Friday 6 July 2012

ग्रामीण क्षेत्राच्‍या विकासावर अधिक भर -रणजित कांबळे


                                  
                                       वर्धा दि. 6 – गेल्‍या अनेक वर्षापासून तरोडा व परिसरांत विकासाचे कामे संथ गतीने सुरु होते. हे ग्रामिण क्षेत्र देवळी-पुलगांव मतदार संघात समाविष्‍ट झाल्‍यामुळे या क्षेत्राच्‍या विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्‍यात येणार असून ग्रामिण क्षेत्राच्‍या विकासावर अधिक भर देण्‍यात येईल असे आश्‍वासन पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता,सार्वजनिक बांधकात विभागाचे राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी दिले.
                                    काल वर्धा तालुक्‍यातील मदनी व तरोड येथे ग्रामपंचायत भवन आंगणवाडीच्‍या जागेचे व रस्‍त्‍याचे भुमिपुजन त्‍यांचे हस्‍ते संपन्‍न झाले त्‍यावेळी तरोडा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जि.प.अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे,पं.स. सभापती धैर्यशिल जगताप,पं.स.सदस्‍य निताताई शिंदे,सरपंच सुभाष चांभारे,तहसिलदार सुधांशु बन्‍सोड, माजी जि.प. सदस्‍य देवराव पाटील, मदनीच्‍या सरपंच निर्मलाताई कोवे,उपसरपंच मनिष मेहत्रे आदि उपस्थित होते.
                                     गेल्‍या  अनेक वर्षापासून हे क्षेत्र हिंगणघाट मतदार क्षेत्रामध्‍ये समाविष्‍ट असल्‍याचे मनूद करुन राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की मतदार संघाच्‍या पूर्नविभाजनामुळे हे क्षेत्र आता पुलगांव –देवळी मतदार संघात आले आहे. त्‍यामुळे या क्षेत्राचा विकास करणे हे माझे प्राथमिक कर्तव्‍य समजतो. तरोडा ग्रामपंचायत भवनाच्‍या बांधकामासाठी 17 लक्ष रुपये खर्च अपेक्षित असून त्‍यामधे साडे आठ लाख  जिल्‍हा नियोजन समितीच्‍या अनुदानातून साडे पांच लाख आमदार निधीतून व 3 लाख ग्रा.प. अनुदानातून खर्च होतील. गावांचा सर्वांगिण विकास करण्‍यासाठी माझया मतदार संघातून दोन गावे निवडून  प्रस्‍तावित केले असून  त्‍यातील एक गांव  तरोडा व दूसरे विजयगोपाल आहे.या गावांतील  रस्‍ते ,नालीबांधकाम व सौंदर्यिकरणासाठी 3 कोटीचा प्रस्‍ताव विदर्भ वैधानिक विकास मंडळाकडे पाठविण्‍यात आला असून तो प्रस्‍ताव शासन स्‍तरावर मंजूर करण्‍यांत येईल. एरनगांव ते सावली हा प्रस्‍तावित असलेल्‍या रस्‍त्‍याला मान्‍यता प्रदान करण्‍यात आली आहे. गांवातील सरपंच धडाडीचा असल्‍यास कामांचा पाठपुरावा करतो त्‍यामुळे   गावांतील प्रस्‍तावित विकासाचे कामे तातडीने पूर्ण होत असतात.या परिसरातील विकासाचे कार्य प्रामाणिकपणे पूर्णत्‍वास नेणार असून जाम ते तरोडा पर्यन्‍तचा रस्‍ता येत्‍या कालखंडामध्‍ये दुरुस्‍त करुन त्‍या रस्‍त्‍याचे  डांबरीकरण केल्‍या  जाईल. तसेच प्रस्‍तावित पांधनरस्‍ते माती व मुरमाचा थर देवून रस्‍ता मजबूत करण्‍यात येईल असेही ते म्‍हणाले.
                                     याप्रसंगी बोलतांना जि.प. अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की, अल्‍लीपूर येथील पाण्‍याचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी राज्‍यमंत्र्यांनी मोलाची मदत करुन ग्रामिण पाणीपुरवठा योजनेत साडे नऊ कोटीची योजना मंजुर केली.त्‍यामुळे ग्रामस्‍थांना दिलासा मिळाला आहे. आमदार  निधीतून अनेक विकास कामे राबविण्‍यात येत आहे असेही ते म्‍हणाले.
       यावेळी आपत्‍ती व्‍यवस्‍थापण अंतर्गत विहीरीत पडून मृत्‍यू पावलेले अमोल धनविज यांच्‍या पत्‍नी छबिनाताई यांना 1 लाखाचा धनादेश मंत्रीमहोदयांचे हस्‍ते प्रदान  करण्‍यात आला.
       याप्रसंगी मदनी व तरोडा येथील ग्रामपंचायत भवन,आंगणवाडी इमारतीच्‍या जागेचे तसेच ग्रामपंचायती अंतर्गत रस्‍त्‍याचे भुमिपुजन मंत्रीमहोदयांच्‍या  हस्‍ते करण्‍यात आले.
                                      यावेळी जगताप यांनीही समायोजित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन सुभाष चांभारे  व आभार प्रदर्शन संदिप तिमांडे यांनी मानले.यावेळी मोठया संखेत जिल्‍हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्‍थ उपस्थित होते.
                                                                                  000000

No comments:

Post a Comment