Tuesday 15 March 2016

शेतकरी उत्‍पादक गटांकडून शेतमाल खरेदीसाठी धान्‍य महोत्‍सव
- आशुतोष सलिल
Ø  दि.18 ते 20 मार्च दरम्यान महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
             वर्धा,दि.15 -  शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या संकल्‍पनेवर आधारीत धान्‍य महोत्‍सवाचे आयोजन दिनांक 18 ते 20 मार्च या कालावधीत मगनवाडी वर्धा येथे कृषी तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा ) कृषी विभाग, वर्धा आणि एमगिरी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने करण्‍यात आले आहे. शेतकरी उत्‍पादन गटांनी उत्‍पादीत केलेल्‍या शेती माल व प्रक्रियायुक्‍त पदार्थांना याद्वारे व्‍यासपीठ उपलब्‍ध होणार आहे. थेट विक्रीतून ग्राहक आणि उत्‍पादक यांना फायदा होणार असल्‍याने ग्राहकांनी महोत्‍सवात सहभागी होऊन शेतक-यांचा  उत्‍साह वाढण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
    महोत्‍सवाचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्‍याहस्‍ते होणार आहे. दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता संदीपपाल म‍हाराजांचा प्रबोधनात्‍मक कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. दिनांक 20 मार्च रोजी दुपारी 12 वाजता खरेदीदार संमेलन होणार असून दुपारी 1 वाजता आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार यांच्‍या उपस्थितीत होणार आहे.
शेतक-यांना बाजारपेठेचा पर्याय उपलब्‍ध करणे आवश्‍यक आहे. हंगामात शेतमालाला वाजवी भाव मिळत नसल्‍याने शेतक-यांना आर्थिक फायदा होत नाही. ग्राहकांना मात्र चढ्या भावाने खरेदी करावी लागत असल्‍याने आर्थिक गणित कोलमडते. धान्‍य महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून शेतकरी व ग्राहक यामधील संपर्क वाढवून  थेट विक्रीतून दरांमधील तफावत कमी होईल. यातूनच शेतकरी उत्‍पादक गटांना शाश्‍वत बाजारपेठेचा विकास करता येईल. त्‍यामुळे दोन्‍ही आघाडीवर फायदा होऊन शेतीक्षेत्राला शाश्‍वत आणण्‍याचा प्रयत्‍न असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
                   
 या धान्‍य महोत्‍सवात विनापॉलीश डाळी, तांदूळ, गहू, प्रक्रिया पदार्थ, नैसर्गीक पद्धतीने उत्‍पादीत शेतमाल, हळद व इतर मसाला पदार्थ विक्रीसाठी उपलब्‍ध राहतील. शेतकरी गटांना विक्रीचे तंत्र माहिती करुन देण्‍यासोबत गुणवत्‍ता ब्रॅडींग  यासाठीची माहिती देण्‍याचा प्रयत्‍न केला जाणार आहे.
    शेतकरी गटांना बाजारपेठेशी थेट जोडण्‍यासाठी दिनांक 20 मार्च रोजी खरेदीदार व विक्रेता संमेलन आयोजित केले असून त्‍यातून कंपन्‍यासमवेत करार घडवून आणले जातील. जेणेकरुन शेतमालास हक्‍काची बाजारपेठ उपलब्‍ध होईल, या महोत्‍सवाचा सर्वांनी लाभ घ्‍यावा,असे आवाहनही जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
                                                                 0000000              
  

No comments:

Post a Comment