Friday 7 October 2011

तंत्रशिक्षणातला सामाजिक न्याय..!


 सामाजिक न्यायाच्या बांधिलकीतून शासन तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे मागास तसेच आर्थिकदृष्टया मागास विद्यार्थ्यांच्या शिक्षणात विविध योजनांच्या माध्यमातून सहाय्य करीत आहे. त्या सर्व योजनांपैकी काही योजनांची ही माहिती.


    विशेष लेख           जिल्हा माहिती कार्यालय      
 
      विशेष घटकांच्‍या शिक्षणात योगदान ही शासनाची प्रथमपासूनची बांधिलकी राहिली आहे. याच माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहणासाठी लागणा-या सोयी सुविधा देखील शासन सामाजिक न्यायाच्या माध्यमातून पुरविताना आपणास दिसते.
     व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून विशेष घटकांच्या विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी मिळावी तसेच त्यांचा आर्थिक स्तर उंचावला जावा यासाठी तीन अभ्यासक्रम चालविण्यात येतात. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत माध्यमिक शालांत परीक्षापूर्व अभ्यासक्रमांच्या सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे.
     या योजनेत दोन स्तरांवर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते सोबत अल्प मुदतीचा व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील चालविला जातो.
     आठवी ते दहावी पर्यंत तंत्र शिक्षण राज्यात सुरु करण्यात आलेले आहे. यात तांत्रिक अभ्यासक्रम शिकविताना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही करता यावे यासाठीच्या सुविधांचा निधी शाळांना पुरविला जातो त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत तांत्रिक पुस्तकांची व्यवस्था म्हणून प्रतिविद्यार्थी 70 दराने होणा-या रकमेची पुस्तके देखील पुरविली जातात.
    
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये पुस्तकपेढीची योजनादेखील याअंतर्गत राबविली जाते. गरजू अशा आर्थिकदृष्ट्या मागास तसेच महागडी पुस्तके खरेदी करु न शकणारे अनुसूचित जाती व जमातीचे विद्यार्थी यांना क्रमिक पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी ही योजना आहे.
     तंत्र शिक्षण संचालनालय ही योजना सर्व शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांसोबतच औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयांमध्येही राबवते.
     आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये ही बांधीलकी शासनाने जपली आहे आणि त्याला राज्यात उत्तम असा प्रतिसादही मिळत आहे.
-प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment