Friday 18 May 2018




जलसंधारणाचे जास्तीत जास्त कामे मनरेगातून करावीत
                                                              -धर्मवीर झा
Ø मनरेगाच्या केंद्रीय पथकांनी केली कामाची पाहणी
     वर्धा दि.16 (जिमाका) –केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे मनरेगाचे  संचालक व त्यांच्या पथकाने कारंजा व आर्वी तालुक्यात झालेल्या  मनरेगाच्या कामांना भेट देऊन पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा संदर्भात आढावा घेतला. यावेळी त्यांनी मनरेगामधून करण्यात येणा-या कामांमध्ये 60 टक्के कामे जलसंधारणाची घ्यावी, अशा सूचना मनरेगाचे संचालक धर्मवीर झा यांनी केल्यात.
          या पथकामध्ये मनरेगा कार्यक्रम अधिकारी सोनल कुलश्रेष्ठ, अनिलकुमार कट्टा, वैभव माहेश्वरी, म्रीदुल गर्ग, राजकुमार दत्ता यांचा समावेश होता. या पथकाने कारंजा तालुक्यातील येनगाव येथे फळबाग लाभार्थी श्रीराम चोपडे आणि शिलाबाई देवासे यांच्या शेतात सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच मधुकर चोपडे यांच्या शेतात मनरेगा मधून करण्यात आलेल्या सिंचन विहिरीची पाहणी केली. पालोरा ग्रामपंचायत येथे जागो मानमोडे यांच्या घरकुलास भेट देऊन पाहणी केली. तसेच आर्वी तालुक्यातील सावळापुर येथील रोप वाटिकेतील कामाचे निरिक्षण केले. तसेच ग्रामपंचायतीमधील नरेगा सबंधी दस्तऐवज, योजनेसंबंधी कामाचे भिंतीफलक, ग्रामपंचायत मधील 1 ते 7 नमुन्याचे अद्यावतीकरण, नविन नमुन्यातील जॉब कार्ड वितरण इत्यादी अभिलेखांची तपासणी केली.
          क्षेत्रीय भेटी नंतर केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मनरेगाच्या कामाचे सादरीकरण केले. यामध्ये 2018-19 या वर्षात 1 लाख 78 हजार 443 मनुष्यदिवस  निर्मिती झाल्याचे सांगितले. जिल्हयात 1 लाख 15 हजार कुंटूबांना जॉब कार्ड वितरीत करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 हजार 627 नागरिकांनी कामाची मागणी केली असून 12 हजार 471 लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. 74 कुंटूबाने 100 दिवस काम केले आहे. यामध्ये 93 टक्के लोकांना वेळेवर वेतन देण्यात आले आहे. मनरेगा मधून मार्च 2018 पर्यंत 4 हजार 261 मंजूर विहिरीपैकी 2 हजार 470 विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी 2 हजार 214 लाभार्थ्यांचे वीज पंप जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाले असून 2 हजार 4 लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे.  जॉब कार्ड तपासणीचे काम 96 टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर भारती उपस्थित होते.
                                                            0000

No comments:

Post a Comment