Friday 16 March 2012

रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन आपल्‍या दारी

वर्धा,दि.16-नोकरीस इच्छुक उमेदवारांना रोजगार व स्‍वयंरोजगार विभागाच्‍या रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्‍ये नांव नोंदणी, नूतनीकरण, शैक्षणिक पात्रता वाढ, नोंदणीचे स्‍थलांतर व संपर्कात बदल या सर्व सेवा मोफत उपलब्‍ध आहेत. या सेवा राज्‍यातील विविध जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामधून दिल्‍या जातात. यासाठी उमेदवारांना केद्राच्‍या ठिकाणी जाऊन नोंदणी करणे अथवा फिरते पथकासमोर तालुक्‍याच्‍या ठिकाणी प्रत्‍यक्ष उपस्थित राहून सेवा घ्‍यावी लागते. यामध्‍ये उमेदवारांचा आर्थिक खर्च होऊन वेळ वाया होतो.
        ऊमेदवारांनी स्‍वतः वेबसाईटवरुन ऑनलाईन पध्‍दतीने नाव नोंदणी केल्‍यास तात्‍पुरता क्रमांक प्राप्‍त होणार आहे. कायमस्‍वरुपी नोंदणी पत्र क्ष-10 प्राप्‍त करण्‍यासाठी त्‍यास पुन्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे यावे लागत असल्‍याने आर्थिक भुर्दंड सोसोवा लागत असून वेळेचाही अपव्‍यय होतो.
         रोजगार सेवा कमी खर्चात, सहज व गांव-तालुका पातळीवर उपलब्‍ध होण्‍यासाठी आता रोजगार व स्‍वयंरोजगार विभागाच्‍या रेाजगार सेवांचे विकेंद्रीकरण करण्‍यात आले आहे. यापुढे उमेदवारांना नांव नोंदणी, नूतनीकरण, पात्रतावाढ व संपर्क बदल, नोंदणी कार्ड इत्‍यादी सेवांसाठी रोजगार (सेवायोजन) कार्यालयात जाण्‍याची आवश्‍यकता नाही. ह्या सर्व सेवा अधिकृत महा ई-सेवा केन्‍दे, शासकीय, आयटीआय, पॉलीटेक्निक, इंजिनियरींग कॉलेजेस इत्‍यादी मधून ऑनलाईन पध्‍दतीने सशुल्‍क उपलब्‍ध करण्‍यात आलेल्‍या आहेत. तसेच नियोक्‍ते किंवा उद्योजक यांची नोंदणी, तिमाही विवरणपत्रा ई आर-1 व व्‍दैवार्शिक वि‍वरणपत्र ईआर-2 ऑनलाईन पध्‍दतीने पाठवणी करण्‍याच्‍या सुविधा सशुल्‍क उपलब्‍ध करण्‍यात आलेल्‍या आहेत. तथापि, सर्व रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामधून या सेवा विनामूल्‍य उपलब्‍ध आहेत.
            या योजनेअंतर्गत रोजगार व स्‍वयंरोजगार विभागाच्‍या सेवांची गांव व तालुका पातळीवर उपलब्‍धता होणार आहे. सेवा घेण्‍यासाठी रोजगार कार्यालयामध्‍ये प्रत्‍यक्ष जाण्‍याची गरज नाही. वेळ, प्रवास व आर्थिक खर्चात बचत होणार आहे. फक्‍त मूळ कागदपत्रे पडताळून नोंदणी करता येईल. सत्‍यप्रत देण्‍याची आवश्‍यकता नाही. कोणत्‍याही सेवा सुविधा केंद्रातून रोजगारविषयक सेवा घेण्‍याची सोय आहे. सेवा सुविधा केंद्रातून नवीन नांव नोंदणीनंतर शासकीय कामकाजाच्‍या पाचव्‍या दिवशी नोंदणी कार्ड मिळण्‍याची सोय करण्‍यात आली आहे.
   सशुल्‍क सेवा सुविधांचे दर उमेदवारांसाठी नवीन नांव नोंदणीचे 20 रुपये, नोंदणी अद्यवतीकरणाचे 15 रुपये, नोंदणीचे नुतनीकरणाचे 10 रुपये आणि दुय्यम नोंदणी कार्ड देणे साठी 10 रुपये आहे. नियोक्‍ते किंवा उद्योजकांसाठी नवीन आस्‍थापना नोंदणी 20 रुपये, तिमाही विवरणपत्र इ.आर.1 सादर करणे 20 रुपये आणि व्दिवार्षिक विवरणपत्र इ.आर.2 सादर करणे 50 रुपये आहे.
         नवीन नांव नोंदणी करण्‍यासाठी आवश्‍यक कागदपत्रे यामध्‍ये शैक्षणिक पात्रतेसाठी पात्रतेची सर्व प्रमाणपत्रे, जन्‍म तारखेसाठी शाळा सोडल्‍याचा दाखला किंवा एस.एस.सी. बोर्ड प्रमाणत्र किंवा जन्‍म दाखला आणि अपंगत्वासाठी शल्‍य चिकित्‍सकाचे प्रमाणपत्र. मागासवर्गीय उमेदवारांसाठी जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र. अपंगांसाठी जिल्‍हा वैद्यकीय मंडळ किंवा वैद्यकीय महाविद्यालय मंडळाचे प्रमाणपत्र. माजी सैनिकांसाठी माजी सैनिक असल्‍याची कागदपत्रे. खेळाडूसाठी शासन मान्‍यता प्राप्‍त खेळांचे राज्‍य किंवा राष्‍ट्रीय किंवा आंतर राष्‍ट्रीय पातळीवर प्रथम किंवा व्दितीय किंवा तृतीय स्‍थान प्राप्‍त किंवा सुवर्ण किंवा रौप्‍य किंवा कास्‍य पदक प्राप्‍त प्रमाणपत्र. प्रकल्‍पग्रस्‍त किंवा भूकंपग्रसतासाठी सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र. स्‍वातंत्र्य सैनिकावर अवलंबित असल्‍याचे जिल्‍हाधिकारी यांचे प्रमाणपत्र. अंशकालीनसाठी तीन वर्षे अंशकालीन काम केल्‍याचे तहसिलदारांचे प्रमाणपत्र.
     उमेदवार व नियोक्‍ते किंवा उद्योजकांनी रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत देण्‍यात येणा-या रोजगार विषयक सेवांचे विकेंद्रीकरण करण्‍यात आलेले असून, ह्या सेवा सर्व महा-ई-सेवा केंद्रे, औद्योगीक प्रशिक्षण संस्‍था, तंत्रशिक्षण महाविद्यालय यांच्‍यामार्फत सशुल्‍क उपलब्‍ध आहेत.
            नोंदणीसाठी आवश्‍यक असलेली मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी दाखवावीत. परंतु कोणतेही मूळ प्रमाणपत्र अथवा छायांकित प्रती सेवा केंद्रात देऊ नयेत. ज्‍या उमेदवारांना नोंदणी कार्डाचे फक्‍त नुतनीकरण अथवा संपर्कात बदल करावयाचा असेल त्‍यांनी फक्‍त यापूर्वीचे नोंदणी कार्ड द्यावे किंवा नोंदणी क्रमांक, नांदणी दिनांक, जन्‍म दिनांक व नवीन पत्ता या बाबी नमूद करुन अर्ज सादर करावा.
            या अंतर्गत कोणत्‍याही सेवांसाठी दिलेल्‍या शुल्‍काची स्‍वाक्षरीत (अधिकृत) पावती घ्‍यावी. नांव नोंदणी नंतर पाचव्‍या दिवशी कायम नोंदणी कार्ड, नोंदणी केलेल्‍या केंद्रातून अधिकचे शुल्‍क न देता उपलब्‍ध होईल. तसेच कायम नोंदणी क्रमांक नोंदणी केलेल्‍या भ्रमणध्‍वनीवर एमएसएसव्‍दारे कळविण्‍यात येईल. सेवा विषयी काही तक्रार असल्‍यास संबंधित जिल्‍ह्याचे सहाय्यक संचालक, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र यांच्‍याकडे संपूर्ण तपशीलासह लेखी करावी लागेल. रोजगार सेवा सर्व रोजगार व सवयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामधून तसेच http://ese.mah.nic.in या रोजगार वाहिनी वेबसाईटव्‍दारे विनामूल्‍य उपलब्‍ध आहेत.
    रोजगार विषयक सेवांचा विकेंद्रीकरणाची योजना कार्यान्वित झाली असल्‍यामुळे या योजनेचा लाभ उमेदवार आणि नियोक्‍ता किंवा उद्योजक यांनी घ्‍यावा,असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांनी केले आहे.                                                               

No comments:

Post a Comment