Monday 3 October 2011

शालेय पटपडताळणी 2011


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.3 ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------



              शालेय पटपडताळणीचे काम
             जिल्ह्यात एकाच दिवसात पूर्ण
वर्धा,दि.3-शाळा शाळांमधून प्रत्यक्ष  भेट देऊन शाळांकडून प्राप्त हजेरीपटांच्या पडताळणीचे काम वर्धा जिल्हयात आज पार पडले. जिल्हा प्रशासनाने मोठया प्रमाणावर यावर जोर दिला होता. स्वत: जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी काही शाळांना भेटी देऊन पडताळणीची पहाणी केली.
शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभाग वगळून इतर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही पडताळणी केली. राज्यात एकाचवेळी 3 ते ऑक्टोंबर या कालावधीत पडताळणी करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये आज एकाच दिवसात तपासणी पूर्ण करण्याचानिर्णय जिल्हाधिकारी भोज यांनी घेतला व त्यानुसार हे काम झाले.
प्रशिक्षणाच्या दुस-या टप्प्यानंतर कालच सर्व पथकांना साहित्य वाटप करण्यात आले होते. या कामी 392 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. याकामी 150 वाहनांचे अधिग्रहण करण्यात आले होते. उपविभाग स्तरावर नियंत्रण ठेवण्यात आले. तर या तपासणीसाठी 13 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.    2 लाख 44 हजार 47  विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष तपासणीच्या या कामात 2000 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचा-यांचा सहभाग होता.या सर्व व्यवस्थेमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी समन्वय राखला.                                                         1451 शाळांमधील या तपासणीसाठी 15 पोलिस पथके निर्माण करण्यात आली होती. पडताळणीचे चित्रिकरण करण्यासाठी 373 कॅमेरे लावण्यात आले.              
जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी काही शाळांना प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच सुविधांबाबत पहाणी केली. लोकनायक विद्यालय हिंदनगर येथे पत्र्याच्या शेड मध्ये वर्ग भरता व लगतच उघडी विहीर आहे असे आढळून आले. ही विहीर झाकण्याची सूचना जिल्हाधिकारी भोज यांनी केली.
     यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी धार्मिक, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, तहसीलदार सुशांत बनसोड आदींनीही पहाणीत सहभाग घेतला.
     या शालेय पटपडताळणीत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नाव लिहिता न येणे तसेच जूलै व ऑगस्टच्या विद्यार्थी संख्येत तफावत काही ठिकाणी निदर्शनास आली.
     शासनाने नांदेड जिल्ह्यात प्रायोगिक स्तरावर अशी पटपडताळणी केली त्यावेळी 20 टक्के विद्यार्थी बोगस आढळले होते. शासनस्तरावर याचा अहवाल प्राप्त झाल्यावर संपूर्ण राज्यात अशी संख्या सापडली तर शासनाचे 5000 कोटी रुपये वाचतील यासाठी हा राज्यभर पटपडताळणीचा निर्णय शासनाने घेतला आहे.

No comments:

Post a Comment