Tuesday 15 November 2011

आता लवकरच येणार 4 जी


     
       तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असते आणि हा बदल यापुढेही सुरुच राहणार आहे. देशात मोबाईल धारकांची संख्‍या 80 कोटी झाली मात्र 3 जी तंत्रज्ञान मोजक्‍या लोकांपर्यंतच पोहोचलं. आता पाठोपाठ आयुष्‍याची दिशा पूर्णपणानं बदलणारं 4 जी तंत्रज्ञान भारताच्‍या वाटेवर आहे. त्‍याबाबत महिती देणारा लेख.
                                 -प्रशांत दैठणकर                                                         


संपर्कात मोबाईल तंत्रज्ञानाने मोठी क्रांती घडवली आणि आता भारतात सर्व ठिकाणी 3 जी तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे. हे तंत्रज्ञान तसं अद्यापही महागडं असल्‍याने समान्‍य जणांना याचा वापर अद्याप आवाक्‍याबाहेरची बाब बनली आहे. त्‍यातलं पुढचं पाऊल म्‍हणजे 4 जी तंत्रज्ञान हे अद्याप भारतात आलेलं नाही मात्र चीन आणि अमेरिका यात अग्रेसर आहेत.

4 जी तंत्रज्ञान आपल्‍या जगण्‍याची पूर्ण पध्‍दतच बदलून टाकेल इतक्‍या ताकदीचं तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेने वापरात आल्‍यावर घरातील सर्व यंत्राची किल्‍ली आपल्‍या हातात असणा-या मोबाईल फोनवर एकवटेल इतकेच नव्‍हे तर विद्यूत गतीने माहितीचे वहन करण्‍यासोबतच जगभरातील मनोरंजनाची सर्व साधने आपल्‍या हाती येतील.

इंरटनेट सर्वप्रथम भारतात सुरु झालं त्‍यावेळी त्‍याचा वापर `डायलअप` पध्‍दतीने दूरध्‍वनी आणि मोडेमच्‍या सहाय्याने होत असे. त्‍यावेळी ही सेवा देणारे पुरवठादार देखील मोजके होते. साधारण सात ते आठ मेगाबाईटची फाईल आपल्‍याला डाऊनलोड करायची असेल तर त्‍यासाठी आपणास दोन-दोन तास बसावं लागे असा तो काळ आला होता.

नंतरच्‍या काळात आलेल्‍या ब्रॉडबॅन्‍ड सेवेने गतीची परिमाणे बदलली. सोबत मोबाईलच्‍या तंत्रात विकास झाला. संचारासाठी आवश्‍यक स्‍पेक्‍ट्रम शासनाचे मुक्‍त केल्‍याने आता 3 जी तंत्रापर्यंत आपण आलो आहोत,त्‍यामुळे सात ते आठ मेगाबाईटची फाईल ही आज सेकंदात डाऊनलोड होते. 21 मेगाबाईट प्रतिसेकंद पर्यंतची गती आपणास यात प्राप्‍त होते. त्‍यामुळे रिअल टाईम टिव्‍ही देखील आपण आता मोबाईल फोनवर किंवा संगणकावर सहजरित्‍या बघू शकतो.

वेळेची ही परिमाणं बदलण्‍यात जसा स्‍पेक्‍ट्रमचा वाटा आहे तसाच तो गतीसाठी लागणा-या गतिमान यंत्रांचा अर्थात प्रोसेसर्स, रॅम यात झालेल्‍या विकासाचाही वाटा आहे. अॅपलने आपला आयफोन साधारण 5 वर्षांपूर्वी बाजारात सादर केला होता. अमेरिकेने चांद्रयान पाठवून चंद्रावर पोहोचण्‍याचा प्रयत्‍न केला आणि नील आर्मस्‍टॉंग यांने चंद्रावर पाऊल ठेवलं त्‍या मोहिमेसाठी जितकी मोठी व भव्‍य संगणक शक्‍ती वापरली तितकी किंवा त्‍याहून अधिक शक्‍ती आयफोनच्‍या रुपानं माणसाच्‍या हातात आणि खिशात आली होती. आता याच आयफोन श्रेणीतील पाचवी पिढी बाजारात उतरविण्‍यात आली आहे. त्‍यात वाढ तर नक्‍कीच झाली आहे.

3 जी तंत्रात प्रतिसेकंद कमाल वहन शक्‍ती 30 मेगाबाईट प्रतिसेकंद इतकी आहे. तर 4 जी तंत्रात माहितीच्‍या वहनाची कमाल गती 1 गिगाबाईट प्रतिसेकंदापर्यंत आहे. आपण सध्‍या जे संगणक वापरतो त्‍याची साठवण क्षमता 500 गिगाबाईटपर्यंत असते. या पूर्ण साठवणीचे वहन करायला फक्‍त अधिकाधिक दहा ते बारा मिनिटे पुरेशी होतील.

मानवी मेंदूने या सा-या यंत्राना अस्तित्‍वात आणले मात्र त्‍याची आजची प्रगती खरोखर मेंदूच्‍या क्षमतेपलीकडची ठरली आहे. मेंदूने शोधलेलं तंत्र त्‍यामुळे येत्‍या काळात अधिकाधिक मनं जवळ आणेल. अशी अपेक्षा आपण बाळगायला हरकत नसावी.
                                     - प्रशांत दैठणकर

      आता लक्ष द्यावंच लागेल ... 

