Wednesday 10 February 2016

रक्‍तक्षय रोखण्‍यासाठी जंतनाशक मोहीम बहुउपयोगी
-         डॉ. दुर्योधन चव्‍हाण
Ø  राष्‍ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा आज शुभारंभ
     वर्धा,दि.10 –        राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेंतर्गत अॅल्‍बेंडाझोलच्या गोळयांसाठी  शासनाने 20 लक्ष रुपये खर्च केले आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होऊन रक्तक्षय रोखण्यासाठी जंतनाशक मोहीम बहुउपयोगी असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी सांगितले.
        जगात 28 टक्‍के बालकांना कृमीदोष होण्‍याची शक्‍यता असते. बालकांमधे आढळणारा कृमी दोष हा मातीतून प्रसारित होणा-या जंतामुळे होतो. याचे प्रमुख कारण वैयक्तिक व परिसर स्‍वच्‍छतेचा अभाव कृमीदोषाचा संसर्ग दूषित मातीच्‍या संपर्कात आल्‍यामुळे सहजतेने होतो. दीर्घकालीन कृमीदोषामुळे रक्‍तक्षय,  कुपोषण याचा परिणाम बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्‍याकडे होतो.  हे टाळण्‍यासाठी अॅलबेंडाझोलची  एक गोळी पुरेशी आहे, असेही जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. चव्‍हाण यांनी सांगितले.
      जिल्‍ह्यात राष्‍ट्रीय जंतनाशाक दिन मोहिमेचा शुभारंभ वर्धा शहरातील न्‍यू इंग्लिश स्‍कूल येथे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्तम मडावी  यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्‍हाण, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. अजय डवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, प्राचार्य विजय व्‍यास, उपप्राचार्य प्रकाश नगराळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास आकरे, जिल्‍हा माध्‍यम अधिकारी दिलीप रहाटे, श्रीमती गुडजेवार यांच्‍या उपस्थितीत झाला. यावेळी डॉ. चव्हाण बोलत होते.
        राष्‍ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत वय 6 ते 19 वयोगटातील सर्व शासकीय, निमशासकीय  अनुदानित आश्रमशाळेतील शालेय विद्यार्थी तसेच शाळा बाह्य मुलांना शाळेतील नोडल शिक्षकांमार्फत शाळेत तसेच आशा स्वयंसेवक आरोग्‍य कर्मचा-यांमार्फत शाळा, शाळाबाह्य मुलांना अॅलबेंडाझोल गोळ्यांचा डोज आज देण्‍यात आला. नोव्‍हेंबरमध्ये ज्या अंगणवाडीतील मुलांना जीवनसत्‍त्‍व अ व जंतनाशक औषधीचा डोज देण्यात आलेला नाही अशा अंगणवाडीतील मुलांना अंगणवाडी सेविकांमार्फत जंतनाशक गोळ्यांची मात्रा देण्‍यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.डी. मडावी यांनी केले. यावेळी न्‍यू इंग्लिश शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच कर्मचारी यांची उपस्थिती होती.
                                                                000000
     




No comments:

Post a Comment