Thursday 6 September 2012

निम्‍न वर्धा प्रकल्‍पाचे 31 दरवाजे उघडले; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा



               *  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांची प्रकल्‍पाला भेट  
           * 6 हजार क्‍युबीक मीटर  पाण्‍याचा विसर्ग  सुरु
     वर्धा, दि. 5 – वर्धा जिल्‍ह्यात सतत पडत असलेल्‍या पावसामुळे तसेच अप्‍पर वर्धा  प्रकल्‍पातून पाण्‍याचा विसर्ग सुरु असल्‍यामुळे  निम्‍न वर्धा प्रकल्‍पाचे  31 दरवाजे  अडीच मीटरने उघडण्‍यात आले आहे. त्‍यामुळे  प्रकल्‍पामधून  6 हजार क्‍युबीक मीटर प्रती सेकंदाचा विसर्ग सुरु आहे. 
         निम्‍न वर्धा प्रकल्‍पातील पाण्‍याची पातळी सतत वाढत असून सध्‍या 280.85 मिटर एवढी आहे. त्‍यामुळे  या प्रकल्‍पातून  पाणी  सोडण्‍यात येत आहे.
         जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी निम्‍न वर्धा प्रकल्‍पातील  जलसाठा  तसेच  या प्रकल्‍पातून  सोडण्‍यात येणा-या  पाण्‍यामुळे बाधीत होणा-या गावासंदर्भात  कार्यकारी अभियंता आशिष देवगडे यांचेकडून माहिती घेतली.  अप्‍पर वर्धा प्रकल्‍पातून  पाणी सोडण्‍यात येत असून आर्वी तालुक्‍यात झालेल्‍या  अतीवृष्‍टीमुळे  प्रकल्‍पामध्‍ये  पाणी  वाढत असल्‍यामुळे  वर्धा जिल्‍ह्यातील  नदी काठावर असलेल्‍या सर्व ग्रामस्‍थांनी   सतर्क रहावे असे आवाहनही जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री  भोज यांनी केले आहे.
            निम्‍न वर्धा प्रकल्‍पामध्‍ये   प्रकल्‍पाच्‍या  दोनशी मिटर एवढया उपयुक्‍त साठ्यापेक्षा पाण्‍याची पातळी वाढत असल्‍यामुळे   प्रकल्‍पामध्‍ये  6 हजार क्‍युबेक मीटर प्रतिसेकंद  पाण्‍याचा विसर्ग  सुरु आहे.  प्रकल्‍पातील   पाण्‍याच्‍या पातळी संदर्भात सहाय्यक   अभियंता आर.एम.लायचा व एम.एम.खडतकर  सतत कार्यअभियंता आशिष देवगडे यांचया मार्गदर्शनाखाली  प्रकल्‍पातील पातळीवर  लक्ष ठेवून आहेत.
                        आर्वी येथील पुरग्रस्‍तांना दिलासा
       जिल्‍हाधिकारी श्रीमती  जयश्री भोज यांनी  आर्वी येथील शहरातून  वाहना-या गावनाल्‍यामुळे  बाधीत झालेल्‍या  कुटूंबाची भेट घेवून त्‍यांचे सांत्‍वन केले. आर्वी येथील पुरात दोन व्‍यक्‍ती  वाहून गेल्‍या असून, श्रीमती चंद्रभागा राऊत ही महिला घराची भिंत पडून मृत पावली आहे.
       नाल्‍या-काठावरील घरांमध्‍ये   पुराचे पाणी शिरल्‍यामुळे व घराचे पुर्णतः नुकसान झाल्‍यामुळे बाधीत झालेल्‍या कुटूंबांना तात्‍पुरता निवा-याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. गुरुनानाक धर्मशाळेत जाऊन बाधीत कुटूंबाची जिल्‍हाधिका-यांनी भेट घेतली तसेच त्‍यांना आवश्‍यक मदतीची ग्‍वाही दिली. तसेच एएमपीएस कॉन्‍व्‍हेंट  येथील बाधीत कुटूंबानाही  त्‍यांनी भेट देवून त्‍यांचे सांत्‍वन केले. तसेच भोजन व  औषधोपचाराची व्‍यवस्‍था करण्‍याच्‍या सुचना उपविभागीय अधिकारी सुनिल कोरडे यांना यावेळी दिल्‍यात.
                                               00000       

No comments:

Post a Comment