Monday 2 July 2012

जिल्‍हा विकास योजने अंतर्गत मंजूर कामांचे तात्‍काळ नियोजन करा - राजेंद्र मुळक विकास योजनांसाठी 78 कोटी 65 लाख रुपयाचा निधी प्राप्‍त


   वर्धा, दि. 2- जिल्‍हा नियोजन  समितीने सुचविलेल्‍या जिल्‍ह्यातील विविध विकास कामांसाठी  78 कोटी 65 लाख रुपयाचा निधी प्राप्‍त झाला असून, विभाग प्रमुखांनी विकास कामांचे नियोजन , प्रशासकीय मान्‍यता  आदि प्रक्रिया पूर्ण करुन  तात्‍काळ प्रत्‍यक्ष कामाला सुरुवात करावी अश्‍या सुचना  पालकमंत्री  राजेंद्र मुळक यांनी आज दिल्‍या.
जिल्‍ह्यातील विकास कामांचा आढावा घेताना पालकमंत्री 
            जिल्‍हा विकास योजने अंतर्गत 2012-13 या वर्षासाठी  सर्व साधारण योजनेमध्‍ये 62 कोटी 47 लाख रुपये अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत  तर 5 कोटी रुपये  तर आदिवासी उपयोजने अंतर्गत 11 कोटी 13 लक्ष रुपयाचा निधी उपलब्‍ध झालेला आहे. हा निधी एकूण मंजूर नियतव्‍ययाच्‍या 75 टक्‍के असल्‍याची  माहितीही  पालकमंत्र्यांनी  यावेळी दिली.
      विकास भवन येथे जिल्‍हयात  राबविण्‍यात  येत असलेल्‍या  विविध विकास कामांचा आढावा तसेच जिल्‍हा विकास नियोजना  अंतर्गत  मंजूर केलेल्‍या योजनांची  प्रगतीचा आढावा
पालकमंत्र्यांनी  घेतला. त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            यावेळी  पाणी पुरवठा,स्‍वच्‍छता व  सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री रणजित कांबळे, आमदार व  विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्‍यक्ष सुरेश देशमुख , अशोक शिंदे, दादाराव केचे, नितेश भांगडिया, जि.प. चे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वरराव ढगे,  जिल्‍हा नियोजन समितीचे सदस्‍य शेखर  शेंडे, जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने , आदि व्‍यासयपिठावर उपस्थित होते.
            जिल्‍हा वार्षिक योजने अंतर्गत  या वर्षीसाठी 80 कोटी रुपये  खर्चाचा  वार्षिक आराखडा   मंजूर करण्‍यात आला असून, यापैकी  75 टक्‍के  निधी  एकूण 62 कोटी 47 लक्ष 61 हजार रुपये  प्राप्‍त झाले आहे. यामध्‍ये  सामाजिक व सामुहिक सेवा योजने अंतर्गत 18 कोटी, वाहतूक व दळणवळण  15 कोटी  33 लाख, ग्रामीण विकासासाठी 11 कोटी 86 लाख , कृषि व संलग्‍न सेवेसाठी 8 कोटी 36 लाख व विद्युत विकासासाठी 1 कोटी 60 लाख रुपयाचा निधी प्राप्‍त झाला आहे. विभाग प्रमुखांनी  विकास योजने अंतर्गत सुचविलेल्‍या कामांचे आराखडे व जागेची उपलब्‍धता  आदि प्रक्रिया  पूर्ण करुन  त्‍यानंतर प्रत्‍यक्ष कामाला सुरुवात करावी अशा सुचना पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी यावेळी दिल्‍या.
                                    58 टक्‍के पेरण्‍या पूर्ण
            जिल्‍ह्यात सुरुवातीला पाऊस पडल्‍यामुळे काही तालुक्‍यात शेतक-यांनी  पेरण्‍यांना सुरुवात केली आहे.  मागील दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्‍ह्यात 58 टक्‍के क्षेत्रात शेतक-याने  पेरण्‍या  केल्‍या असल्‍याची माहिती देताना पालकमंत्री म्‍हणाले की     1 लक्ष 29 हजार क्षेत्रात  कापूस तर 89 हजार क्षेत्रात सोयाबीन तसेच इतर पिकांखाली 2 लाख 51 हजार हेक्‍टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.
            शेतक-यांना त्‍यांच्‍या मागणीनुसार बियाणांची व खतांची उपलब्‍धता करुन द्या तसेच जिल्‍ह्यात बियाणांचा व खतांचा काळा बाजार होणार नाही याची दक्षता घेण्‍याची सुचनाही  पालकमंत्र्यांनी  कृषि विभागाच्‍या अधिका-यांना दिली. जिल्‍ह्यात अपु-या पावसामुळे  पिकांचे नुकसान होण्‍याची  शक्‍यता  लोकप्रतिनिधींनी  व्‍यक्‍त केली असता, अधिका-यांनी  प्रत्‍यक्ष गावांना भेटी देऊन पाहणी करावी अश्‍या सुचनाही  यावेळी त्‍यांनी दिल्‍या.
