Friday 7 October 2011

गाव करील ते राव करील काय..?


विशेष लेख          जिल्हा माहिती कार्यालय       



गावातील युवकांनी गावच्या विकासात लक्ष घातले तर मोठया प्रमाणावर चित्र बदलू शकते गावच्या शिक्षित युवकांनी या कामात पुढाकार घेतला तर गावाचा कायापालट व्हायला निश्चितपणाने वेळ लागत नाही याचे प्रत्यंतर वर्धा जिल्ह्यात दोन गावांमध्ये आठ दिवसातच यायला लागले आहे.
     केंद्राच्या ग्रामविकास विभागातर्फे भारत निर्माण अभियान हे अभिनव अशा प्रकारचे अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण जनतेच्या वेगवेगळया समस्या आहेत. त्यात प्रामुख्याने शासकीय योजनांची माहिती मिळणे त्यासाठी अर्ज आणि इतर बाबींची पूर्तता करणे यामध्ये मार्गदर्शन करणारे खूप कमी असतात परिणामी ग्रामजिवनाचा स्तर उंचावण्यासाठी केंद्राने दिलेला निधी खर्च होत नाही आणि ग्रामीण जनतेला त्या योजनांचा लाभ देखील मिळत नाही.
     आजही 65 टक्के भारत ग्रामीण भागात आहे मधल्या काळात नागरीकरणाचा रेटा वाढला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संदेश दिला होता ' खेडयाकडे चला ' मात्र प्रत्यक्षात उलटा प्रवास होताना दिसतो. ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी लाखो कोटींचा निधी विविध योजनांच्या माध्यमातून राखीव ठेवला आहे. यात रोजगार हमी, पेयजय, तसेच आरोग्य योजनांसारख्या मोठया योजना आहेत मात्र ज्या प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचत नाहीत म्हणून भारत निर्माण चा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
     विशिष्ट गावाची निवड करुन त्या गावातील होतकरु दहा-पंधरा युवकांचा समुह निवडायचा या युवकांना प्रशिक्षित करायचे हे युवक नंतर गावात ग्रामसभेत सहभागी होण्यापासून विविध योजनांची ग्रामस्थांना माहिती देणे, योजनांबाबत सल्ला देणे तसेच अर्ज भरुन देणे आदी कामे मानधन न घेता करतात. महाराष्ट्रात यासाठी सांगली आणि वर्धा जिल्ह्याची निवड झालेली आहे.
     वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्या मध्ये असलेला ईसापूर आणि रत्नपूर या दोन गावांमध्ये ' भारत निर्माण अभियान ' गांधी जयंती पासून सुरु झाले. यात प्रशिक्षित युवकांच्या गटाने प्रथम ग्रामसभेत सहभाग घेतला त्या दिवसापासून या युवकांनी स्वयंसेवक होवून हाती झाडू घेऊन स्वच्छता सुरु केली.
     प्रारंभी गावात कुतूहल होते मात्र आठवडाभरात सारा गाव स्वच्छतेच्या कामी पुढे आलाय त्यांनी गाव स्वच्छ केला. उघडयावर शौचाला बसू नये असा संदेश गावात पोहचला. अशा जागा स्वच्छ करुन त्या जागांवर आता रांगोळया घालण्यात आल्या आहेत.
     म्हणतात ना गाव करील ते राव करील काय ? आणि खरोखरच म्हण अक्षरश: सिध्द करत ईसापूर आणि रत्नपूर मध्ये भारत निर्माणचा पहिला धडा गिरवला जातोय
-प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment