Friday 24 August 2012

नागभुषण पुरस्‍काराचे रविवारी वितरण


                           
       वर्धा, दि. 24- ज्‍येष्‍ठ गांधीवादी विचारवंत व अर्थशास्‍त्राचे गाढे अभ्‍यासक प्रा. ठाकुरदास बंग यांना यावर्षीचा नागभूषण पुरस्‍कार रविवार दिनांक  26 ऑगस्‍ट रोजी दुपारी 4 वाजता सेवाग्राम आश्रम येथे आयोजीत विशेष समारंभात देण्‍यात येणार आहे.
          नागभूषण अवार्ड फाऊंडेशनच्‍या वतीने दिल्‍या जाणा-या नागभुषण पुरस्‍कारामध्‍ये  1 लाख रुपये , सन्‍मान चिन्‍ह, शाल व श्रीफळ  यांचा समावेश आहे. ज्‍येष्‍ठ  गांधीवादी नेते नारायणभाई देसाई यांच्‍या हस्‍ते ठाकुरदासजी बंग यांना नागभूषण पुरस्‍कार दिल्‍या जाणार असून या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी  सर्वोदय संघाच्‍या अध्‍यक्षा राधाबहन भट्ट राहणार  आहेत.  यावेळी  सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मा.म.गडकरी  प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित   राहणार असल्‍याची माहिती नागभुषण  अवार्ड फांऊडेशनचे प्रमुख गिरीश गांधी  यांनी दिली.
      विदर्भाच्‍या विकासात मोलाचे योगदान देणा-या किंवा विदर्भाचा नावलौकीक राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर वाढवणा-या  सन्‍माननीय व्‍यक्‍तींना  दरवर्षी   हा नागभुषण पुरस्‍कार देऊन गौरविण्‍यात येतो.  नागभूषन अवार्ड फाऊंडेशनचे अध्‍यक्ष प्रभाकरराव मुंडे, उपाध्‍यक्ष सत्‍यनारायण नुवाल, सचिव गिरीश गांधी, कोषाध्‍यक्ष  ब्रिजकिशोर अग्रवाल तसेच सदस्‍य म्‍हणून  सुरेश शर्मा, अजयकुमार संचेती, डी.आर.माली, राजेंद्र पुरोहीत, सागर मेघे, मोहन अग्रवाल व विलास काळे हे सुध्‍दा या कार्यक्रमास उपस्थित   राहणार आहेत. नागभूषन वितरण समारंभास  उपस्थित राहण्‍याचे आवाहन नागभूषण अवार्ड फाऊंडेशनचे महासचिव गिरीश गांधी यांनी केले आहे.
       ज्‍येष्‍ठ स्‍वातंत्र्य सैनिक , भुदान चळवळीचे कार्यकर्ते व लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्‍या संपूर्ण क्रांतीचे प्रमुख कर्णधार असलेले गांधीवादी विचारवंत ठाकुरदास बंग हे 1942 मध्‍ये  महात्‍मा गांधी यांनी  गोवालीया टँक मैदानावर केलेल्‍या करा वा मरो च्‍या आवाहनानंतर आपल्‍या नोकरीचा राजीनामा देऊन  स्‍वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्‍यांना  दोन वर्षे सक्‍त मजूरीची शिक्षाही झाली होती. प्रो.बंग हे जहाल अहिंसक  सत्‍याग्रही म्‍हणूनही ओळखले जात होते.  
           आचार्य विनोबा भावेंच्‍या आवाहनानंतर ठाकूरदासजी बंग यांनी 1957 मध्‍ये भूदान पदयात्रा काढली. महात्‍मा गांधी  सोबत स्‍वातंत्रय आंदोलन, विनोबा भावे यांचेसोबत सर्वोदय आंदोलन व जयप्रकाश नारायण यांचे सोबत संपूर्ण क्रांती आंदोलन या तीनही राष्‍ट्रीय आंदोलनामध्‍ये त्‍यांचा सहभाग राहीलेला आहे.
                                                     000000

No comments:

Post a Comment