Wednesday 14 December 2011

डॉलरची अन् इंधनाची भरारी

डॉलरचा वाढता दर आणि इंधनाचा वाढता दर यांचं एक नातं आहे. त्‍यामुळे येणा-या काळात इंधन आणखी महागणार हे स्‍पष्‍ट आहे. सार्वजनिक वाहन प्रणालीचा वापर वाढवून आपण या संकटावर निश्‍चितपणे मात करु शकतो.
- प्रशांत दैठणकर
आज डॉलर महागल्‍याने महागाई वाढणार ही चिंता सर्वांना आहे. आणि ते खरं देखील आहे. आंतरराष्‍ट्रीय व्‍यवहारात ज्‍या पध्‍दतीने चलनाचा वापर होतो त्‍या चलनात येणारा चढउतार प्रत्‍येक देशाला सहन करावा लागतो. रुपयाचं मुल्‍य काय याचा विचार करुन जगात आपणास व्‍यवहार करावे लागणार आणि याचा थेट परिणाम इंधनांच्‍या किंमतीवर होणार असून पर्यायाने सर्वच बाबींच्‍या किंमती वाढण्‍यावर होणार आहे.
इंधन बचत करा असं वारंवार सांगण्‍यात येतं. त्‍याला कारण अर्थातच आपण इंधनाच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण नाही. आपण क्रुड ऑईल आंतरराष्‍ट्रीय बाजारातून विकत घेत असतो. हे इंधन घेताना आपणाला खरेदी डॉलरमध्‍ये करावी लागते. डॉलरचा भाव 45 रुपयांवरुन आता 52 रुपयांच्‍या वर पोहोचला त्‍यामुळे खरेदी करताना जादा रक्‍कम मोजावी लागते परिणामी आपणास अधिक भाव मोजावा लागणार हे सत्‍यच आहे.
इंधन बचतीचा सर्वात सोपा मार्ग म्‍हणजे आपण सार्वजनिक वाहनांचा वापर वाढवायला हवा. आपणाकडे गेल्‍या 15 वर्षात लोकांच्‍या हाती मोठ्या प्रमाणात पैसा यायला लागला सोबतच बँकांनी कर्जपुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढविला याचा परिणाम वाहनसंख्‍येत अमर्याद वाढ होण्‍यावर झालेला आहे.
सुलभ हप्‍त्‍याने कर्जरुपाने वाहन घेणे सोपे पण त्‍यामुळे इंधनाचा वापर वाढतो. पब्‍लीक ट्रान्‍सपोर्टचा वापर केल्‍यास यावर नियंत्रण राहू शकते. माझ्याकडे कार आहे पण ती कधी वापरावी याचं मला शिक्षण नाही यामुळे आहे तर वापरा, या अट्टहासाने रस्‍त्‍यावर रहदारी तर वाढली सोबतच इंधनाची मागणी आणि अपघातांची संख्‍याही वाढली आहे.
ज्‍या मुल्‍याचा इंधनात आपण एकटे एका वाहनात 10-15 किलोमीटर जाता त्‍याच्‍या निम्‍म्‍या किंमतीत 50 जण बसच्‍या माध्‍यमातून जाऊ शकतात याचं भान आपण ठेवलं तर ही इंधनाची मागणी नियंत्रणात राहील. इंधनाचा खप नियंत्रित राहीला नाही तर येणा-या काळात याच्‍या किंमती आणखी वाढतील हे स्‍पष्‍टच आहे.
सार्वजनिक वाहन प्रणालीचा वापर ही आज काळाची गरज बनली आहे आणि आपण हा विषय गांभिर्याने घेऊन त्‍यानुरुप बदल घडवण्‍याची वेळ आली आहे.
प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment