Friday 3 November 2017



कॉटन टू क्लॅाथ ठरणार शेतक-यांसाठी वरदान
               • साटोडा गावात स्थापन झाले  कापड निर्मिती केंद्र
         • 16 महिलांना मिळाला रोजगार 
                 • आणखी 28 महिलांना रोजगारासाठी देणार प्रशिक्षण
वर्धा,दि 11(जिमाका) शेतक-यांनी पिकवलेल्या पांढ-या सोन्याला चांगला भाव मिळवून द्यायचा असेल तर कापसावर आधारित  प्रक्रिया उद्योग उभारण्याशिवाय पर्याय नाही. याला मूर्त रूप देण्यासाठी कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाने पुढाकार घेतला असून याची  छोटी सुरुवात साटोडा या गावापासून झाली  आहे.  गावातील 16  महिलांनी  कापसापासून खादी कापड तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली असून  त्यांना  रोजगाराचे नवीन साधन उपलब्ध झाले आहे. कॉटन टू क्लाथ ही संकल्पना साकारणारा हा प्रकल्प  शेतकऱयांसाठी  निश्चितच वरदान ठरणार आहे. 
विदर्भात कापसाचे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते.पण शेतक-यांना कापूस हा कच्चा माल म्हणून विकण्याशिवाय पर्याय नाही.कारण शेतक-यांच्या मालकीच्या  सूतगिरण्या किंवा वस्त्रोद्योग नाहीत.  त्यामुळे पिकवलेला कापूस आहे त्या भावाने व्यापाऱ्याना  देण्यापलिकडे त्याच्याकडे दुसरा  पर्याय नाही.  वर्षानुवर्षे सुरू  असलेली ही प्रथा आजही कायम आहे.  शेतक-यांच्या या परिस्थितीत  बदल घडविण्यासाठी स्थापन झालेला  केम प्रकल्प यासाठी काम करीत आहे. शेतक-यांना विविध  शेतीपूरक उद्योगाकरिता कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत.  यामध्ये शेतकरी बचत गटाच्या दालमील, शेळीपालन, मशरूम शेती, शेतक-यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतक-यांनी कापूस व्यापाऱ्यांना विकता कापूस गाठी तयार करण्यासाठी प्रोत्साहन व सहकार्य  याचा समावेश आहे. मागील दोन वर्षांपासून 10 गावातील शेतकरी स्वत:च कापूस गाठी तयार करून विकत आहेत.  पण यातील नफ्याचे खरे गणित कापड आणि वस्त्रे तयार करण्यात आहे,  हे लक्षात घेऊन कॉटन टू  क्लाथ या संकल्पनेवर काम करण्यास केमने सुरुवात केली.
वर्धा शहराला लागून असलेल्या साटोडा या गावातील विठाई, संस्कृती, महालक्ष्मी, भिमाई या महिला बचत गटाच्या 20 महिलांना  हातमाग चालविण्याचे प्रशिक्षण दिले. मुख्य म्हणजे यातील महिला या शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विधायक कृतिशील कार्यापासून प्रेरणा घेऊन निवेदिता निलंयम ही संस्था  काम करते. या संस्थेचे किशोरभाई यांनी या महिलांना  हातमाग चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच केमसाठी  हातमाग युनिटही  तयार करून  दिलेत. केमने 30 टक्के अनुदानावर 4 हातमाग युनिट या गावात स्थापन केले आहेत. एका युनिटची किंमत 3 लाख रुपये असून यासाठी  समन्वित  शेतकरी उत्पादक कंपनी आणि ग्लोबल इंटरप्रयजेस यांनी सहकार्य केले आहे.
दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट महिन्यापासून  16  महिलांनी 500 मीटर खादी कापड तयार केले आहे. मुख्य म्हणजे समन्वित शेतकरी उत्पादक कंपनी आणि  ग्लोबल इंटरप्रयजेस या कंपनीला तयार कापड विकण्याचा करार केल्यामुळे 150 रुपये प्रति मीटरने खादी कापड विकला जात आहे. यामध्ये महिलांना 200 रुपये प्रतिदिन मजुरी सोबतच कापड विक्रीतून होणा-या नफ्यातील हिस्साही मिळणार आहे. 
याच गावात आणखी 7 हातमाग युनिट लवकरच बसविण्यात येणार असून  आणखी 28 महिलांना रोजगाराची संधी गावातच  मिळणार आहे. शिवाय गावातील शेतक-यांना या हंगामात कापूस व्यापा-यांना विकण्याऐवजी थेट कापड तयार करून विक्रीचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. 


            शेतक-यांना 1 क्विंटल कापसाचे हमीभावाप्रमाणे 5 ते 6 हजार रुपये  मिळतात. पण त्यावर प्रक्रिया करून थेट खादी कापड विकला तर याच्या चारपट म्हणजे  सुमारे 23 हजार रुपये नफा खर्च वजा जाता मिळू शकतो. त्यामुळे शेतक-यांनी याचा फायदा करून घ्यावा.
 
 निलेश वावरे 
  समन्वयक 
  कृषी समृद्धी समन्वित कृषी विकास प्रकल्प 
  वर्धा

0000








No comments:

Post a Comment