Sunday 2 September 2012

बँक खाते उघडण्‍यासाठी युध्‍द पातळीवर प्रयत्‍न करा - जिल्‍हाधिकारी



वर्धा दि.2 – जिल्‍ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात राहणा-या प्रत्‍येक 18 वर्षावरील व्‍यक्तिींना शासकीय योजनेचा लाभ देण्‍यासाठी राष्‍ट्रीयकृत बँकेमध्‍ये स्‍वतःचे  खाते उघडणे गरजेचे असून या कार्यासाठी जि.प.मध्‍ये कार्यरत आशा वर्कर व आंगणवाडी सेविकांचे  सहकार्य घेण्‍यात येणार आहे. अपूरा वेळ व अधिक कामे करण्‍यासाठी कार्याचे  नियोजन करुन युध्‍द पातळीवर प्रयत्‍न करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले.
          विकास भवन येथे आज बँकेत खाते उघडण्‍यासंबंधाने एका कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. याप्रसंगी उपआयुक्‍त संजयसिंग गोतम, बँक ऑफ इंडियाचे विभागीय अधिकारी अजित कोरडे,जिल्‍हा अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक मोहन मशानकर ,नाबार्डच्‍या स्‍नेहल बनसोडे, उपजिल्‍हाधिकारी जया बनकर आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
          राष्‍टीयकृत बँकेत खाते उघडण्‍यासाठी  18  वर्षावरील सर्व लाभार्थ्‍यांना अनेक लाभ बँकेमार्फत शासनाकडून मिळणार असल्‍याचे नमूद करुन जिल्‍हाधिकारी भोज म्‍हणाल्‍या की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे शून्‍य रकमेवर स्‍वतःचे खाते उघडण्‍यात येणार असून अपू-या कालावधीत अधिकतम कामे येत्‍या 2 ऑक्‍टोंबर पर्यन्‍त पूर्ण करावी लागणार आहे. त्‍यासाठी ज्‍या पध्‍दतीने निवडणूक प्रक्रीया पूर्ण करण्‍यात येते त्‍याच प्रमाणे या कार्यासाठी सुध्‍दा  झोनल अधिकारी व केंद्र अधिकारी नियुक्‍त करण्‍यात येणार आहे.त्‍यांचे या  कामावर लक्ष ठेवून आढावा घेण्‍यात येणार आहे.खाते उघडण्‍यासाठी ग्रामीण क्षेत्रातील आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांचे सहकार्य घेवून त्‍यांच्‍याकडून प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे अर्ज भरुन घेण्‍यात येतील या आशा व अंगणवाडी सेविकांना तलाठी व ग्राम सेवक मदत करणार आहे. स्‍थायी रहिवाशी पत्‍यासाठी ग्रामसेवकांनी दिलेला रहिवासी दाखला ग्राह्य धरण्‍यात येणार असून आधार कार्डाचा क्रमांक व नाव लिहीलेले दोन फोटो अर्जासोबत लागणार आहे. त्‍यासाठी महसूल विभाग आवश्‍यक ती उपाय योजना करणार आहे. या कार्यासाठी  अग्रणी बँक ऑफ इंडिया यांच्‍या कडून बृहत आराखडा तयार करण्‍याचे काम सुरु झाले असून निवडणूकीच्‍या  मतदार यादीची मदत या कार्यासाठी घेण्‍यात येणार असल्‍यारचे त्‍यांनी सांगितले.
          याप्रसंगी उपायुक्‍त गौतम यांनी राष्‍ट्रीयकृत बँकेत खाते काढणा-या लाभार्थ्‍यांना शासनाकडून मिळणा-या योजनेच्‍या लाभाची माहिती दिली. यावेळी बँकेचे अधिका-यांनी येणा-या अडचणीबाबत कशा पध्‍दतीने त्‍याचे  निराकरण करावे याची माहिती सांगितली. यावेळी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, मनोज काळे, सुनिल कोरडे, तहसिलदार सुशांत बनसोड, सचिन गोस्‍वामी, व इतर तहसिलदार, संवर्ग विकास अधिकारी व सर्व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment