Monday 1 October 2012

रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामीण भागात गुणवत्‍तापूर्ण,स्‍थायी मालमत्‍ता निर्माण करणार


                           
·        पालकमंत्र्याच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा समन्‍वय समिती
·        आज सर्व गावांमध्‍ये ग्रामसभेचे आयोजन
·        मुख्‍यमंत्र्यांनी घेतला नरेगा कामाचा आढावा  
·        60 हजार 235 मजुरांना 12 कोटी 19 लाख मजुरी वाटप

          वर्धा, दिनांक, 1 – महात्‍मा गांधी राष्ट्रीय ग्रामीन रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्‍ह्यातील गरजू शेतकरी व शेतमजूरांना त्‍यांच्‍या  मागणीनुसार   काम उपलब्‍ध करुन देण्‍यासोबतच योजनेची माहिती  व अधिकाराची जाणीव निर्माण करुन देण्‍यासाठी गांधी जयंती पासून महात्‍मा गांधी  नरेगा जागृती विशेष अभियान प्रत्‍येक गावात  प्रभावीपणे राबविण्‍यात येणार आहे.  
        या विशेष अभियानाच्‍या  अंमलबजावणीसाठी  पालकमंत्री राजेंन्‍द्र मुळक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली  जिल्‍हा समन्‍वयक समिती गठित करण्‍यात आली असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी आज दिली.
          ग्रामीण भागात  महात्‍मा गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण  रोजगार हमी योजनेच्‍या माध्‍यमातून  गुणवत्‍तापूर्ण व स्‍थायी मालमत्‍ता  निर्माण करण्‍यासाठी   ग्रामीण जनतेचा सहभाग वाढवून  ग्रामपंचायत स्‍तरावर  मोठ्या प्रमाणात  कामे सुरु करा अशा सुचनाही  आज व्हिडीओ कॉन्‍फरसींगव्‍दारा  मुख्‍यमंत्री  पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी जिल्‍हाधिका-यांना दिल्‍यात.
         विशेष जागृती अभियाना अंतर्गत  2 ऑक्‍टोंबर ते 31 ऑक्‍टोंबर   या कालावधीत  प्रत्‍येक  ग्रामपंचायत स्‍तरावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून यासाठी  पालकमंत्री  यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गठीत करण्‍यात आलेल्‍या  समितीमध्‍ये  खासदार , जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष, सर्व आमदार , जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष , जिल्‍हाधिकारी , मुख्‍य कार्यपालन अधिकारी,  कार्यकारी अभियंते, कृ‍षी, वन , भूजल सर्व्‍हेक्षण  आदींचा समावेश असून,  रोजगार हमी योजनेचे उपजिल्‍हाधिकारी   जगदीश  संगीतराव हे सदस्‍य सचिव म्‍हणून  राहणार आहेत.
         रोजगार हमी योजनेच्‍या माध्‍यमातून  ग्रामपंचायत स्‍तरावर स्‍थायी  मालमत्‍ता व विकासाची कामांचे नियोजन करण्‍यासाठी  2 ऑक्‍टोंबर रोजी विशेष ग्रामसभा घेऊन यामध्‍ये  जागृती  अभियानाची  संकल्‍पना  ग्रामस्‍थांसमोर  मांडण्‍यात येईल. या योजने अंतर्गत   पूर्वी  10 प्रकारची कामे घेण्‍यात येत होती. परंतू आता नव्‍याने  6 कामांचा यामध्‍ये  समावेश  करण्‍यात आला आहे.
          रोजगार हमी योजनेमधून  नवीन 6 कामांमध्‍ये  आता प्रामुख्‍याने   पशुधन विकासाची कामे  यामध्‍ये  कुक्‍कुट पालनासाठी  शेड तयार करणे, बकरी पालनासाठी  गोठ्याचे पक्‍के बांधकाम, जनावरांसाठी   गोठ्यांसह  कोल्‍डर टूफ , जनावरांच्‍या पुरक  चा-यांसाठी अझोलाचे निर्माण करणे , सार्वजनिक जागेवरील जलसाठ्यामध्‍ये  मासेमारी विषयक  मत्‍स्‍य विकासाची कामे , ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी  पुनर्भरणाची  कामे तसेच   ग्रामीण स्‍वचछते संबधी  कुटूंब निहाय संडास , शाळा व अंगणवाडीतील संडास, घन व जलस्‍वरुपातील  घाणीचे व्‍यवस्‍थापन , कंपोष्‍ट खत, वर्मी कंपोष्‍टींग , गांडूळ खत निर्मीती, अमृतपाणी        (अजिवक) आदी कामेही आता नव्‍याने घेण्‍यात येणार आहेत.
                             12 कोटी  29 लाख मजुरीचे वाटप
      महात्‍मा गांधी  राष्‍ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वर्धा जिल्‍ह्यात 60 हजार 235 मजूरांच्‍या   खात्‍यांमध्‍ये  सुमारे 12 कोटी 29 लाख रुपयांची  मजुरी जमा करण्‍यात आली आहे. मजुरांना  मजूरीचे पैसे सुलभ व सहजपणे उपलब्‍ध  व्‍हावे यासाठी  पोष्‍टामार्फत   तसेच बँकाव्‍दारे वितरीत करण्‍याची व्‍यवस्‍था सुरु करण्‍यात आली आहे.
        जिल्‍ह्यात  6 लक्ष 98 हजार 419  मनुष्‍यदिन रोजगार निर्माण झाला असून यामध्‍ये  2 लक्ष 51 हजार 899 महिलांचा समावेश आहे. जिल्‍ह्यात  ग्रामीण रोजगार हमी योजनांच्‍या कामावर सुमारे 23 हजार  315 कुटूंबांना  रोजगार उपलब्‍ध   करुन देण्‍यात आला असल्‍याची  माहिती जिल्‍हाधिकारी  जयश्री भोज यांनी दिली.
        महात्‍मा गांधी नरेगा जागृती  अभियान प्रभावीपणे राबविण्‍यासाठी लोकप्रतीनीधी, पदाधिकारी व सर्व  ग्रामपंचायतींनी सहभागी  व्‍हावे , असे आवाहनही यावेळी  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                                               000000



No comments:

Post a Comment