Thursday 6 September 2012

वर्धा जिल्‍ह्यात झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे पांच व्‍यक्‍ती मृत व दोन जखमी


         
               * जिल्‍ह्यात 24 तासात 870.8 मि.मी. पाऊस
               * आर्वी येथे 210 मि.मी. पावसाची नोंद
               * आर्वी येथे 200 घरात पुराचे  पाणी 
               * पुरग्रस्‍तांसाठी पाच अस्‍थायी निवारे
               * प्रशासनातर्फे औषधोपचार व भोजनाची व्‍यवस्‍था
               * जिल्‍हाधिका-यांकडून पुर परिस्‍थीतीची  पाहणी

          वर्धा, दि. 5 – वर्धा जिल्‍ह्यात मागिल 24 तासात झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे पाच व्‍यक्‍ती  दगावले असून, तीन व्‍यक्‍ती  जखमी झाले आहेत. आर्वी शहरातून वाहणा-या गावनाल्‍याला आलेल्‍या पुरामुळे सुमारे  200 घरात पाणी शिरल्‍यामुळे  घरांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील  सुमोर 1 हजार 300 नागरिकांना सुरक्षित स्‍थळी  हलविण्‍यात आले असून, त्‍यांना जिल्‍हा प्रशासनातर्फे  औषधी  व भोजनाची  व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.
         वर्धा जिल्‍ह्यात मागील 24 तासात झालेल्‍या मुसळधार पावसामुळे जिल्‍ह्यातील सर्व नद्या व नाल्‍यांना पूर आला आहे. आर्वी शहरातून वाहणा-या गावनाल्‍याला आलेल्‍या पुरामध्‍ये राजेश महादेव गेडाम (45), अशोक दशरथ सवाईत (52) हे  पुरात वाहून गेले असून, श्रीमती चंद्रभागा गोविंद राऊत  (70) ही महिला पुराच्‍या पाण्‍यामुळे  भिंत पडून मृत पावली. हिंगणघाट तालुक्‍यातील कापसी येथील पुराच्‍या   पाण्‍यामध्‍ये अजय गंगाधर दौंड (45) हा वाहून गेला असून, आष्‍टी तालुक्‍यातील  लहान आर्वी येथील श्रीमती सुमित्राबाई बापुराव कुकडे (82) घराची भिंत पडून मृत पावल्‍या.
         जखमीमध्‍ये  वर्धमनेरी येथील  अमृत बळीराम चोरे, हिंगणघाट येथील सौ. बबली  खिची  (22) व चि. हर्ष खिची (2) घराची भिंत पडून जखमी झाले आहेत.
              पुरग्रस्‍तांसाठी  पाच ठिकाणी पर्यायी व्‍यवस्‍था 
       आर्वी  शहरामधून वाहना-या गावनाल्‍याला रात्री 1.30 वाजता आलेल्‍या पुरामुळे  शहराच्‍या आठ वार्डामध्‍ये  मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून , सुमारे 200 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे तर 300 घरांचे अंशता नुकसान झाले आहे.
          पुरग्रस्‍तांना  जिल्‍हा प्रशासनातर्फे  पाच ठिकाणी  तात्‍पुरते  कॅम्‍प सुरु करुन  निवास व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.  यामध्‍ये  गुरुनानक धर्म शाळेत चारशे बाधीत व्‍यक्‍ती , राणी लक्ष्‍मीबाई विद्यालयात दोनशे, श्रीराम प्राथमिक शाळेत दिडशे, कन्‍नमवार विदृयालयाता शंभर तर एएमपीएस कॉन्‍व्‍हेंटमध्‍ये  सुमारे अडिचशे  बाधीत  व्‍यक्‍तींची पर्यायी व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.
        जिल्‍हाधिकारी श्रीमती  जयश्री भोज यांनी तातडीने आर्वी शहराच्‍या पुरग्रस्‍त भागाची पाहणी करुन  बाधीत कुटूंबासाठी करण्‍यात आलेल्‍या पर्यायी व्‍यवस्‍थेची माहिती घेतली  तसेच सर्व बाधीत कुटूंबाना भोजन तसेच औषधोपचार आदी  मदत तात्‍काळ  देण्‍याच्‍या सुचना उपविभागीय महसूल अधिकारी सुनिल कोरडे, तहसिलदार  श्री. चवहाण यांना दिल्‍या आहेत.
       पुरग्रस्‍तांना  मदत कार्यासाठी   शहरातील  इंडीयन रेडक्रॉस, लायन्‍स , व्‍यापारी संघटना, बँका, पत्रकार संघ  आदिंनीही  प्रशासनास सहकार्य करीत आहेत.  मृत व्‍यक्‍तींच्‍या कुटूंबियांना तातडीने मदत  देण्‍यात येईल तसेच ज्‍या घराचे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे त्‍याचे सर्वेक्षण करुन त्‍यांनाही  मदत देण्‍यात येईल अशी  ग्‍वाही पुरग्रसतांना  जयश्री भोज यांनी यावेळी दिली.
                               दोनशे पशुधन मृत्‍यूमुखी
      नाल्‍याला  आलेल्‍या पुरामुळे  सकाळी  तारखेडा, बागपुरा, दत्‍तवार्ड, अवघड वार्ड, जमुनादास वार्ड, वाल्‍मीक वार्ड आदी वस्‍तयांमध्‍ये सकाळी  चार वाजता मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्‍यामुळे  सुमारे दोनशे गायी , बक-या व इतर पशुधन पुरात वाहून गेल्‍याने  मृत्‍यूमुखी  पडले. पुरात  मृत्‍यूमुखी पडलेल्‍या पशुधनाचा पंचनामा करुन त्‍यांना  आर्वी -पुलगाव रस्‍त्‍यावर जमीनीत  पुरविन्‍याची व्‍यवस्‍था प्रशासनातर्फे  करण्‍यात आली असल्‍याची माहिती  उपविभागीय अधिकारी  सुनिल कोरडे यांनी दिली.
       नाल्‍याच्‍या पुरात ट्रक, इंडिका कार, मोटरसायकल, पानटप-या व चहाचे दुकानेही वाहून गेल्‍यामुळेही त्‍यांचे नुकसान झाले आहे.
                    जिल्‍ह्यात अतिवृष्‍टी  870.8 मि.मी.ची नोंद
      वर्धा जिल्‍ह्यात मागील 24 तासात 870.8 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सरासरी 108.9 मि.मी. पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस आर्वी तालुक्‍यात 210 मि.मी., देवळी 176.5 मि.मी., वर्धा 100.7 मि.मी., सेलू 57 मि.मी., हिंगणघाट 86 मि.मी., समुद्रपूर 90.2 मि.मी., आष्‍टी 80.2 मि.मी. तर कारंजा तालुक्‍यात 70.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
       जिल्‍ह्यात 24 तासात पडलेल्‍या मुसळधार पावसामुळे  निम्‍न वर्धा प्रकल्‍पाची  31 दरवाजे 2  सेंटीमीटरने उघडण्‍यात आले आहे. त्‍यामुळे वर्धा नदीमध्‍ये पाण्‍याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्‍यामुळे नदीकाठच्‍या लोकांनी  सतर्क राहण्‍याचे आवाहन  जिल्‍हाधिकारी श्रीमती भोज यांनी केले आहे.
                                                               00000

No comments:

Post a Comment