Monday 8 February 2016

प्रत्येकाने मौखिक आरोग्याची काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन
जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त जनजागरण शिबिर
        वर्धा, दि. 6 -     प्रत्येकाने मौखिक आरोग्याची काळजी घ्यावी. निरोगी शरिराचे प्रवेशद्वार मुख आहे. मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करता त्याची निगा राखण्यासाठी दिवसातून दोन वेळा ब्रश, उच्चप्रतीचे टुथपेस्ट वापरावेत. चॉकलेट, शर्करायुक्त बिस्कीटांमुळेही दात व हिरड्याचे रोग होण्याची शक्यता असते त्यामुळे मौखिक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त करण्यात आले.
           जागतिक मौखिक आरोग्‍य दिनानिमित्‍त मौखिक आरोग्‍य जनजागरण शिबिर व तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्‍तम मडावी, अतिरिक्त  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निवृत्‍ती राठोड, दंत शल्‍य चिकित्‍सक डॉ. संस्‍कृती एम्‍ब्‍डवार, डॉ. निमिता बेलेकर व डॉ. कोडापे, दंत आरोग्‍यक अनिल तुपे, दंत तंत्रज्ज्ञ अभिषेक वानखडे, प्राचार्य आय.यू.खान, मुमताज खान यांची उपस्थिती होती.
           मौलाना आझाद हायस्‍कूल, ज्‍यूनिअर कॉलेज ऑफ सायन्‍स व भगवान बिरसा मुंडा समाज मंदिर, गोंड मोहल्‍ला येथे शिबिर आयोजित करण्‍यात आले होते. यावेळी दंत शल्‍यचिकित्‍सक डॉ. संस्‍कृती एम्‍बडवार यांनी किशोरवयीन  विद्यार्थ्‍यांना मौखिक आरोग्‍याचे महत्‍त्‍व व स्‍वच्‍छता याबाबत प्रात्‍याक्षिकाद्वारे माहिती दिली. विद्यार्थ्‍यांसोबत प्रश्‍न उत्‍तराचे सत्र घेऊन डॉ. संस्‍कृती एम्‍ब्‍डवार यांनी विद्यार्थ्‍यांच्‍या शंकाचे समाधान केले. या शिबिरात 36 विद्यार्थ्‍यांची दंततपासणी केली. गोंडमो‍हल्‍ला  येथील शिबिरात मोठ्या प्रमाणात महिला व मुलांनी सहभाग घेतला. त्‍यात 31 महिला व मुलांची तपासणी  करुन उपचार करण्‍यात आले. पाठपुराव्‍याची गरज असणा-या विद्यार्थी व महिला सामान्‍य रुग्‍णालयात मोफत उपचार देण्‍यात येतील, असेही शिबिरात सांगण्यात आले. योग्‍य आहार व वैयक्तिक स्‍वच्‍छतेबद्दल वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्रीमती भारती शहा यांनी  मार्गदर्शन केले.
        
                                                     00000                




No comments:

Post a Comment