Friday 16 December 2011

वीज बचत म्‍हणजे राष्‍ट्रास मदत !

घरात आयएसआय प्रमाणित तारांचा वापर आणि प्रमाणित उपकरणांचा वापर केल्‍यास वीज बचत व सोबतच पैशांची बचत होईल या उपायांनी राष्‍ट्रालाही मोठी मदत होवू शकेल. - प्रशांत दैठणकर
व्‍यय आणि अपव्‍यय यात संतुलन राखणे आपल्‍याला जमलं पाहिजे हे जमलं तर बचत आपली आणि आपल्‍या राष्‍ट्राचीच होणार आहे. विषय विजेच्‍या बचतीचा आहे. विज्ञानानुसार वीज ही निर्माण करावी लागते. वीज साठवून ठेवण्‍याच्‍या यंत्रणा महागड्या आहेत त्‍यामुळे वीज साठवून ठेवण्‍याला मर्यादा आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपल्‍यापैकी प्रत्‍येक व्‍यक्‍तीने विजेची बचत कशी करता येईल याचा विचार करायला हवा.
विजेचे उत्‍पादन व आपल्‍या पर्यंतचे वहन यासाठी लाखो किलोमीटरचे वाहिन्‍यांचे जाळे आणि उपकेंद्रे निर्माण करावी लागतात. ज्‍या धातूमधून वीज वाहून नेली जाते त्‍या धातूमुळे काही प्रमाणात विजेची घट होत असते. आपण आपल्‍या घरापर्यंत आलेली वीज घरात सुव्‍यवस्थित पध्‍दतीने वापरायला हवी.
घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच ऊर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्‍या उपकरणांचाच वापर करावा. स्‍वस्‍त आणि दर्जाहीन तारामुळे विजेचा सुयोग्‍य वापर शक्‍य होत नाही सोबतच आग लागण्‍याचाही मोठा धोका असतो. प्रमाणित उपकरणे वापरली तर बचत होत असते.
ज्‍या ठिकाणी शक्‍य आहे अशा सर्व ठिकाणी सोलार उपकरणांचा वापर जरुर करावा. घरात पाणी गरम करण्‍यासाठी विजेचा वापर करणे चुकीचे आहे. आपला देश हा भरपूर सूर्यप्रकाशाचा देश आहे त्‍यामुळे सोलर अर्थात सूर्याच्‍या उर्जेचा वापर करता येईल अशी यंत्रणा घरात बसवणं सहज शक्‍य आहे.
सायंकाळी दिवे लावल्‍यानंतर सर्व खोल्‍यांमध्‍ये रात्रभर दिवे चालू ठेवण्‍याचा प्रकार अनेक घरात दिसतो. यात ज्‍या खेालीत कुणीही नाही अशा खोल्‍यांमधील दिवे बंद ठेवले तरी पुरेशी बचत सहजपणाने आपण करु शकतो. अनेक ठिकाणी घरावरील टाकीत पाणी चढविले जाते. याकरिता विद्युतपंपांचा वापर होतो. टाकी भरुन वाहू लागते तरीही पंप सुरु राहतो असा प्रकार शहरी भागात हमखास दिसतो.टाकी भरत आल्‍यावर पंप बंद करणारी स्‍वयंचलित यंत्रणा बाजारात उपलब्‍ध आहे त्‍याचा वापर सर्वांनी सुरु केला तर हजारो युनिट वीज सहज वाचेल.
उत्‍पादनाचा खर्च वाढल्‍याने वीज महाग होत आहे. या पार्श्‍वभूमीवर वीज बचत करुन आपण स्‍वतःचा आणि राष्‍ट्राचा फायदा करु शकतो आणि तो आपण करावा.
प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment