Tuesday 15 May 2018


भारत निवडणूक आयोगातर्फे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
      निर्दोष मतदार याद्या तयार करण्यासाठी  नागरिकांनी सहकार्य 
                                                -जिल्हाधिकारी शैलेश नवाल                                                               
* १ जानेवारी २०१९ ला पात्र होणा-या मतदारांची नोंद घेणार
* अधिका-यांना झालेल्या कामाचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य
* नोंदणीसाठी ‘ईआरओनेट प्रणाली’चा वापर होणार
* यादीतून नावे वगळण्यापूर्वी काटेकोर तपासणी आवश्यक
* सप्टेंबरमध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल
वर्धा , दि. 15 : मतदारयादी अधिकाधिक निर्दोष करण्याच्या दृष्टीने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. त्यानुसार मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) हे घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. त्यांना नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल  यांनी केले.
श्री. नवाल म्हणाले की, आयोगाने दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित हा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार १ जानेवारी २०१८ ला पात्र असूनही नोंद न झालेल्या आणि १ जानेवारी २०१९ पासून मतदार म्हणून नोंदणीस पात्र होणा-या व्यक्तींची नोंदणी या मोहिमेत करण्यात येईल. त्याचप्रमाणे, दुबार नोंदी व मयत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित व्यक्ती यांची माहिती घेण्यात येऊन पूर्वीच्या नोंदींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी त्यांच्या घरी येणा-या अधिका-यांना आवश्यक माहिती बिनचूकपणे देऊन सहकार्य करावे व या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

        छायाचित्र मतदार यादीचा संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम असा आहे.
 20 जुन पर्यंत मतदान केद्रस्थरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन पडताळणी करतील. 21 जुन ते 31 जुलै पर्यंत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत कंट्रोल टेबल अद्ययावत करणे, पुरवणी यादया तयार करणे, यादया तयार करुन विलीनीकरण व एकत्रीकरण करुन प्रारुप मतदार यादी तयार करणे व  1 सप्टेंबर ला प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर दरम्यान प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीवर दावे व हरकती स्विकारण्यात येतील. 30 नोव्हेंबर पुर्वी दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. 3 जानेवारी 2019 पुर्वी डाटाबेसचे अद्ययावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई करण्यात येईल. अंतिम मतदार यादी 4 जानेवारी 2019 ला प्रसिध्द करण्यात येणार आहे.
            विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम हा सर्वसाधारणत: प्रारुप यादी प्रकाशित केल्याच्या दिनांकापासुन सुरु होतो. मात्र मतदार यादी अद्ययावत व जासतीत जास्त शुध्द स्वरुपात तयार व्हावी यासाठी प्रारुप मतदार यादी प्रकाशित करण्यापुर्वी पुर्व तयारी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानी दिल्या आहेत. यामध्ये सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रशिक्षण, सर्व केंद्रस्थरीय अधिकारी यांची नियुक्ती आणि प्रशिक्षण. मतदार यादीतील तफावतीचा शोध घेऊन या तफावती दूर करण्यासाठी उपाययोजना निश्चित करण्यात येतील. मयत, दुबार, स्थलांतरीत मतदाराचा शोध घेऊन यांची नावे कमी करण्यात येईल. मतदार केद्राचे सुसुत्रीकरण, यादीभाग व नकाशे निश्चित करणे, 100 टक्के मतदान केद्राची पडताळणी, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, मतदार यादीचे एकत्रिकरण, आणि स्वीप कार्यक्रमाची अमलबजावणी या दरम्यान करण्यात येणार आहे.
    नोंदणीसाठी ‘ईआरओनेट प्रणाली’चा वापर होणार
मतदार नोंदणी माहिती तंत्रज्ञानाच्या वापरातून सुलभ व जलद करण्यासाठी आयोगातर्फे ईआरओनेट (ERONET) प्रणालीचा शुभारंभ दि. १६ मे ला होणार आहे. त्यामुळे देशभरातील मतदार नोंदणी अधिकारी जोडले जाणार असून त्यांच्या नोंदणीविषयक कामाची माहिती आयोगास तत्क्षणी होणार आहे. ब्लोनेट (BLONET), ईटीपीबीएस (ETPBS) या प्रणालींच्या वापराचे प्रशिक्षण सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे
निवडणूकीत १०० टक्के व्हीव्हीपीएटीचा वापर होणार
आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये १०० टक्के व्हीव्हीपीएटीचा (VVPAT) वापर करण्यात येणार असल्यामुळे एका मतदान केंद्रावर नागरी भागासाठी १,४०० व ग्रामीण भागासाठी १,२०० पेक्षा जास्त मतदार असणार नाहीत अशा प्रकारे मतदान केंद्रांचे तार्किकीकरण (Rationalization) व मतदान क्षेत्राच्या भागांची सीमा निश्चिती या बाबी आयोगाच्या निर्देशांनुसार योग्य वेळी करण्यात येईल.
            अधिका-यांना झालेल्या कामाचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य
निवडणूक आयोग जिल्हावार बैठका घेणार असून, आता बीएलओ ते सीईओ या प्रत्येक स्तरावर झालेल्या कामाबाबत प्रमाणपत्र देणे अनिवार्य करण्यात आले आहे
            नावे वगळताना दक्षता घ्यावी
कोणाही मतदाराचे नाव पूर्ण चौकशी केल्याशिवाय मतदार यादीतून वगळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. मृत मतदारांच्या बाबतीत मृत्यूच्या नोंदवहीतील नोंद / मृत्यू प्रमाणपत्र यांच्या आधार घेऊनच नोंद वगळावी. इतर बाबतीत मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांच्यामार्फत प्रत्यक्ष स्थळ चौकशी केल्याशिवाय कोणतेही नाव वगळण्यात येऊ नये, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
        मतदान केद्रस्थरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देऊन यांनी 1 जानेवारी 2018 रोजी पात्र असलेले मात्र मतदार म्हणुन नोंदणी न झालेल्या नागरिकांची नावे गोळा करण्यात येणार आहे. तसेच 1 जानेवारी 2019 रोजी मतदार म्हणुन नोंदणीसाठी पात्र ठरणा-या भावी मतदारांची नावे गोळा करुन दुबार, मयत व कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदाराची नावे वगळण्यात येतील. यासाठी नागरिकांनी घरी येणा-या केंद्रस्थरीय अधिका-यांना खरी माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

No comments:

Post a Comment