Tuesday 15 March 2016

मागेल त्‍याला शेततळे योजना
शनिवार व रविवारी विशेष शिबीर
Ø शेततळयासाठी तहसील कार्यालयात नोंदणी
Ø योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन
Ø शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ जमा होणार
      वर्धा, दि.14 – मागेल त्‍याला शेततळे योजनेचा लाभ जिल्‍ह्यातील शेतक-यांना सुलभपणे मिळावा यासाठी शनिवार व रविवारी सर्व तहसील कार्यालयात शेतकरी शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. या शिबिरात शेततळ्यांसाठी आपली मागणी नोंदवून मागेल त्‍याला शेततळे योजनेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
        शेती उत्‍पादनामध्‍ये शाश्‍वतता यावी व पिकांना आवश्‍यकता भासेल त्‍यावेळी पाणी उपलब्‍ध व्‍हावे यासाठी शेतामध्‍ये शेततळी बांधण्‍याचा महत्‍वाकांक्षी कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. जिल्‍ह्यातील शेतक-यांसाठी शासनाच्‍या संकेतस्‍थळावर ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. योजनेत सहभागी होण्‍यासाठी शनिवार दिनांक 19 व रविवार दिनांक 20 मार्च रोजी सर्व तहसील कार्यालयामध्‍ये शिबिराच्‍या माध्‍यमातून शेततळ्यांसाठी नोंदणी करण्‍यात येणार आहे.
शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.
        या शिबिरामध्‍ये प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या ठिकाणी तहसीलदार, तालुका कृषी विकास अधिकारी, तलाठी हे शेततळ्यासाठी प्रत्‍यक्ष अर्ज भरुन घेणार आहेत. यासाठी  लागणारा सातबारा, आठ अ आदी कागदपत्रे शिबिराच्‍या ठिकाणीच उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत. शेतक-यांचे अर्ज ई-सुविधा केंद्राच्‍या साहय्याने ऑनलाईन करण्‍याची संपूर्ण कार्यवाही शिबिरात करण्‍यात येणार आहे. यासाठी आवश्‍यक फी रुपये 23 भरावयाची आहे. शेतकरी बांधवांनी जास्‍ती जास्‍त संख्‍येने उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
        सदरचा कार्यक्रम हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून या योजनेअंतर्गत वर्धा जिल्‍हयास सन 2016-17 करिता 2034 शेततळ्याचे लक्षांक निर्धारित करण्‍यात आलेले आहे.
        या योजनेत सहभागी होणा-या शेतक-यांकडे त्‍यांच्‍या नावावर कमीत कमी 0.60 हे जमीन असणे आवश्‍यक आहे, यास कमाल मर्यादा नाही. योजनेत सहभागी होऊ इच्छिणा-या अर्जदारांनी यापूर्वी शेततळे, सामूहिक शेततळे या घटकाचा शासकीय योजनामधून लाभ घेतलेला नसावा. या योजनेत शेततळ्यांची कामे शेतक-यांनी स्‍व्‍तः करावयाची असून आकारमाननिहाय देय रक्‍कम शेतक-यांचे बँक खात्‍यात थेट जमा होणार आहे. जास्‍तीत जास्‍त अनुज्ञेय अनुदान रक्‍कम रु. 50000/- एवढी असल्याचेही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सांगितले आहे.

00000000000

No comments:

Post a Comment