Friday 18 May 2018





केंद्रीय पथकाकडून बोंडअळीचा आढावा
Ø शेतकऱ्यांशी चर्चा करुन घेतली माहिती
Ø  एन.डी.आर.एफ मधून मिळणार मदत 
वर्धा दि 16:- मागील खरीप हंगामात  बोंडअळीमुळे राज्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने बोंडअळीसाठी मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये एन डी आर एफ कडून सुध्दा मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या मागणीनुसार आज  केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शेतक-यांशी चर्चा करून बोंडअळीचा आढावा घेतला. राज्यातील कापूस उत्पादक शेतक-यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे  असा अहवाल या पथकाकडून देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही नीती आयोगाचे कृषी संशोधन अधिकारी डॉ बी गणेशराम यांनी दिली.
बोंडअळीग्रस्त  शेतक-यांना राज्य शासनाच्या वतीने मदत देण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनात घेण्यात आला होता. त्यासाठी  शासनाने नुकताच जिल्ह्यासाठी 153 कोटी 78 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने एन डी आर एफ मधून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केली होती. ती मागणी मान्य करत केंद्र शासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज राज्यात दोन केंद्रीय पथक पाठवले आहे. हे पथक  नागपूर आणि औरंगाबाद विभागातील जिल्ह्यांना 15 ते 18 मे दरम्यान भेट देईल. तेथील शेतक-यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेतील.
आज यातील नागपूर  विभागात दाखल झालेल्या  पथकाने वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मोई येथे ब्राम्हणी, हिंगणी, घोराड, आमगाव सालई(कला) येथील शेतकरी , वर्धा तालुक्यातील पवनार, आणि देवळी तालुक्यातील विजयगोपाल आणि शिरपूर येथील शेतक-यांशी संवाद साधुन बोंडअळीची माहिती जाणून घेतली.
पवनार येथे ग्रामपंचायत कार्यालयात नंदकिशोर तोटे, जगदीश वाघमारे,पंढरी ढगे, सीमा सावरे, श्रीकांत तोटे या शेतक-यांनी आपबीती सांगितली. डॉ.नंदकिशोर तोटे यांनी सप्टेंबर महिन्यातच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे एकच वेचा निघाला. तसेच निघालेला कापूस प्रभावीत झाल्यामुळे त्याला कमी दर मिळाला. फेरोमेन्ट ट्रॅप लावले होते मात्र त्यामुळेही बोंडअळीवर नियंत्रण आले नाही. निंबोळी अर्कासोबतच वेगवेगळे कीटकनाशकाची फवारणी करूनही बोंडअळीवर काहीच परिणाम झाला नसल्याची माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्व शेतक-यांनी बोन्ड अळीमुळे उत्पादन 60 -70 टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगितले. 
कावेरी,  प्रभात, एटीएम अशा सर्व प्रकारच्या वाणावर बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याचे शेतक-यांनी  सांगितले.
या पथकात डी. सी. डी. नागपूर चे संचालक डॉ. आर. पी. सिंग, केद्रिय कापूस संशोधन केद्राच्या कोईमतूर विभागाचे प्रकल्प समन्वयक  डॉ ए. एच. प्रकाश, उपायुक्त (बियाणे)  नवि दिल्लीचे एस. सेलवराज, खर्च विभागाचे सल्लागार दिना नाथ, केंद्रीय विद्युत अधिकारिता विभागाचे उपसंचालक ओम प्रकाश सुमन, दिल्लीचे मत्स्य संशोधन आणि तपास अधिकारी डॉ तरुणकुमार सिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च हैद्राबाद चे संचालक एस. आर. वोलेटी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, उपसंचालक श्री. कापसे तसेच कृषि विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
डॉ.बी गणेशराम यावेळी शेतक-यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, उन्हाळ्याचे तीन महिने शेतात कोणतेही पीक घेऊ नका. बोंडअळीचे चक्र खंडित करण्यासाठी तीन महिने शेत खाली ठेवा. तसेच ज्या शेतात मागील वर्षी कापूस घेतला त्या शेतात यावर्षी कापूस ऐवजी दुसरे पीक घेण्याचा प्रयत्न करा.  तसेच शेतक-यांनी नुकसान टाळण्यासाठी पहिली खबरदारी म्हणजे परवानाधारक कृषि केंद्रातूनच बियाणे खरेदी करावेत. तसेच बियाणे खरेदी करताना पक्के बील घ्यावे.  कंपन्या बीटी 3 बियाणे अवैधपणे विकत आहेत. ते बियाणे शेतक-यांनी घेऊ नये असेही ते म्हणाले. 
        यावर्षी कापूस लागवड करणा-या शेतक-यांनी ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये डोळ्यात तेल घालून पिकावर लक्ष द्यावे. झाडाची पाहणी करून पाती किंवा कापूस फुलावर असताना कीटक दिसत असल्यास कृषि अधिका-यांना तात्काळ कळवावे. आपल्याला फेरोमेन्ट ट्रॅप उपलब्ध करून देण्यात येतील.
तणशकामुळे कॅन्सरचा धोका
अनेक शेतकरी तण काढण्यासाठी तण नाशकाचा उपयोग करतात. मात्र त्यामधील  ग्लायफोसेट या रसायनाच्या अति प्रमाणामुळे कॅन्सर होतो. याचा वापर जमिनीवर थेट होत असल्यामुळे हे रसायन मातीतून थेट  पाण्यात मिसळते आणि त्यातून उत्पादित होणाऱ्या अन्न धान्यामार्फत आपल्या शरीरात प्रवेश करते. पंजाब मध्ये रसायनांचा सर्वात जास्त वापर होतो. त्यामुळे त्या राज्यात कॅन्सर रुग्णाचे प्रमाण एवढे मोठे आहे तेथील रुग्णांना उपचार घेण्यासाठी जायला रेल्वे गाडी सुरू केली असून त्या गाडीचे नावच कॅन्सर ट्रेन आहे. त्यामुळे अशी परिस्थिती महाराष्ट्रात येऊ नये यासाठी शेतक-यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment