Saturday 8 October 2011

एक ठिपका दर्जेदार शिक्षणासाठी..!






चिमुकल्या शाळकरी हातांनी ` एक साथ नमस्ते ` म्हणत झालेलं स्वागत तर कुठे वर्गात शिरताच ` गुड मॉर्निंग सर, क्लॅप, क्लॅप, क्लॅप म्हणत टाळया वाजवणारे हात गणवेषात सज्ज मुलं आणि नेमकं आता काय होणार असा भाव चेह-यावर घेऊन उभी शिक्षक मंडळी त्यासोबत संस्थेचे पदाधिकारी. हे चित्र आहे शालेय पटपडताळणी दरम्यानचं .

राज्यात ३ ते ५ ऑक्टोंबर या कालावधीत शालेय पटपडताळणीचा कार्यक्रम शासन निर्णयानुसार सुरु झाला. शाळांमध्ये शिक्षकांची पदे टिकवण्यासाठी विद्यार्थी संख्या वाढविण्याचा प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय आहे.

सकाळीच सर्व शाळांमध्ये शाळेच्या वेळेआधी अर्धातास ही पथके शाळांमध्ये दाखल झाली. त्याची तयारी आधीच्याच दिवशी झाली. शिक्षण विभागाला वगळून ही पडताळणी असल्यामुळे त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या. महसूल विभाग आणि शासनाचे इतर सर्व विभाग यांनी संयुक्तपणे पडताळणीस सहकार्य केले आहे.

या कामी मोठ्या प्रमाणावर वाहने अधिग्रहीत करणे तसेच सर्वांना प्रशिक्षण देणे असेही याच पटपडताळणीचा एक भाग होता.

सकाळीच आम्ही जिल्हाधिकारी जयश्री भोज यांच्यासह एका पथकात शाळांमध्ये फिरायला सुरुवात केली. यात काही शाळांचे पट बघितले. पट नव्याने लिहिले होते. तर काही ठिकाणी जून महिण्यात असणारी विद्यार्थी संख्या आणि ऑगस्टची संख्या यात फरकत दिसत होता.

शिक्षक वर्गाला या पडताळणीचे कुतूहल आणि भिती आहे असे भाव त्यांच्या चेह-यावर दिसत होते. एका शाळेत सातव्या वर्गास इंग्रजी शिकविणा-या शिक्षिकेला अम्ब्रेलाचे स्पेलिंग लिहा असे सांगितले तर तिने ते ` ए ` या अक्षरापासून सुरु केले. त्यामुळे विदृयार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते की नाही याबाबत शासनाला वाटणारी चिंता रास्तच आहे हे स्पष्ट झाले. एक-दोन विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी नव्याने कालच गणवेष मिळाला असे त्यांनी सांगितले. एका वर्गात विदृयार्थ्यांचे नाव विचारुन घेतले आणि नंतर शिक्षकाला त्याचे नाव विचारले त्यावेळी दोन्ही नावं वेगळी असल्याचा उलगडा झाला.

शाळा-शाळांमधून या निमित्ताने असणा-या किचनची सफाई करण्यात आलेली होती. काही शाळांमध्ये वर्गातच तांदळाची पोती ठेवलेली होती.शाळांमध्ये उपस्थिती दाखवण्यासाठी अनेक संस्थाचालक अक्षरश: आटापीटा करीत आहेत हे स्पष्टपणाने जाणवले.

शासनाने नांदेड जिल्ह्यात प्रायोगिक पटपडताळणी केली त्यावेळी २० टक्के उपस्थिती बोगस असल्याचे उघडकीस आले.होते. शाळांमध्ये शिक्षकांचे वेतन व भत्ते तसेच शालेय साहित्य आणि माध्यान्ह भोजन यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर अनुदान देते. या प्रकारे २० टक्के बोगस विद्यार्थी आढळले तर शासनाचे थोडे थोडके नव्हे तर ५००० कोटी रुपये वाचणार आहेत.

वर्धा जिल्हा छोटा असल्याने इथं एकाच दिवसात सर्व शाळांची पडताळणी एका दिवसात पूर्ण करण्यात आली. विद्यार्थ्यांना पुन्हा दुस-या ठिकाणी शाळेत बसू नये म्हणून त्यांच्या बोटांवर शाई लावण्यात आली. अशी शाई निवडणुकीत मतदारांना लावली जाते.

बोटावरली ती शाई मुलं कौतुकानं बघत होती. हाच छोटासा शाईचा ठिपका येणा-या काळात त्यांना दर्जेदार शिक्षणाची सुरुवात करुन देणार आहे. असा विचार करतच बातम्या देण्यासाठी मी कार्यालयात परतलो.

प्रशांत दैठणकर 

'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

No comments:

Post a Comment