Monday 29 October 2012

विदर्भातील ग्रामीण खेळाडूंनी राष्‍ट्रीय स्‍पर्धांची तयारी करावी - रणजित कांबळे


            *  39 वा विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेतून विदर्भ संघाची निवड
       *  कुमारगट मुलांचे अमरावती तर मुलींमध्‍ये नागपूर जिल्‍हा अजिंक्‍य

           वर्धा दि. 29 - विदर्भातील ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्‍ट्रीय स्‍पर्धासाठी तयार करण्‍यासाठी प्रत्‍येक तालुका स्‍तरावर आवश्‍यक सुविधा निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने संपूर्ण सहकार्य करण्‍यात येईल अशी ग्‍वाही राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम,पाणीपुरवठा राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी दिली.
          पुलगाव येथे आयोजित 39 व्‍या विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धाच्‍या उदघाटन  समारंभाप्रसंगी राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्‍छा देवून राज्‍य व राष्‍ट्रीय स्‍तरावर आपल्‍या दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करुन प्रतिनिधीत्‍व करा असेही त्‍यांनी सांगितले.
 स्‍वर्गिय प्रभाताई राव स्‍मृती प्रित्‍यर्थ नगर स्‍पोटींग क्‍लब,पुलगांव-नाचणगाव यांच्‍या वतीने 39 व्‍या विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेचे आयोजन  येथील आर.के. हायस्‍कुलच्‍या प्रांगणात  आयोजित करण्‍यात आले होते.
या स्‍पर्धेत विदर्भातील कुमार गटातील 22 संघांनी सहभाग घेतला. यामध्‍ये मुलांचे 11 तर मुलींच्‍या 11 संघांचा सहभाग होता.उदघाटन समारंभात इंडियन मिलटरी स्‍कूलच्‍या जवानांनी व खेळाडूंनी मानवंदना दिली. स्‍पर्धेचे उदघाटन राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांच्‍याहस्‍ते दिप प्रज्‍वलनाने झाले.  कुमारगटातील  यवतमाळ- अमरावती या जिल्‍ह्यातील झालेल्‍या मुलांच्‍या अंतिम सामन्‍यात    अमरावतीच्‍या चमूने अजिंक्‍यपद पटकाविले.तर यवतमाळ व नागपूर जिल्‍ह्यातील झालेल्‍या मुलींच्‍या अंतिम सामण्‍यात नागपूर विभाग अजिंक्‍य ठरला.
विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेमधून  विदर्भाचा संघ निवडला जाणार असल्‍याचे विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्‍यक्ष विलासराव इंगोले यांनी यावेळी सांगितले.
          विदर्भातील ग्रामीण भागातून खेळाडू तयार होऊन तो  राज्‍य व राष्‍ट्रीय स्‍तरावर भरारी मारुन त्‍या खेळाडूने ऑलंपिकमध्‍ये देशाचे प्रतिनिधीत्‍व करावे,असा संदेश राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा राज्‍यमंत्री रणजीत कांबळे यांनी दिला.
कबड्डी खेळामुळे प्रत्‍येक जण मातीशी जुळतो.कबड्डी हा खेळ कमी खर्चात कमी जागेत उत्‍कृष्‍टरित्‍या   खेळता येतो.प्रत्‍येक खेळ हा खेळाडूंच्‍या भावनेशी निगडीत असून,कबड्डी खेळाकरीता खेळाडूंना प्रोत्‍साहित करण्‍याची गरज राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी व्‍यक्‍त केली.                                       
          सुरवातीला माता सरस्‍वती,हिमाचल प्रदेशच्‍या माजी राज्‍यपाल स्‍व. प्रभा राव यांच्‍या प्रतीमेचे पूजन व माल्‍यार्पण करण्‍यात आले. त्‍यानंतर तीन दिवसीय कबड्डी स्‍पर्धेचे उद्घाटन  करण्‍यात आले. शनिवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत मुलींच्‍या गटाचे तर मुलांच्‍या गटाचे प्रत्‍येकी तीन असे  6 सामने खेळविण्‍यात आले.
         जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा  श्रीमती चारुताई राव टोकस यांनी अध्‍यक्षीय भाषणात विदर्भस्‍तरीय स्‍पर्धेच्‍या आयोजनासाठी संपूर्ण मदत करण्‍यात येईल व स्‍पर्धकांना प्रोत्‍साहनासाठी सदैव तत्‍पर असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.     जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष नानाभाऊ ढगे, श्रीमती चारुताई राव टोकस,वर्धा जिल्‍हा कॉग्रेस कमेटीचे अध्‍यक्ष किरणभाऊ उरकांदे यांच्‍या हस्‍ते विजयी संघांना बक्षिस देण्‍यात आले.
यावेळी विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्‍यक्ष विलासराव इंगोले, सचिव, सुभाष पिसे,पुलगांव नगर परिषदेचे अध्‍यक्ष भगवानसिंग ठाकूर,उपाध्‍यक्ष,सुनिल ब्राम्‍हणकर, राजूभाऊ कोचर, रमेश सावरकर,आर.के. महाविद्यालयाचे बालकिसन टिबडीवाल,नाचणगावचे सरपंच शेकर राऊत विदर्भ कबड्डी असोसिएशन चेआयोजक आर.एस.साहू तसेच विदर्भातील क्रीडाप्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होती.  
000

No comments:

Post a Comment