Monday 14 March 2016



                    मागेल त्‍याला शेततळे योजनेत शेतक-यांचा सहभाग वाढवा
                                                विभागीय आयुक्‍त  अनुपकुमार
·        सौर कृषीपंप व मागेल त्‍याला शेततळे योजना चित्ररथाला हिरवी झेंडी
·        जिल्‍हयात चित्ररथाच्‍या माध्‍यमातून योजनांची प्रसिध्‍दी
·        जिल्‍हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
वर्धा दि,11-दुष्‍काळावर मात करण्‍यासाठी तसेच कोरडवाहू शेतीसाठी अत्‍यंत उपयुक्‍त ठरणा-या मागेल त्‍याला शेततळे योजनेमध्‍ये प्रत्‍येक शेतक-यांनी सहभागी होण्‍यासाठी आवाहन करताना सौरकृषीपंपाच्‍या माध्‍यमातून शेती सिंचनाखाली आणणा-या महत्‍वकांशी योजना चित्ररथाच्‍या माध्‍यमातून घरोघरी पोहोचवा असे प्रतिपादन विभागीय आयुक्‍त अनूप कुमार यांनी आज केले.
जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरातील शेतक-यांसाठी सौर कृषीपंप योजनेत तसेच मागेल त्‍याला शेततळे या योजनांच्‍या प्रसिध्‍दी चित्ररथाला विभागीय आयुक्‍त अनूप कुमार यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्‍हयातील आठही तालुक्‍यात दहा दिवस चित्ररथाच्‍या माध्‍यमातून योजनांची माहिती शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यात येणार आहे. यावेळी जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील, अपर जिल्‍हाधिकारी दीपक नलवडे, कृषी उपसंचालक श्री.कापसे   तसेच महसूल अधिकारी उपस्थित होते.
मागेल त्‍याला शेततळे ही योजना शेतीमध्‍ये शाश्‍वत सिंचनासाठी तसेच दुष्‍काळी परिस्थितीवर मात करताना कोरडवाहू शेतक-यांना पीक वाचविण्‍यासाठी महत्‍वाकांशी असल्‍यामुळे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्‍याने ही योजना राबविण्‍याचे धोरण ठरविले असून जिल्‍हयातील प्रत्‍येक शेतक-याने या योजनेत सहभागी होऊन आपले नाव नोंदवावे असे आवाहन विभागीय आयुक्‍त अनूप कुमार यांनी केले आहे. शेततळे योजना राबविण्‍यासाठी शासनाने 50 हजार रुपयापर्यंतचे अनुदान उपलब्‍ध करुन दिले असल्‍यामुळे शेतक-यांनी स्‍वयंस्‍फूर्तीने शेततळयाची मागणी नोंदवावी असेही यावेळी त्‍यांनी सांगितले.
वर्धा जिल्‍हयासाठी सौरकृषीपंप योजना राबविण्‍यात येत असून जिल्‍यातील 920 शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्‍याना केवळ 5 टक्‍के रक्‍कम भरावयाची असल्‍यामुळे ही योजना शेतक-यांच्‍या हिताची आहे. कृषी पंपाच्‍या माध्‍यमातुन आपली शेती सिंचनाखाली आणावी असे आवाहनही विभागीय आयुक्‍तांनी  केले.
            जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील यांनी शेतक-यांसाठी सौर कृषी पंप योजनेमध्‍ये शेतक-यांचा सहभाग वाढत असून समारे 500 शेतक-यांनी आपले नाव नोंदविले आहे. जिल्‍हयात 920 शेतक-यांना या योजनेचा लाभ दयायचा असल्‍याने विजेचे कनेक्शन नसलेल्‍या प्रत्‍येक शेतक-याने या योजनेत सहभागी व्‍हावे. मागेल त्‍याला शेततळे योजनेमध्‍ये जिल्‍हयात 2 हजार 24 लाभार्थ्‍यांना लाभ देण्‍यात येणार असून शेतक-यांनी शेततळे बांधण्‍याची योजना यशस्‍वी करण्‍यासाठी जिल्‍हयातील तालुका कृषी अधिकारी तसेच तहसीलदार यांचेकडे आपले नाव नोंदवावे. असे आवाहन यावेळी केले. मागेल त्‍याला शेततळे योजनेसाठी प्रत्‍येक तालुक्‍यात विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्‍यात येणार असून शेतक-यांना या योजनेच्‍या माहितीसाठी विहित नमुन्‍यात  अर्ज भरुन घेण्‍यात येणार असल्‍याचे यावेळी जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी स्‍वागत करुन सौर कृषी पंप योजना तसेच मागेल त्‍याला शेततळे या योजनेसंदर्भात व्‍यापक प्रसिध्‍दीसाठी तयार करण्‍यात आलेल्‍या चित्ररथाची माहिती दिली. चित्ररथ 12 मार्च रोजी समुद्रपूर तालुक्‍यात तसेच 13 मार्चरोजी हिंगणघाट तालुक्‍यातील विविध गावांमध्‍ये जाऊन या योजनांची जनतेला माहिती देणार आहे. विभागात देवळी तालुक्‍यात 14 मार्च, पुलगाव तालुक्‍यात 15 मार्च ,आर्वी तालुक्‍यात 16 ,आष्‍टी तालुक्‍यात 17 मार्च ,कारंजा तालुक्‍यात 18 मार्च ,सिदी रेल्‍वे 19 मार्च सेलू तालुक्‍यात 20 मार्च तसेच वर्धा येथे या चित्ररथाचा समारोप होईल.
                                                            00000







No comments:

Post a Comment