Friday 7 October 2011

वैयक्तिक स्वच्छता महत्वाची..!


विशेष लेख                 जिल्हा माहिती कार्यालय      

       ग्रामीण भागात आरोग्य संपन्न राहण्यासाठी प्रत्‍येक व्यक्तीने डोळसपणे आपल्या परिसर स्वच्छतेसोबतच वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष पूरविणे गरजेचे आहे. आजार आणि त्यावरील उपचारांवर होणारा खर्च या पध्दतीने आपण टाळू शकतो स्वच्छता उत्सवाला गांधी  जयंतीपासून सुरवात झाली आहे. त्यासंदर्भात हा खास लेख.
                                          -प्रशांत दैठणकर                                
      ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती व्हावी यासाठी शासन प्रोत्साहन तसेच प्रबोधनात्मक अशा दोन्ही पध्दतीने कार्य करीत आहे. आपण आपला परिसराची आणि स्वत:ची स्वच्छता राखा असं दुर्देवाने सांगावं लागतं. अर्थात याचा काही प्रमाणात का होईना सकारात्मक असा परिणाम हळूहळू दिसत आहे.
     आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचं ग्रामीण भागातलं मुख्य कारण अस्वच्छता हेच आहे. घरात स्वच्छतागृह नसणे ही ग्रामीण भारताची मुख्य समस्या आहे. शौचाला उघडयावर बसण्यामुळे रोगराई पसरत असते. हे टाळायचे असेल तर घरात शौचालय बांधायला हवं. यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून शासनानं निर्मलग्राम योजना, स्वच्छता अभियान आदी माध्यमातून रोख अनुदान तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमातून रोख पुरस्कार देणं सुरु केलेलं आहे.
     लहान मुलांना आजार लवकर होतात याचं कारण एक तर त्यांना वैयक्तिक स्वच्छतेची आपण माहिती दिलेली नसते आणि दुसरं कारण अर्थातच त्यांची रोग प्रतिकारशक्ती मोठया व्यक्तींच्या तुलनेत कमी असते.

आपल्या शरीरात रक्तासह विविध घटकांची निर्मिती सातत्याने सुरु असते. त्वचा देखील त्यापैकी एक आहे. त्वचेच्या पेशी, नव्याने तयार होवून जुन्याची जागा घेतात अशा मृत पेशी दररोज त्वचेवरुन काढणे आवश्यक असते. यासाठी दिवसातून एक वेळा नित्याने अंघोळ आवश्यक आहे हे आपण मुलांना पटवून दिले पाहिजे सोबत ते दररोज अंघोळ करतील याची खबरदारी बाळगली पाहिजे.
     ज्या पध्दतीने शरीराची स्वच्छता आपण ठेवतो त्याच पध्दतीने कपडयांची देखील ठेवावी लागते. शरीराच्या या पेशी कपडयांवर जमा होत असतात त्या करिता रोज आपले कपडे बदलणे व स्वच्छ धुतलेले कपडे घालणे देखील आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी किमान अंतर्वस्त्रे बदलली गेली जाणे गरजेचे आहे.
     आपण दिवसातून किमान एकदा 15 मिनिटे आपल्या वैयक्तिक आरोग्यासाठी दिली तर आपणास निश्चितपणे विविध आजारांपासून व त्या आजारापोटी होणारा त्रास त्यासोबतच त्यावरील उपचारांवर होणारा खर्च यापासून दूर राहता येईल.
-प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment