Monday 13 February 2012

गरोदर मातांनी समतोल आहार घेण्‍याची गरज - सभापती प्रा.बुटले


    वर्धा,दि.13–अज्ञानता व अशिक्षितपणामुळे गरोदर माता स्‍वततःकडे पोषण आहार घेण्‍यापासून अ‍नभिज्ञ असतात त्‍यामुळे गरोदर मातांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते परिणामी बाळावरही दुष्‍परिणामाची शक्‍यता असते. हे टाळण्‍यासाठी गरोदर मातांनी नियमितपणे समतोल व सकस आहार घेण्‍याची  गरज आहे. असे आवाहन नगर परिषदेचे सभापती प्रा. सिध्‍दार्थ बुटले यांनी केले.
     राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान नागरी प्रजनन व बाल आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत नागरी भागातील मागास व झोपडपट्टी परिसरातील लोकांचे आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी नगर पालिका क्षेत्रातील नागरी आरोग्‍य केंद्र क्र. 2 पुलफैलच्‍या वतीने बौध्‍द विहार हनुमाननगर वर्धा येथे नुकतेच (दि. 30 जानेवारी 2012) ला पोषण आहार मार्गदर्शन शि‍बीर झाले. त्‍याप्रसंगी ते बोलत होते.
    या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी बालविकास प्रकल्‍प अधिकारी नि.ना.माहुर्ले, वैद्यकिय अधिकारी डॉ. उज्‍वला कांबळे तसेच परिसरातील माता उपस्थित होत्‍या.
    यावेळी उपस्थित पाहुण्‍यांनी पोषण आहाराविषयी मार्गदर्शन केले तसेच प्रत्‍येक गरोदर मातेने समतोल पोषण आहार कसा घ्‍यावा, तयाकरीता आपण जे अन्‍नपदार्थ सेवन करतो त्‍यामध्‍ये कोणते विटॅमिन किती प्रमाणात असावे व ते कसे शिजवायला पाहिजे तसेच प्रत्‍येक मातेने लसिकरण करणे का आवश्‍यक आहे व न केल्‍यास जन्‍माला येणा-या मुलांमध्‍ये काय दोष आढळून येतात. तसेच मुलांचे कुपोषणापासून संरक्षण करण्‍याकरीता लहान मुलांना आहार देतांना तो स्‍वच्‍छ व पोषक असायला पाहिजे. मुलांना समतोल पोषक आहार देतांना त्‍यामध्‍ये प्रतिने, कॅलरीज, विटॅमिन, मिनरल्‍स व इतर सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍य घटक युक्‍त आहार असायला पाहिजे. मुलांच्‍या वाढीसाठी ज्‍या पोषक आहाराची आवश्‍यकता आहे तो आहार वेळेत मिळाला नाही तर मुलं कुपोषणाकडे वळतात.
      त्‍यामुळे बालकाचा मानसिक, शारीरिक व बौध्‍दीक विकास योग्‍य प्रमाणात होत नाही. तसेच शासकिय स्‍तरावर गरोदर माता व बालक यांच्‍याकरीता विविध आरोग्‍य  विषयक शासकिय योजना राबविल्‍या जातात त्‍यांचा योग्‍य प्रकारे लाभ घेतला पाहिजे. तसेच समाजातील विविध गैरसमजुतीमुळे व अंधश्रध्‍देमुळे मातेच्‍या आरोग्‍यावर कशाप्रकारे वाईट परिणाम होतो याविषयी उपस्थित मातांना सखोल मार्गदर्शन केले.
     कार्यक्रमाचे संचालन अंजली थुल तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेवका बावणकर यांनी केले. आयोजनाकरीता अजय बोंदाडे, गजानन  उईके, लिंक वर्कर्स व अंगणवाडी सेविका ईत्‍यादी कर्मचा-यांनी सहकार्य केले.
                               0000

No comments:

Post a Comment