Monday 27 June 2016

मानव विकास निर्देशांक वाढविण्‍यासाठी
नाविण्‍यपूर्ण योजना राबवाव्‍या
                -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा,दि.23-सामान्‍य लोकांचे जगणे उन्‍नत  होण्‍यासाठी  अधिका-यांनी काम करावे तसेच जिल्‍हा नियोजन आराखडा तयार करतांना जिल्‍हाचा मानव विकास निर्देशांकात वाढ होण्‍यासाठी नाविण्‍यपूर्ण योजना राबवाव्‍या अशा सुचना जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्‍या.
जिल्‍हा नियोजन समितीची  आढावा बैठक जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हाधिकारी कार्यालयातील  सभागृहात घेण्‍यात आली यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या बैठकीला जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
मागील तीन वर्षामध्‍ये राबविण्‍यात आलेल्‍या योजनाची माहिती कामाच्‍या व लाभार्थ्‍यांच्‍या यादया आणि  उपयोगिता प्रमाणपत्र तात्‍काळ सादर करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या. जिल्‍हा नियोजन आराखडयामधून आतापर्यत करण्‍यात आलेल्‍या कामांची माहिती संकलीत  करण्‍यासाठी लवकरच अॅप तयार करण्‍यात येणार असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली. या अॅपच्‍या माध्‍यमातून तयार झालेल्‍या डेटाबेसमुळे पुढील वर्षाचे नियोजन करणे सोपे होईल तसेच कामाची पुनरावृत्‍ती होणार नाही. यासाठी सर्व विभागांनी त्‍यांच्‍या मार्फत राबविण्‍यात आलेल्‍या योजनाची माहिती तात्‍काळ कामांच्‍या व लाभार्थ्‍यांच्‍या यादीसह सादर करावी.
सन 2016-17 या आर्थिक वर्षात  नियोजन आराखडयात आतापर्यंत केवळ 17 टक्‍के निधी वितरीत करता आला. त्‍यामुळे संबंधित सर्व विभागांनी या महिन्‍याच्‍या अखेर पर्यंत प्रस्‍ताव सादर करावे. त्‍यानंतरच ऑगष्‍ट महिन्‍यात सर्वांना निधी वितरीत करता येईल.
त्‍याचबरोबर 2 जुलै रोजी सर्व विभागांनी कार्यालयात स्‍वच्‍छता मोहिम राब‍वावी आणि कार्यालय स्‍वच्‍छ, सुंदर करावे असे आवाहन यावेळी त्‍यांनी केले.
                                                0000

                गावे जलयुक्‍त झाली का याचे सर्वेक्षण करावे
                                                           -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
Ø  प्रत्‍येक गावातील जलस्‍त्रोताचे मॅपींग
वर्धा,दि.23- जलयुक्‍त  शिवार अभियानांत सन 2015-16 मध्‍ये समाविष्‍ट  असलेल्‍या गावांमध्‍ये पाण्‍याच्‍या   ताळेबंदानुसार काम झाले किंवा नाही यासाठी या पावसाळयात सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षनातुन गावे खरोखरच जलयुक्‍त झालीत की नाहीत याची माहिती घेवून जलयुक्‍त झालेल्‍या गावांची नावे जाहीर करावीत, असे निर्देश जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
जलयुक्‍त शिवार अभियानाची आढावा बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्‍हा अधिक्षक कृषी  अधिकारी  ज्ञानेश्‍वर भारती, जलयुक्‍त शिवार अभियानांत समाविष्‍ट  असलेल्‍या विभागाचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
जलयुक्‍त शिवारमध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या गावांतील निरिक्षण विहिरी कोणत्‍या असाव्‍यात याची     शास्‍त्रोक्‍त  माहिती भूजल विकास यंत्रणेने दयावी. त्‍याचबरोबर या पावसाळयामध्‍ये प्रत्‍येक गावात असलेले जलस्‍त्रोताचे नकाशे तयार करावे. त्‍यासाठी प्रत्‍येक गावातील हँडपंप, सिमेंटनाला बांध, गावतलाव, वन तलाव, कोल्‍हापुरी बंधारे यांचे सर्वेक्षण करुन माहिती संकलित करावी. प्रत्‍येक गावातील जलस्‍त्रोताची एकत्रित माहिती असल्‍यास त्‍याची देखभाल दुरुस्‍ती करण्‍यास सोईस्‍कर होईल या कामासाठी तालुकास्‍तरावरील एका अभियंत्‍याची नियुक्‍ती  करावी आणि त्‍यांच्‍याकडे पाच गावाच्‍या सर्वेक्षणाची जबाबदारी दयावी अशाही सुचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या.
            जलयुक्‍त शिवारमध्‍ये यावर्षी घेण्‍यात आलेल्‍या गावातील सर्व कामांच्‍या प्रशासकीय मान्‍यता ऑगष्‍ट अखेर पर्यंत घ्‍याव्‍यात. सप्‍टेंबर महिन्‍यात निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पावसाळा संपताच ऑक्‍टोंबर पासुन जलयुक्‍त शिवारमधील कामे सुरु करावी अशा सुचना त्‍यांनी दिल्‍या. त्‍याचबरोबर ज्‍या गावांमध्‍ये गाव तलाव आहेत. त्‍यातील गाळ काढण्‍याची कामे प्राधान्‍याने हाती घ्‍यावीत. यासाठी महात्‍मा फुले जल व भुमी अभियानांतर्गत इंधनासाठी पैसे उपलब्‍ध आहेत. मागील वर्षीची सर्व कामे या महिना अखेर पर्यंत पूर्ण करण्‍याचे निर्देश त्‍यांनी यावेळी सर्व विभागांना दिले.  
                                                          00000


                                                 प्रत्‍येक ग्रामपंचायतीतआठवडयातून
एकदा होणार ग्रामसंवाद दिन
वर्धा,दि.23- गावाचा  विकास करण्‍यामध्‍ये ग्रामस्‍तरावरील प्रशासकीय यंत्रणेचा मोठा सहभाग आहे. मात्र ग्राम स्‍तरावरील ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, तलाठी व वनसंरक्षक हे महत्‍वाचे कर्मचारी लोकांना विकासाच्‍या प्रक्रियेमध्‍ये मार्गदर्शनासाठी व चर्चेसाठी उपलब्‍ध होत नाही. त्‍यामुळे ग्रामिण विकासाचा सर्वकष आराखडा तयार करावयाचा झाल्‍यास गावातील लोकांना चर्चेसाठी व मार्गदर्शनासाठी उपलब्‍ध व्‍हावे यासाठी प्रत्‍येक ग्रामपंचायतीत आठवडयातून एका विशिष्‍ट  दिवशी ग्रामसंवाद दिनाचे आयोजन करावे अशा सुचना जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्‍या आहेत.
ग्रामसंवाद दिनी ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, तलाठी, वनपाल हे ग्रामपंचायतीमध्‍ये उपस्थित राहून ग्रामिण लोकप्रतिनिधी आणि जनतेशी संवाद साधतील त्‍याकरिता दर आठवडयातील गुरुवार किंवा शुक्रवार हे दिवस ग्रामसंवादासाठी निश्चित करण्‍यात आले आहेत. ग्रामस्‍तरावरील कर्मचारी जनतेशी संवाद साधतील व ग्रामिण जनतेच्‍या समस्‍या जाणून घेऊन त्‍यांचे निराकरणासाठी संबंधितांना मार्गदर्शन करतील.
सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी तात्‍काळ एक संयुक्‍त सभ तहसिल स्‍तरावर आयोजित करुन ग्रामसंवाद उपक्रम आयेाजनाच्‍या अनुषंगाने ग्रामपंचायत पातळीवरील अधिका-यांना मार्गदर्शन करावे.  या ग्रामसंवाद दिनाची जनतेस माहिती होण्‍याकरीता ग्रामसंवादाची वेळ व उपस्थित राहणा-या ग्रामपातळीवरील अधिका-यांचे पदनाम ग्रामपंचायमध्‍ये प्रसिध्‍द करावे. अशा सुचना जिल्‍हाधिकारी यांनी काढलेल्‍या परिपत्रकामध्‍ये केल्‍या आहेत.
या उपक्रमाची यशस्‍वी अमलबजावणी होण्‍याकरिता उपविभागीय अधिकारी सनियंत्रणाची  जबाबदारी पार पाडतील असेही  जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी कळविले आहे.

                                                              0000

No comments:

Post a Comment