Thursday 11 February 2016

नझूलच्या जमिनीचे भूईभाडे दर आता केवळ 0.04 टक्के 
- आशुतोष सलिल
Ø  नझूल जमीन सुधारीत धोरणाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन    
             वर्धा, दि. 11  –      भाडेपट्ट्याने दिलेल्या नझूल जमिनीबाबत शासनाने नुकतेच सुधारीत धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार निवासी वापरासाठी असलेल्या नझूल जमिनीच्या भाडेपट्ट्यांच्या नुतनीकरणासाठी पाच वर्षाकरीता केवळ 0.04 टक्के भूईभाड्याचे दर तर  वाणिजिय्क प्रयोजनाकरीता 0.05 ते 0.10 टक्क्यांपर्यंत भूईभाडे दर, धर्मादाय, सार्वजनिक प्रयोजनासाठीच्या जमिनीकरीता 0.04 टक्के दर आकारण्यात येणार आहेत.   हे दर पूर्वीच्या दरापेक्षा कमी असल्यामुळे  ज्यांनी अद्याप भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण केलेले नाही; त्यांनी मालमत्तापत्रासह उपविभागीय अधिकारी कार्यालयात नूतनीकरणासाठी अर्ज करून या सुधारीत धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
            जिल्ह्यात एकूण 5 हजार 500 नझूल जमिनीचे भाडेपट्टी मालमत्तापत्र धारक आहेत. त्यांच्यासाठी सुधारीत धोरणानुसार पाच वर्षाकरीता 0.04 टक्के या अत्य अल्प दरानुसार भाडेपट्ट्याची आकारणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या पाच वर्षांकरीता नझूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी  यांचेमार्फत कळविण्यात येईल. भविष्यामध्ये या जमिनी फ्री होल्ड देण्याचा शासनाचा विचार आहे. नझूल जमिनीच्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण केल्यास फ्री होल्डसाठी प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत नझूल जमिनीच्या भाडेपट्टयांचे नूतनीकरण केलेले नाही. अशा नझूल जमीन भाडेपट्टेधारकांनी लवकरात लवकर त्यांचे  मालमत्ता पत्रकासह (प्रॉपर्टी कार्ड) संबंधित उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज सादर करून नझूल जमिनीबाबतच्या सुधारीत धोरणाचा लाभ घ्यावा, असेही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सांगितले आहे.
0000


No comments:

Post a Comment