Friday 16 December 2011

एलपीजीचा वाहनासाठी वापर अयोग्‍य !

स्‍वयंपाकाचा गॅस अर्थात एलपीजी चा वाहनाच्‍या इंधनाच्‍या रुपात अनेक ठिकाणी गैरवापर होताना दिसत आहे. ही अतिशय गंभीर बाबत आहे. यातून अनेक समस्‍या तर निर्माण होत आहेतच सोबत अपघातांचा धोकादेखील वाढत आहे. याबाबत हा विशेष लेख. - प्रशांत दैठणकर

सध्‍या ऊर्जा बचत हा कळीचा मुद्दा बनला आहे. पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ होत आहे सोबतच येणा-या काळात गॅसचेही दर वाढण्‍याची शक्‍यता आहे. या सर्वांमागे दळणवळणाच्‍या किंमतीत होणारी वाढ अधिक कारणीभूत आहे.
नैसर्गिक वायू आपण प्रक्रिया करुन वाहनात इंधन म्‍हणून वापरतो त्‍याच प्रमाणे घराघरात एलपीजीच्‍या रुपात स्‍वयंपाकाचा गॅस म्‍हणूनही याचा वापर होतो. या गॅसची किंमत पेट्रोल आणि डिझेलच्‍या तुलनेत सध्‍या कमी भासते याला कारण ही जीवनावश्‍यक बाब मानून त्‍यावर मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली जाते व त्‍याच्‍या दरांवर अद्यापही शासनाने नियंत्रण ठेवलेले आहे.
वाहनात सीएनजी ऐवजी एलपीजी वापरण्‍याचा प्रकार वाढला असल्‍याने सबसिडीपायी शासकीय निधी त्‍यात जातो परिणामी शासकीय कंपन्‍यांचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे असं निदर्शनास आलं आहे.
वाहनासाठी जो गॅस वापरला जातो तो वेगळ्या प्रकारचा असतो. तिथं एलपीजी वापरणं घातक आहे. मुळात हा वायू अत्‍यंत ज्‍वलनशील आहे. गॅसच्‍या टाकीतून गाडीच्‍या टाकीत भरताना वायूगळती तसेच स्‍फोट होणे आदी अपघातांची शक्‍यता असते.
पेट्रोल- डिझेल ऐवजी गॅसचा इंधन म्‍हणून वापर करण्‍यासाठी स्‍वतंत्र यंत्रणा बसवावी लागते. हे गॅस किट देखील अनेकजण प्रमाणित वापरत नाहीत. या चुकीच्‍या किंवा दर्जाने सुमार असलेल्‍या गॅसकिटमुळे गळती होवून वाहने जळाल्‍याच्‍या घटना आपण माध्‍यमातून वाचतो परंतु करताना तिच चूक केली जाते. यामुळे आता अपघातांचा धोकादेखील वाढला आहे.
एलपीजीचा गैरवापर थांबला नाही तर त्‍यावरील सबसिडी बंद करायचा निर्णय शासनाला घ्‍यावाच लागेल. त्‍या स्थितीत गॅसची किंमत आता आहे त्‍यापेक्षा दुप्‍पट होवू शकते त्‍यामुळे आपण गॅसचा योग्‍य वापर केला पाहिजे.
वाहनात गॅसचा वापर करायचा असेल तर आयएसआय आणि आरटीओव्‍दारा प्रमाणित असेच गॅसकिट वापरावे जिथे उपलब्‍ध आहे तिथेच अशा किटचा व त्‍यात फक्‍त सीएनजीचा वापर करावा.
घरातील गॅस हा गृहिणींचा जिव्‍हाळ्याचा विषय असतो त्‍या विषयाला आपण घरातच ठेवावे व वाहनाचे इंधन म्‍हणून एलपीजीचा वापर टाळावा हेच चांगलं.
प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment