Sunday 2 October 2011

महात्मा गांधीजीचे विचार युवा पिढीसाठी प्रेरणादायी आठ एकर क्षेत्रावर भव्य संकुल उभारणार - पालकमंत्री


                   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.२ ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------
सेवाग्राम आश्रमात पालकमंत्री राजेद्र मुळक व खासदार दत्ता मेघे प्रार्थना करताना
वर्धा,दि.2-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटीश विरुध्द लढा पुकारुन त्यांनी अहिंसक चळवळीच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य प्राप्त करुन दिले. त्यांची साधी राहणी व उच्च विचार सर्वांसाठी स्फुर्तीदायक असून, त्यांचे आचार व विचार युवा पिढीसाठी आजही प्रेरणादायी आहेत. असे प्रतिपादन वित्त व नियोजन  व जलसंपदा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले.
2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजीची जयंत सेवाग्राम आश्रमात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्याप्रसंगी आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादनाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार दत्ताजी मेघे, आमदार सुरेश देशमुख, आमदार राऊत,जि.प.अध्यक्ष विजय जयस्वाल, जिल्हाधिकारी जयश्री भोज,उपाध्यक्ष सुनिल राऊत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.म. गडकरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
महात्मा गांधीजीच्या परीसराचा विकास करण्यासाठी शासनाने गांधीजींच्या विचारावर आधारीत भव्य संकूल उभारण्याचा निर्धार केला असल्याचे नमुद करुन पालकमंत्री मुळक म्हणाले की या संकुलामध्ये एक मोठे वाचनालय, ग्रंथ व प्रबंधावर संशोधन कक्ष, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विषयावरील अनेक मान्यवरांचे पुस्तके त्यामध्ये असतील. ज्यामुळे परदेशातील व देशातील विद्यार्थ्यांना अभ्‍यासासाठी हे संकूल महत्वाची भूमिका प्रदान करेल. आज ज्ञान विज्ञानाच्या कक्षाची व्याप्ती वाढत असून, महात्मा गांधीजींच्या विचाराचा ठेवा चिरंतर टिकवून राहावा
यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करण्यात येत आहे. सेवाग्राम परिसरात आठ एकर जागा आश्रम प्रतिष्ठानाने दिलेली असून, दिल्लीच्या विज्ञान भवनाच्या आधारावर एक भव्य संकूल बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. 
   येत्या डिसेंबर 2011 मध्ये नागपूर अधिवेशनात निधीची पुरवणी मागणी मंजूर केल्यानंतर या संकूलनाच्या विकास कामाला गती येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. गांधीजीचे कार्य समाजाच्या प्रगतीसाठी होते. त्यांचे त्यागमय  व संघर्षमय जीवन  सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारे असून प्रत्येकांनी सत्य व अहिंसेचा मार्ग आत्मसात केला पाहीजे असे आवाहन करुन बोटीबोरी ते सेवाग्रामच्या चौपदरी मार्गाचे काम पूर्ण झाल्या नंतर अहिंसा महामार्ग असे नामकरण करण्याचा विचार असून तांत्रीक बाबी तपासल्या नंतरच या मार्गाचे नामकरण केल्या जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खासदार दत्ता मेघे म्हणाले की,सेवाग्रामच्या विकासासाठी कटिबध्द असून, गांधीजीच्या विचारांची बांधीलकी समाजाला स्फुर्ती देणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मंत्रीमहोदय व अन्य मान्यवरांनी आद्य आदी निवास, आदी निवास व बापू कुटीला भेट देवून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. तसेच पालकमंत्री मुळक व खासदार दत्ताजी मेघे यांनी चरख्यावर सुत कताई केली. यावेळी नशाबंदी मंडळाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी विदर्भ युवक बिरादरीच्या युवकांनी महात्मा गांधीजीचे लोकप्रिय भजन म्हटले. याप्रसंगी महात्मा गांधीजीच्या जीवनावर श्रीकांत भाई यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, उद्योजक प्रविण हिवरे, उपसरपंच सुनिल कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन मालती देशमुख यांनी तर आभार विनोद भाई यांनी मानले.
                  000000

No comments:

Post a Comment