Monday 27 June 2016

वर्धा जिल्‍ह्यातील सर्वच शेतक-यांना मिळणार
राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ
·        शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त जिल्‍हयाचा समावेश
·        शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना लाभ
वर्धा,दि 10-राजीव गांधी जीवनदायी आरोग्‍य योजने अंतर्गंत शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त 14 जिल्‍ह्यातील सर्वच शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे. वर्धा जिल्‍ह्याचाही या योजनेत समावेश असून शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध असलेल्‍या शिधापत्रिका तसेच सातबाराच्‍या उता-यावर योजनेचा लाभ घेता येईल.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्‍य योजने अंतर्गंत औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त जिल्‍ह्यातील शुभ्र शिधाप्रत्रिकाधारक शेतकरी  कुटुंबांना लाभ देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अमलबजावणी सुरू झाली असून शेतकरी कुटुंबांनी योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त जिल्‍हृयातील शुभ्र शिधाप्रत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना त्‍याच्‍याकडे उपलब्‍ध असलेल्‍या शिधापत्रिका तसेच सातबाराच्‍या उता-यावर योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्‍या शेतकरी कुटूंबांकडे कोणतीही शिधापत्रिका नाही अशा लाभार्थ्‍यांस फक्‍त त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या सातबाराच्‍या उता-यावर योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी कुटुंबांतील कोणत्‍याही लाभार्थ्‍यांस विमा कंपनीने लाभ नाकारु नये अशा स्‍पष्‍टसूचना शासनातर्फे देण्‍यात आल्‍या आहे.
शेतकरी कुटुंबांतील सदस्‍याचे नाव शिधापत्रिका किंवा सातबाराच्‍या उता-यात समाविष्‍ट नसल्‍यास अशा परिस्थितीत सदर सदस्‍य हा त्‍या कुटुंबांतील असल्‍याचे प्रमाणपत्र संबंधित महसूल अधिका-याचे ग्राह्य धरण्‍यात येईल . लाभार्थी कुंटुंबाचा व्‍यवसाय हा फक्‍त शेती एवढाच असणे आवश्‍यक राहिल. शासकीय अथवा निमशासकीय सेवेत असलेल्‍या शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतक-याला योजनेचा लाभ घेता येणार नाही.

No comments:

Post a Comment