Friday 3 November 2017



*विशेष  लेख
जलयुक्त शिवार :  97 हजार हेक्टर संरक्षित सिंचन
रब्बी पिकात 15 हजार हेक्टरने वाढ
357 गावे वॉटर न्यूट्रल

     वर्धा दि 2 (जिमाका)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे दृष्य परिणाम राज्यात सर्वत्र दिसायला लागले आहेत. सरकारला तीन वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार ही सर्वात मोठी उपलब्धी ठरली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला आहे. वर्धा  जिल्हयात मागील तीन  वर्षात जलयुक्त शिवारमध्ये 564  गावाची निवड करण्यात आली. निवड केलेल्या गावात जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामामधून 95 हजार 473  हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. याचा लाभ असंख्य शेतकऱ्यांना मिळाला असून . जलयुक्त शिवार हे अभियान शेतीसाठी संजीवनी  ठरले आहे.

      पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, विकेंद्रित जलसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या आणि निकामी झालेल्या जलस्रोतांच्या पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, आणि पाणी अडविण्याच्या कामात लोकसहभाग वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 2015 पासून सुरू करण्यात आलेली ही योजना जिल्ह्यात उत्तम पद्धतीने राबविल्या गेली. 

     कृषि विभाग, जलसंधारण (राज्य), जिल्हा परिषद  लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा,   वन विभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा,  इत्यादी विभागाच्या माध्यमातून जिल्हयात जलयुक्त शिवारची कामे करण्यात आलीत . या सर्व विभागाच्या  नियोजनामुळे जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वी वाटचाल जिल्ह्यात  पहायला मिळते.

     2015-16 मध्ये 8 तालुक्यातील 214 गावांची निवड या अभियानात करण्यात आली. 214  गावात विविध यंत्रणांमार्फत 2808 कामे पूर्ण करण्यात आली.  दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा परिणाम पाहता वर्धा  जिल्हयात जलयुक्त शिवार योजनेत 2015-16 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली सर्वच  214 गावे  शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली आहे. या कामामुळे जिल्हयात या वर्षात 41 हजार  290  हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे पावसाच्या खंड काळात कोमेजणा-या किंवा कारपणा-या पिकांना जलयुक्त शिवार अभियान संजीवनी देणारे ठरले आहे.

     शिवारात पावसाचे पडलेले पाणी व अडवलेले आणि जिरवलेले पाणी यांचा ताळेबंद करण्याची पध्दत जलयुक्त शिवारमध्ये ठरवून दिलेली आहे. त्यानुसार गावाची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामामुळे पावसाच्या पाण्याचा जमा खर्च व ताळेबंद तयार करणे म्हणजेच वॉटर न्युट्र्रल टक्केवारी होय.  

     सन 2016-17 मध्ये 212  गावाची निवड करण्यात आली असून या गावात 2323  कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी  2228 कामे पुर्ण करण्यात आली आहेत. पूर्ण करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामामधून 54 हजार 183  हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. या वर्षात निवडण्यात आलेल्या 212  गावांपैकी 143  गावे शंभर टक्के वाटर न्युट्रल झाली आहेत तर 61 गावे 80 टक्क्यांच्या वर वाटर न्युट्रल झाली आहेत.

मागील दोन वर्षात जलयुक्त शिवार मध्ये झालेल्या कामामुळे जिल्ह्यात भाजीपाला पीक, फळपीक लागवड वाढली असून रब्बी पिकाच्या क्षेत्रात 15 हजार हेक्टरने वाढ झाली आहे.

     सन 2017-18 मध्ये जिल्हयातील 138  गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांमार्फत 1400  कामे प्रस्तावित केली आहेत. यातील काही  कामे सुरु झाली असून सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर अंदाजे 30 हजार हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण होणार आहे. जलयुक्त शिवारमध्ये शेततळे, सिमेंट नालाबांध, नाला खोलीकरण, भूमिगत बंधारे, रिचार्ज शाफ्ट सह  अन्य महत्वाची कामे करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 5 वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. मागील तीन वर्षात या अभियानाच्या माध्यमातून जिल्हयात निर्माण झालेल्या 95 हजार 473 हेक्टर  संरक्षित सिंचनामुळे शेतीला हक्काचे सिंचन मिळाले आहे.


                                                                                         मनीषा सावळे
                                                                               जिल्हा माहिती अधिकारी वर्धा



No comments:

Post a Comment