने आणि प्रेमाने रहायला हवं. लग्न झाल्यावरही
केवळ आईचंच ऐकणारा मुलगा असला तर आजकालच्या मुली घटस्फोट घ्यायला मागेपुढे बघत नाहीत याच कारणाने भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.                
      संसार सुरु करणारी आपली सून मुली सारखीच आहे. तिला संसाराचा अनुभव नाही. आपणास अनुभव आहे. हा अनुभव सुनेच्या संसाराला लवकर सुरळीत करु शकतो. या भूमिकेतून सुनेला संसार शिकवणा-या सासूंचे प्रमाण तुलनेत कमी आहे. या भूमिकेतून संसारात गोडी निर्माण करणं शक्य आहे. आपणही कधीतरी संसार असाच सुरु केला होता असा दृष्टीकोन ठेवायला हवा.
शहरीकरण वाढल्‍यानं चौरस कुटुंबे तयार होत आहेत आणि वाढत आहेत. अशा स्थितीत कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी दोन्ही पिढयांनी एक एक पाऊल पुढे टाकून जवळ आल्यास कुटुंब व्यवस्था टिकेल.
     कुटुंबातील प्रत्येक घटक महत्वाचा आणि प्रत्येक नातं तितकच महत्वाचं मानून जिव्हाळा टिकवावा म्हणजे कुटुंब व्यवस्था असणारा सुसंस्कारी देश ही आपल्या देशाची जगभरात असणारी प्रतिमा कायम राहील.
-         प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment