Saturday 3 November 2012

शेतक-यांच्‍या प्रश्‍नासह महत्‍वाच्‍या योजना लोकांपर्यंत पोहचविण्‍यावर - एन.नविन सोना भर नव्‍या जिल्‍हाधिका-यांनी पदभार सांभाळला


          वर्धा, दिनांक 2 – वर्धा जिल्‍ह्याच्‍या  सर्वांगीन विकासासाठी  आवश्‍यक असलेल्‍या  सर्व योजना प्रभावीपणे  राबविण्‍यासोबतच शेतक-यांच्‍या  प्रश्‍नाला  प्राधान्‍य देवून महत्‍वाच्‍या योजना  जनतेपर्यंत  पोहचविण्‍यासाठी  अग्रक्रम राहणार असल्‍याची  ग्‍वाही  वर्धा जिल्‍ह्याचे  नवनियुक्‍त जिल्‍हाधिकारी एन. नविन सोना यांनी  जिल्‍हाधिकारी  पदाची  सुत्रे स्विकारल्‍यानंतर  दिली.
       भारतीय  प्रशासकीय सेवेतील 2000 बॅचचे  असलेले एन.नविन सोना हे अभियांत्रीकी शाखेतील पदवीधर असून, ते चेन्‍न्‍ई येथील रहिवाशी आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेत पदार्पण केल्‍यानंतर  उपविभागीय अधिकारी रत्‍नागीरी  येथून  शासकीय सेवेला सुरुवात केली असून, औरंगाबाद येथे  विक्रीकर विभागाचे  सहआयुक्‍त , औरंगाबादचे अपर आयुक्‍त काम केल्‍यानंतर  2009 मध्‍ये त्‍यांची  अमरावती येथे  अपर आयुक्‍त या पदावर नियुक्‍ती  करण्‍यात आली.  अमरावती येथे  विभागीय आयुक्‍त तसेच जिल्‍हाधिकारी या पदाचाही अतिरीक्‍त कार्यभार सांभाळला असून, अमरावती  महानगरपालीकेचे आयुक्‍त पदावरही त्‍यांनी  काम केले आहे. नुकतेच नागपूर येथे संचालक वस्‍त्रोद्योग या पदावर  एन.नविन सोना यांची शासनाने नियुक्‍ती  केली होती.   
            जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांची  उत्‍तर प्रदेश प्रशासनामध्‍ये  प्रतीनियुक्‍तीवर  बदली झाल्‍यामुळे  एन.नविन सोना यांनी  वर्धाचे जिल्‍हाधिकारी पदाचा आज कार्यभार स्विकारला आहे.
           जिल्‍हाधिकारी पदाची  सुत्रे स्विकारल्‍यानंतर  वर्धा जिल्‍ह्याचे  विशेष प्रश्‍न समजावून घेवून  ते सोडवून घेण्‍यासाठी  माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्‍यावर विशेष भर राहणार असल्‍याचे सांगितले. जीआयएस बेस या आधुनिक तंत्राचा वापर करण्‍यात   येणार असल्‍याचे सांगतांना  एन.नविन सोना म्‍हणाले की, वर्धा जिल्‍ह्यात  औद्योगिक विकासाला चालना देणे तसेच शासनाच्‍या  विविध योजनांसाठी  शासनाकडून  जास्‍तीत जास्‍त  निधी उपलब्‍ध  होईल या दृष्‍टीने प्रयत्‍न असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
             वर्धा जिल्‍ह्यात  आधार कार्ड नोंदणी  राज्‍यात  सर्वाधिक झाली असून, ई-सेवेच्‍या माध्‍यमातून शेतकरी  व सामान्‍य जनतेला जलद व प्रभावी सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी विशेष भर असल्‍याचेही  जिल्‍हाधिकारी  एन.नवीन सोना यांनी  यावेळी  स्‍पष्‍ट  केले.
           मावळत्‍या जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री  भोज  यांनी  एन.नविन सोना यांना जिल्‍हाधिकारी  पदाची  सुत्रे प्रदान केली तसेच त्‍यांचे पुष्‍पगुच्‍छ  देवून  स्‍वागत केले. व नव्‍या पदासाठी  शुभेच्‍छा दिल्‍यात.
                                                            00000

No comments:

Post a Comment