Tuesday 15 March 2016

             ग्राहक चळवळ अधिक बळकट करा
                                               -दीपक नलवडे
Ø  जागतिक ग्राहक दिनानिमित्त प्रदर्शनीचे आयोजन
Ø  विविध ग्राहक संघटनांचा सहभाग
             वर्धा, दिनांक 15 – ग्राहक चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ग्राहक चळवळ लोक चळवळ बनून प्रत्येक ग्राहकांच्याहिताचे रक्षण व्हावे, यासाठी ग्राहकांसोबत प्रशासनाची साथ असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी केले.
अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्यावतीने जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होतेयावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा ग्राहक तक्रार मंचचे सदस्य मिलिंद केदार, ग्राहक कल्याण परिषदेचे सचिव अजय भोयर, भाऊराव काकडे, तहसीलदार राहुल सारंग यांची उपस्थिती होती.
         नलवडे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात ग्राहक नडला जात आहे. सध्या ऑनलाईन खरेदीतही ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. परंतु ग्राहकाला त्याच्या अधिकाराची जाणीव, ग्राहक हक्क संरक्षण कायद्याबाबत जागृती होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच होणा-या गैरप्रकारावर नियंत्रणासाठी शासनस्तरावरून योग्य कार्यवाही सुरू आहे. तरीही ग्राहकांनी जागरूक राहून प्रत्येक खरेदी केलेल्या वस्तूची खरेदी पावती दुकानदारांकडून घ्यावी. आयएसआय, हॉलमार्क असलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
             अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त श्री. तिवारी यांनी अन्न नागरी मानदे कायदा , औषध सौंदर्य प्रसाधने कायदा आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच तंबाखू सेवन करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी  खरेदी करावी असे सांगून ग्राहक जागरूक होवो, असेही ते म्हणाले.
         माधव चोरे, डॉ. बेहरे, श्री. चिंचपान यांनीही ग्राहकांनी जागरूक राहावे, असे आवाहन केले. त्याचबरोबर ग्राहकांनी त्यांच्या अधिकाराची माहिती करून घ्यावी, असे सांगत कृषी, गॅस, वीज, रॉकेल आदी क्षेत्राबाबत विचार मांडून ग्राहकांनी प्रत्येक खरेदीबाबत जागृत राहावे,असेही सांगितले. श्री. केदार, श्री. भोयर यांनीही विचार मांडले. यामध्ये त्यांनी पतसंस्था, शेतकरी अपघात विमा, ऑनलाईन खरेदी तक्रारीबाबत मार्गदर्शन करून ग्राहक संरक्षण हक्क कायद्याबाबत जागृती व्हावी, असे सांगून शेवटच्या घटकापर्यंत ग्राहकांच्या हिताचा विचार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
             प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते झाले. प्रास्ताविक श्री.सारंग यांनी केले. सूत्रसंचालन श्री.रासपायल्ले यांनी केले. आभार श्री.काळे यांनी मानले.

00000

No comments:

Post a Comment