    स्त्री भ्रुण हत्‍त्‍या हा सामाजिक कलंक आहे. हा प्रकार सोनोग्राफी यंत्राचा शोध लावणा-या आणि त्‍याहीपेक्षा प्रगत तंत्र वापरणा-या विकसित देशांमध्‍ये होत नाही हे विशेष. विकसित देशात मुलींचे दरहजारी प्रमाण एक हजार पेक्षा अधिक आहे. आपल्‍याला आता यावर विचार करावाच लागेल.
                                 -प्रशांत दैठणकर                                                        
      भारतात दरहजारी मुलींचे प्रमाण घटतच आहे. विज्ञानाने प्रगती साधली मात्र त्‍या प्रगतीचा गैरवापर आपण केल्‍यामुळे अनेक तोटे होत आहेत. त्‍यापेकी हा सर्वात मोठा तोटा असून ही सर्वात गंभीर बाब आहे. ज्‍या देशांमध्‍ये संशोधन झाले त्‍यांनी याचा गैरवापर कधीही केलेला नाही असे आकडेवारीवरुन स्‍पष्‍ट होते. हे तंत्र अर्थात अल्‍ट्रासोनोग्राफीचे आहे.
     ध्‍वनीलहरींच्‍या सहाय्याने पाण्‍याच्‍या आत अस्तित्‍व लपविणा-या पाणबुडी शोधण्‍याच्‍या या ध्‍वनीलहरीच्‍या यंत्राचा शोध दुस-या महायुध्‍दाच्‍या काळात लागला. समुद्राच्‍या पाण्‍यात ध्‍वनीलहरी सोडल्‍यानंतर त्‍या लहरी अडथळा असतील तेथून परत येतात त्‍या आधारे शत्रू पक्षाच्‍या पाणबुडीचा पत्‍ता लागायचा. या तंत्राने युध्‍दात जितके जीव घेतले नसतील त्‍यापेक्षा अधिक जीव नंतरच्‍या काळात प्रगत अवस्‍थेतील सोनोग्राफी यंत्राच्‍या मदतीने घेण्‍यात आले ही खचितच दुर्दैवी बाब आहे.
     कोणतेही शास्‍त्र मानवाच्‍या प्रगतीसाठी वापरले गेले पाहिजे पण प्रत्‍यक्षात काही ठिकाणी याच्‍या विपरित घडताना दिसते. याला कारण अर्थात भारतात असणारा वंशाचा दिवा पेटविण्‍याचा पगडा होय. हा पगडा पिढ्या-न-पिढ्या याच पध्‍दतीने असला तरी पूर्वी मूलगा होण्‍याची वाट बघितली जात होती आता मात्रा तसं न करता मुलगाच होईल यासाठी सोनोग्राफीचा गैरवापर केला जात आहे. त्‍यामुळे मुलींचे प्रमाण झपाट्याने घसरले आहे. 
काही विकसित देशांमधील दरहजारी मुलींचे प्रमाण बघितल्‍यावर आपण खरच किती मागे आहोत हे कळतं रशियात हजार मुलांमागे मुलींच्‍या जन्‍माचे प्रमाण 1165 इतके आहे तर फ्रान्‍समध्‍ये हेच प्रमाण 1056  इतके असून जपान 1054, जर्मनी 1038, इंग्‍लंड  1037, ब्राझील  1031 , द. आफ्रीका 1028, अमेरिका 1026, कोरिया 1020, ऑस्‍ट्रलिया 1011, इथिओपिया 1010 आणि इंडोनेशिया 1003 इतके सशक्‍त आहे.
     जगात मुलींचे दर हजारी प्रमाण कमी असणा-या देशांमध्‍ये भारतासह (940), नायजेरिया (995), मलेशिया (970), इराण (968), चीन (927) आणि सौदी अरेबिया (927), पाकिस्‍तान (943), बांगला देश (978) असे आहे.
     सार्क देशांचा विचार करताना श्रीलंका (1034), नेपाळ (1014) या देशांमध्‍येही स्‍त्री भ्रुण हत्‍त्‍या होत नाहीत हे स्‍पष्‍ट होते. भारतात घटलेले प्रमाण आकडेवारीत 940 हा आकडा दाखवत असले तरी आपली लोकसंख्‍या 120 कोटी असल्‍याने ही स्थिती खूपच गंभीर आहे असेच म्‍हणावे लागेल. चीनमध्‍ये एका कुटुंबाला एक अपत्‍य असा कायदा आहे मात्र इतकी लोकसंख्‍या वाढल्‍यानंतरही भारतात असा कायदा झालेला नाही याचीही आपणास स्‍वतंत्रपणे नोंद घ्‍यावी लागेल.
     स्‍त्री आणि पुरुष यांच्‍या शिवाय संसारच सुरु होत नाही ही बाब सर्वांना माहिती आहे परंतु केवळ मुलाच्‍या अट्टहासापायी जन्‍माला येणा-या मुलीला जन्‍म घेण्‍याचा हक्‍क आपण नाकारतोय हे कितपत योग्‍य आहे यावर सर्वांनी विचार करावा.
                                     - प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment