Friday 17 February 2012

1 लाख 17 हजार बालकांना पोलीओ लसीकरण करणार एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये - जिल्‍हाधिकारी



वर्धा,दि.17-राज्‍यात 1995 पासून पोलीओ निर्मुलनाचा कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. येत्‍या 19 तारखेला पल्‍स पोलीओ लसीकरण मोहीम प्रारंभ होणार असून, प्रत्‍येक पालकांनी त्‍यांच्‍या 5 वर्षाखालील मुलांना पोलीओ डोज पाजण्‍यासाठी पोलीओ लसीकरण केंद्रावर घेवून जावे. या लसीकरण मोहीमेत एकही बालक वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी घ्‍यावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले.
     आज जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात पलस पोलीओ लसीकरणाच्‍या संदर्भात समन्‍वय सभा आयोजित करण्‍यात आली होती. त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी जि.प.मुख्‍यकार्यकारी अधिकारी बि.एम.मोहन, वैद्यकिय अधिकारी डॉ. शर्मा, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. के.झेड.राठोड, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी आ.एस.भुयार, सेवाग्राम वैद्यकिय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मेंहदेळे, वैद्यकिय अधिकारी डॉ. एस.डी. निमगडे, रोटरी क्‍लबचे भारत सोमछत्रा व उत्‍तम कृपलानी, सावंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. ठाकरे, वैद्यकिय अधिकारी पि.आर.धाकटे  आदि मान्‍यवर बैठकीला उपस्थित होते.
     पल्‍स पोलीओ लसिकरणासाठी आरोग्‍य विभाग सज्‍ज असल्‍याची माहिती देवून जिल्‍हाधिकारी जयश्री भोज म्‍हणाल्‍या की या मोहीमेत आरोग्‍य विभाग, आयसीडीएस विभाग, शिक्षण विभाग, ग्रामसेवक, तलाठी व विशेषतः रोटरी क्‍लब, लॉयन्‍स क्‍लब, आय.एम.ए, जिल्‍हा होमगार्ड्स, स्‍काऊट गाईड, राष्‍ट्रीय सेवा योजना, जिल्‍ह्यातील दोन्‍ही वैद्यकिय महाविद्यालये, वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी याशिवाय अनेक स्‍वयंसेवी संस्‍थांचे मोलाचे योगदान लाभणार आहे.
     या मोहिमेकरीता जिल्‍ह्यात ग्रामीण क्षेत्रातील 86687 व शहरी क्षेत्रात 30454 असे एकूण 1 लाख 17 हजार 141 5 वर्षाखालील बालकांना पोलीओचा डोज पाजण्‍यात येणार असून यासाठी 1296 लसीकरण केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असुन यामध्‍ये ग्रामीण भागात 1114 शहरी क्षेत्रात 182 केंद्रे आहेत. या मोहीमेत एकुण 3163 कर्मचारी व 260 पर्यवेक्षक व अधिकारी कार्यरत राहणार आहेत.याशिवाय टोल नाके, फिरती पथके, ट्रान्‍झीट टिम्‍स,पर्यवेक्षकिय पथके,वाहन व्‍यवस्‍था पुरेशा प्रमाणात करण्‍यात आलेली आहे.
     जनतेनी दिनांक 19 फेब्रुवारी 2012 च्‍या सत्रात आपल्‍याकडील व परिसरातील 5 वर्षाचे आंतील बालकांना पोलीओ लसीकरण केंद्रावर नेऊन लस पाजून घेण्‍याचे राष्‍ट्रीय कर्तव्‍याचे पालन करावे असेही त्‍या म्‍हणाल्‍या.
      याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                  000000


No comments:

Post a Comment