Monday 8 February 2016

‘पारदर्शक प्रशासनासाठी माहितीचा अधिकार महत्त्वाचा दुवा’
Ø ‘माहितीचा अधिकार’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
          वर्धा, दि. 6 –  माहितीचा अधिकार हा पारदर्शक प्रशासनाचा अतिशय महत्त्वाचा दुवा असून या शस्त्राचा वापर सामाजिक परिवर्तन आणि समाजाच्या प्रगतीसाठी करण्यात यावे. उपेक्षित घटकांसाठी माहितीचा अधिकार शस्त्र असून उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी या शस्त्राचा वापर करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असा सूर माहिती अधिकार अधिनियम कार्यशाळेत निघाला.
               समाजिक न्‍याय व विशेष सहाय्यक विभागाची स्वायत्‍त संस्‍था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधक व प्रशिक्षण संस्‍था (बार्टी) पुणे यांच्‍या समतादूत पथदर्शी प्रकल्‍पाअंतर्गत वर्धा तालुक्यातील  समतादुतांनी सामाजिक न्याय भवनात समाजातील उपेक्षित घटकांकरिता माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्‍हणून  समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्‍त बाबासाहेब देशमुख होते.  कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नीलेश गुल्‍हाने, पंकज वंजारे होते. यावेळी गटविकास अधिकारी यशंवत सपकाळे, विशेष अधिकारी दीपा हेरोळे, तालुका आरोग्य अधिकारी कल्पना सुनतकरी, नागपूर विभागाच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी डोंगरे, जिल्हा प्रकल्प अधिकारी  अनिता तेलंग यांची उपस्थिती होती.
            प्रमुख मार्गदर्शक निलेश गुल्‍हाणे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याविषयी माहिती अधिकार, महत्त्व आणि समाजासाठी त्याचे महत्त्व यावर, तर पंकज वंजारे यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीसाठी सर्वांनी पुढे येऊन पारदर्शक प्रशासन निर्मितीसाठी माहिती अधिकाराचा वापर करण्याचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्‍वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया ठाकरे यांनी केले. अनिता तेलंग यांनी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून  उपस्थितांचे आभार मानले.           
               कार्यशाळा यशस्वीतेसाठी समतादूत अनिता दाढे , प्रिया ठाकरे, शितल मोरे, जरीन पठाण, स्‍वप्‍नील चवरे यांनी पुढाकार घेतला.
                                                            00000                 

            

No comments:

Post a Comment