Wednesday 16 November 2011

शासकीय जिल्‍हा ग्रंथालयात 3 दिवसीय दिवाळी अंक प्रदर्शनास आरंभ


                  महाराष्ट्र शासन
प्रसिध्‍दी पत्रक   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.16/11/2011
--------------------------------------------------------------------
        वर्धा,दि.16- (जिमाका) – पुस्‍तकं वाचणे ही सवय अंगी बाणवून घेतली तर आयुष्‍यात यश मिळविणं अवघड नाही असे प्रतिपादन जिल्‍हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी शासकीय जिल्‍हा ग्रंथालयात आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्‍या उदघाटन प्रसंगी केले.
    ग्रंथालयातर्फे आयोजित हे प्रदर्शन शुक्रवार 18 नोव्‍हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. नियोजन अधिकारी डायरे यांनी फित कापून व दिप प्रज्‍वलन करुन या प्रदर्शनाचे उदघाटन केले.
     या प्रसंगी अध्‍यक्षस्‍थानी डॉ. कोटेवार हे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर हे होते. व्‍यासपीठावर जिल्‍हा  ग्रंथपाल सुरज मडावी  यांचीही उपस्थिती होती.
या दिवाळी अंकाच्‍या प्रदर्शनात विविध विषयांना वाहिलेले 145 दिवाळी अंक मांडण्‍यात आले आहेत. साहित्‍य, विनोद, मनोरंजन, चित्रपट, उद्योजक, गृहीणी, पाककला, ज्‍योतिष्‍य तसेच बालकांसाठीचे गट यात करण्‍यात आलेले आहेत अशी माहिती जिल्‍हा ग्रंथपाल मडावी यांनी प्रास्‍ताविकात दिली.
     स्‍पर्धेच्‍या या युगात बुध्‍दीच्‍या बळावर आपण यश प्राप्‍त करु शकतो. बुध्‍दी कुशाग्र व्‍हावी यासाठी पुस्‍तकांचं वाचन आवश्‍यक आहे असे उदघाटक डायरे यांनी आपल्‍या भाषणात सांगितले.
     आयुष्‍यात यश प्राप्‍त करण्‍यासाठी प्रचंड मेहनत उपसण्‍याची आणि ध्‍येय्याकडे जाणारे मार्ग शोधण्‍याची गरज आहे असे प्रशांत दैठणकर यांनी आपल्‍या भाषणात सांगितले. वाचक संख्‍या  वाढण्‍यासाठी   शालेय स्‍तरापर्यंत पोहोचून बाल वाचक शोधावे आणि बाल वाचकांची संख्‍या वाढवावी यासाठी प्रयत्‍न झाले पाहिजेत असे डॉ. कोटेवार यांनी अध्‍यक्षीय समारोपात सांगितले.
कार्यक्रमात उपस्थितांचे स्‍वागत जिल्‍हा ग्रंथपाल सूरज मडावी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विजय मुळे यांनी केले.
                    

No comments:

Post a Comment