            तुषार व ठिंबक सिंचनाच्‍या  वाढीसाठी  जिल्‍ह्यात जाणिवपूर्वक प्रयत्‍न करण्‍याची सुचना करताना पालकमंत्री म्‍हणाले की, तुषार सिंचनासाठी  4 हजार 110 प्रकरणे प्राप्‍त झाली असून, या प्रकरणांवर त्‍वरीत निर्णय घ्‍यावा तसेच ठिंबक सिंचनासाठी  आवश्‍यक प्रशिक्षण शेतक-यांना देण्‍यासोबतच माती व खतांचे व्‍यवस्‍थापन,  कोणते पिक  घ्‍यावे यासंदर्भात शेतक-यांना प्रथम मार्गदर्शन करावे अशा सुचनाही  पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता खात्‍याचे राज्‍यमंत्री  रणजित कांबळे यांनी यावेळी दिल्‍यात .
                        142 शेततळ्यांचा कार्यक्रम
            वर्धा जिल्‍ह्यात शेतीला संरक्षित पाणी देण्‍यासाठी   शेततळ्यांचा कार्यक्रम राबविण्‍याच्‍या सुचना देतांना पालकमंत्री राजेंद्र मुळक म्‍हणाले की 142  शेततळ्यापैकी  112 शेततळे पूर्ण झाले असून अपूर्ण शेततळ्यांचे कामही सुरु करावे तसेच शेततळ्यांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्‍यासाठी शेतक-यांमध्‍ये जागृती निर्माण करावी अशी सुचनाही त्‍यांनी  यावेळी केली.
            जिल्‍ह्यात पाणी टंचाई  निवारण्‍यासाठी  राबविण्‍यात येणा-या कार्यक्रमासाठी  15 जुलै पर्यंत मुदत वाढवून देण्‍यात आली  असून टंचाई आराखड्यानुसार जी कामे अपूर्ण आहेत ती कामे तातडीने पूर्ण करावी असे सांगतांना  राजेंद्र मुळक म्‍हणाले की पाणी टंचाई  आराखड्यामध्‍ये  81 विंधन विहरी मंजूर करण्‍यात आल्‍या असून त्‍या तातडीने पूर्ण कराव्‍यात तसेच ज्‍या विंधन विहरींना दूषीत व पिण्‍यास  अयोग्‍य पाणी आहे अशा 248 विंधन विहरी कायम स्‍वरुपी बंद करावे व तयामध्‍ये काळी माती टाकावी  तसेच ज्‍या गावांमध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई आहे तेथे नवीन विंधन विहरींचे प्रस्‍ताव तयार करावे. अशा सुचनाही  त्‍यांनी यावेळी दिल्‍यात .
       पावसाळ्यात साथीचे आजार उदभवणार नाही याची दक्षता घ्‍यावी.  तसेच पिण्‍याच्‍या पाण्‍याचे स्‍त्रोत आहेत त्‍या गावातील आजूबाजूला असलेले  शेणखत व इतर साहित्‍य तेथून काढावे व हा परिसर स्‍वच्‍छ  ठेवावा. अश्‍या सुचनाही यावेळी अधिका-यांना देण्‍यात आल्‍या.
                        31  ऑगस्‍ट पर्यंत पुरेल एवढा जलसाठा  उपलब्‍ध
            जिल्‍ह्यात  पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई भासणार नाही यादृष्‍टीने  सिंचन प्रकल्‍पामध्‍ये  असलेला जलसाठा राखीव ठेवावा अशा सुचना पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी यावेळी दिल्‍यात तसेच सिंचन प्रकल्‍पामध्‍ये  उपलब्‍ध असलेल्‍या  पाण्‍याचा आढावाही त्‍यांनी यावेळी घेतला.
जिल्‍ह्यात महाकाली , लोअर वर्धा, मदन ,वडगाव , निम्‍नवर्धा  आदी प्रकल्‍पामध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी 31 ऑगस्‍ट पर्यंत पाणी  पुरेल एवढे  उपलब्‍ध असल्‍याची माहिती  अधिका-यांनी बैठकीत दिली.
       प्रारंभी जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी स्‍वागत करुन प्रास्‍ताविकात  जिल्‍ह्यातील विविध विकास योजनांचे व प्रत्‍यक्ष सुरु असलेल्‍या   कामांची  माहिती दिली.
            कार्यक्रमाचे संचालन  व आभार नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी केले.
                                                            000000

No comments:

Post a Comment